नाद: डॉ. प्रवीण शां. डुंबरे यांच्या, 'प्रतिबिंब ' या ललित लेख संग्रहातून...
- Neel Writes

- Jul 7
- 3 min read
नाद म्हणजे ध्वनी, घोष, उद्गोष, निनाद किंवा नादाला आणखी वेगळ्या प्रकारे सांगायचे झाले तर छंद, आवड, वेड, व्यसन होय. याच नादाचा उपयोग करायचा झाला तर आपण एखाद्याला चित्रकलेचा, वाद्य संगीताचा, खेळांचा, वाचनाचा, लिहिण्याचा, कविता करण्याचा, गाणी म्हणण्याचा किंवा अभ्यासाचा अशा चांगल्या गोष्टींचा नाद आहे असे म्हणतो. तर एखाद्याला तंबाखू खाण्याचा, दारू पिण्याचा किंवा इतर वाईट गोष्टींचाही नाद आहे असेच म्हटले जाते. तो मनुष्य एखाद्या व्यसनाच्या नादी लागलेला आहे, असेही आपण म्हणतो. दारू पिऊन नवरा जेव्हा दररोज झिंगत घरी येतो, तेव्हा दारूच्या त्रासाला, मारहाणीला कंटाळलेली बायको त्याला म्हणते, "बरी अवदसा आठवली तुम्हाला; हिच्या नादामुळे माझ्या संसाराचं, जीवनाचं वाटोळं झालं आहे."

नाद हा लहान मुलांना त्यांच्या बालपणी खेळण्याचा, वस्तू हाताळण्याचा, स्क्रू ड्रायव्हरने त्या वस्तू उघडून आत मध्ये काय आहे हे पाहण्यात असतो. त्यात त्यांना उत्सुकता व जिज्ञासा असते. या नादामध्ये लहान मुले व काही वेळेला मोठी माणसे सुद्धा काळ, वेळ विसरतात व त्यांना खाण्यापिण्याचे, अगदी स्थळाचे सुद्धा भान राहत नाही. नोकरी, व्यवसायात किंवा शेतीमध्ये ज्यांचा वेळ जातो, ज्यांचे मन रमते त्यांना स्वतःला वेळ पुरत नाही. परंतु ज्यांना वृद्धापकाळमुळे वेळ जात नाही त्यांनी देव धर्माचा, नामस्मरणाचा नाद अंगी जरूर अंगी बाळगावा म्हणजे जीवनाचे सार्थक होईल. जीवन कृत्य कृत्य होईल. आणि वेळ सार्थकी लागेल.
शास्त्रज्ञांना शंभर शंभर नाहीतर हजार हजार वेळा करावे लागणारे प्रयोग त्यातून निर्माण होणारे शोध हे त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या नादामुळेच झालेले असतात. त्यामधून माणसाची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेलेली आहे. कुणालाही चांगला नाद असावा. वाईट नाद, संगत नको, असे नेहमी म्हटले जाते.
घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या हातून धातूची वस्तू, पितळी, थाळी जमिनीवर खाली पडली तर त्यातून वेगळा असा नाद निर्माण होतो. त्याची कंपने खुप वेळपर्यंत आपल्या कानांना जाणवत राहतात. घरातील बालकाला जास्तचीच भूक लागली असेल तर समोर आलेल्या मोकळ्या थाळीवर, हातात मिळेल त्या वस्तूने तो नाद तयार करत असतो आणि हे आपण लहानपणी अनुभवलेले सुद्धा आहे. शाळेमध्ये प्रार्थनेचा शाळा भरण्याचा मधल्या सुट्टीच्या आणि शेवटी शाळा सुटल्याची वेळ दाखवणारी घंटा... वेगळा नाद उत्पन्न करते आणि मुले आनंदाने नाचून घराकडे धूम ठोकतात. नाटकांमधून सुद्धा प्रत्येक अंक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागून, एक.. दोन.. तीन.. अशा वेगळ्या प्रकारे घंटा वाजवल्या जातात व त्या सुद्धा एक वेगळाच नाद निर्माण करतात. मनःशांतीसाठी जेव्हा आपण मंदिरात, चर्चमध्ये जातो त्यावेळी तेथे बाहेर असणाऱ्या घंटे मधून घंटानाद उत्पन्न होत असतो. पहाटेच्या शांत वेळेला घरांमधून, धर्मशाळांमधून आणि मंदिरांमधून सर्वप्रथम ऐकू येणार आवाज, ध्वनी म्हणजे शंखनाद! या शंखनादाने सगळीकडे जनजीवन सुरू झाले आहे, असे आपल्या लक्षात येते. तीन वर्षांपूर्वी करोनाच्या महामारीने ग्रासलेल्या आपल्या देशातील बांधवांनी बराच काळ लॉकडाऊन मध्ये व क्वारंटाईन मध्ये काढल्यावर, पंतप्रधान मोदी यांनी सुचवल्याप्रमाणे, एक दिवस करोनाचा व्हायरस जाईल म्हणून नाही, तर मनाचे आरोग्य आणि बळ वाढावे म्हणून तरी काहीजणांनी थाळीनाद केलाच की.
ध्यानाने आराम मिळवून देणाऱ्या गोष्टीला मंत्र म्हणतात. मंत्रोच्चाराने शरीरात, मनात, मेंदूमध्ये नाद, कंपने म्हणजे लहरी निर्माण होतात. त्यामुळे शरीर, मन हलके होते. मनातले विचार हळूहळू नाहीसे होतात. जीवनातील ताणतणाव, आलेल्या अडीअडचणी, शारीरिक व्याधींनी त्रासलेले जीवन या गोष्टींना मनातून बाहेर काढून टाकण्याचे काम मंत्र उच्चाराने, ध्यानधारणा व योगिक क्रियांनी करता येते. मनाला शांतता लाभते. एक वेगळीच अनुभूती माणसांमध्ये येऊन, माणसाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते आणि त्याचा चेहरा तेजपुंज दिसू लागतो.
विश्वाची उत्पत्ती १६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. १३ अब्ज वर्षांपूर्वी आपली आकाशगंगा व ५ अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला अस्तित्वात आली. बहुतेक खगोलशास्त्रज्ञांच्या मते विश्वाची उत्पत्ती महास्फोट सिद्धांतानुसार झालेली असली तरी सुद्धा ब्रह्मांड हे एक गुढ आहे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचा अद्यापपर्यंत कुणालाही थांगपत्ता सुद्धा लागलेला नाही. पण आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी या जगाची उत्पत्ती ओमकारापासून झालेली आहे असेच मानले आहे. आणि म्हणूनच ओम... या शब्दाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मशास्त्रात, आयुर्वेदात व योगाभ्यासात सर्वप्रथम मंत्र येतो तो ओम. हाच ओंकाराचा नाद मनाला प्रसन्नता देऊन जातो.
आपण प्रवासामध्ये असलो की आपल्यापुढे असणाऱ्या गाडीच्या पाठीमागील भागावर आपल्याला लिहिलेले आढळून येतेच की..नादचं, नाद करायचा नायं किंवा नादखुळा. गाव गावच्या जत्रा, यात्रां मधून भरणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यती आपण पाहतो. या बैलगाड्यांच्या नादापायी दहा ते पंधरा लाखांचा एकेक बैल खरेदी करून तो वर्षभर दावणीला सांभाळणारी हे नादी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात दिसतात. या बैलगाड्यांच्या नादा पायी कित्येक बैलांना आणि तरुणांना सुद्धा कायमस्वरूपी अपंगत्व आलेले असते. हा सुद्धा त्यांना लागलेला नादच आहे.
केव्हा थांबणार हा डिजे..आणि या वराती??
आपल्या आजूबाजूच्या परिसरातून लग्न, मिरवणुका, वराती यांमधून डिजेच्या कर्णकर्कश्श आणि दणदणाटाच्या तालावर असाच नाद ऐकायला येतो. आणि...एका बाजूला अचानक गलका होतो. तरुण गर्दी करतात. डॉल्बी डीजे वाल्याला कुणीतरी हे संगीत, थोड्यावेळा पुरतं थांबवायला सांगतं... स्मशानवत शांतता पसरते. कोण एक कार्यकर्ता या भल्या मोठ्या स्पिकरच्या भिंतीच्या नादाने, कंपनांनी... धाडकन जमिनीवर कोसळलेला असतो. चारही बाजूने त्याची उचल बांगडी करून, हॉस्पिटलच्या दिशेने त्याला नेलं जातं. आणि.. पुन्हा मदिरेच्या नादी लागून मिरवणुकांमध्ये.. समूहाने डान्स रुपी थयथयाट करत, डिजेवाली तरुणाई पाव्ह्ण्याला म्हणते.
नाद करायचा नाय...ओ पावन नाद...करायचा नाय.
पुढारी भाऊंच्या वाढदिवसाला आलेल्या गाड्या सुसाट वेगाने आल्या तशा, दुसऱ्या ठिकाणी केक कापण्यासाठी निघून जातात. डॉक्टरांना मुलं ओरडुन विचारतात... 'अहो.. डॉक्टर, काय झालं आमच्या भाऊला'? डॉक्टर हताशपणे म्हणतात. 'हृदय बंद पडून मृत्यू.' आणि... भाऊच्या घरी आई आणि बायकोमुलांचा आक्रोश ऐकू येतो.
इकडे चार दोन ठिकाणी...ऐंशी वर्षा पुढची.. अंथरुणात खिळलेली, दोन चार म्हातारी आणि म्हाताऱ्यांना.. शेवटचं तपासायला डॉक्टर पळाले. आणि सर्व वयोगटातले चांगले असलेले १०-१२ जण, कानाच्या डॉक्टरांकडे पळाले.
(हे शिवधनुष्य ज्याच्या घरी कार्यक्रम आहेत.. त्यांनी उचलावे.)




Comments