google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

अहो! ते...माय हबी!

अहो... पासून हबी पर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. पूर्वी तर नवऱ्याला कोणत्याही नावाने हाक मारली जात नव्हती. ग्रामीण भागातील हा पिढ्यानं पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक ठेवाच होता. असे म्हणावे लागेल. एकत्र कुटूंब पद्धतीचा हा सुवर्णकाळच होता. कुटुंबातील सदस्यांची संख्या त्याकाळी जास्त होती. त्यांना... म्हणजे तिकडच्यांना, यजमानांना काही सांगायचे... द्यायचे असेल तर घरातील इतर मुलींमार्फत किंवा मुलांना मध्यस्थी घेऊन निरोप दिला जात होता. 'ह्यांना आसं...आसं सांग.' आणि त्यांच्याकडूनही आलेला निरोप पुन्हा सांगितला जायचा. की....'तिला असा असा निरोप दे.' झालं! मधल्यामध्ये छोट्या निरोप्यांची दमछाक व्हायची. तो ती कंटाळले की मग कुठे नवरा बायको, एकमेकांकडे फक्त एखादा कटाक्ष टाकायची. नवीन लग्न झालेल्यांमध्ये अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष अबोल संवादाची फेक ऐकताना, बारकाल्यांना खूप मजा यायची. त्यांच्या या लडीवाळ खेळात ते समरसून भाग घ्यायचे. एकमेकांवर रुसवा फुगवा असल्यावरही असे कधी कधी घडायचे. घरातील मोठ्या माणसांपर्यंत असे संवाद शक्यतो कधीच जात नसत. ते सर्व दिवसभर घराबाहेरच असत, तेव्हाच नवदांपत्यास मोकळा वेळ मिळे. ज्येष्ठांबद्दल आदरयुक्त दबदबा हा, त्याकाळी अशा पद्धतीने व्यक्त होत असे.


सत्यनारायण महापूजा, गोंधळ, जागरण झाल्यावर, नवरा बायको जोडीने पाहुण्यांकडे गेल्यावर अथवा स्वतःच्या घरी... त्यांचे वय कितीही होवो, देवाचे दर्शन घेऊन झाल्यावर दोघांना नाव घेण्याचा आग्रह केला जायचा. त्याशिवाय त्या जोडीला पुढे जाऊच दिले जात नसे. त्यात पहिला मान आणि आग्रह नवरीला किंवा स्त्रियांना असायचा. म्हाताऱ्यांनाही नवऱ्यांची नावे पाठ नसतं. त्यामुळे, मग. 'नाव घे ग पोरी...' म्हणजे हे नाव, तिला तिच्या नवऱ्याचे घ्यायला लागायचे. आणि ते सुद्धा साधेसुधे नाही, 'उखाण्यातच घे गं.' स्त्रीयांकडून त्यांना, तिच्या नवऱ्याच्या साध्या नावाची अपेक्षा नव्हतीच. तिने यजमानांचे नाव हे उखाण्यातच घेतले पाहिजे असा प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा नियम आणि दंडकच होता.


उखाणे म्हणजेच यमक, ताल, लय साधून आणि अलंकार वापरून लांबलचक नाव घेणे. आणि त्यात गाळलेल्या जागी आपापल्या मिष्टरांचे नाव टाकून, सुरात व तेही उपस्थितांना ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हणणे. यात तर काही जण माईक पुढे करून मुद्दाम, 'आम्हाला काही ऐकूच आले नाही. पुन्हा नाव घे.' असे म्हणून नव्या नवरीला त्रास द्यायचे. आणि कान टवकारून आपल्या कानाची तृप्तता भागवून घ्यायचे. इतके त्या नावाचे अप्रूप त्यांना असायचे.

"चांदीच्या वाटीत, पेढे भरून घेते,


....रावांचे नाव घेते, सुखाने संसार करते."

या सर्व नावांमध्ये चांदीची वाटी, ताट, घागर, हंड्यावर हांडे यांचा उल्लेख जास्त प्रमाणात असायचा. तर... बायकोचे, नवरीचे नाव घेताना नवरोबांना उखाण्यातून नाव घेण्याची, सूट मिळत असे. 'मग त्याच्या पत्नीचे नाव साध्या पद्धतीने, फक्त नावाचा उच्चार करून घेतले तरी चालेल.' असा आग्रह मात्र जरूर व्हायचा. आणि उखाण्याचा आग्रह झालाच तर... तो एकदम सरळ व सोप्पे, म्हणजे जे जास्त लोक घेतात ते नाव घ्यायचा ते असे...

भाजीत भाजी मेथीची... माझ्या प्रितीची.



नाव जर येत नसेल तर लग्नापूर्वी महिनाभर तरी शिकवले जायचे, अथवा पाठांतर केले जायचे. आणि एखाद्याचे किंवा एखादीचे तेही पाठ झाले नसेल किंवा आठवत नसेल तर, त्यांच्या भोवताली फिरणाऱ्या कलवरे आणि कलवऱ्या अगदी दुसऱ्या कुणाला ऐकू जाणार नाही, अशा पद्धतीने कानात हळू हळू नवरा नवरीस नाव सांगत असत, व शिकवत असत. तरीही ते सांगितलेले नाव इतरांना थोडेफार तरी ऐकायला जातच होते. आणि... लग्नांमध्ये सुद्धा माइक मधून नाकातील नथीचा आकडा बाजूला करून, उखाण्यातून मोठमोठी नावे घेणे वयोवृद्ध सुवासिनींचे सुरू राहिले होते.


मधल्या काळातल्या या नाव घेण्याच्या पद्धतीमध्ये, फक्त सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर होत होता. घरामध्ये इतर लोक असताना अगदी चिडिचूप वातावरण होऊन जात असे. माज घरातली, स्वयंपाक घरातली फक्त कुजबुज तेवढी कानी ऐकू यायची. आणि त्यातही एकमेकांमध्ये विनोदी संवादांमधून हसण्याची खसखस तेव्हढी पिकायची.

पुढे पुढे आमचे कारभारी, कारभारीण, यजमान आणि आमचे हे, ही, अगं..! आणि अहो! ने हाक मारली जायची. त्यानंतर आमचे पाटील, रावसाहेब, सरपंच, गुरुजी, सर अशा नावांनी ते सुरु राहिले. नोकरदारांना साहेब अशी पदवी, तर दुकानदारांना शेठ अशी उपाधी, घराघरात सर्वांसमोर आणि घराबाहेरही समाजात मिळू लागली. प्रपंचातल्या अडीअडचणी आणि एकमेकांच्या भिन्न भिन्न स्वभाव गुणधर्मामुळे परस्परांच्या नावांच्या जात कुळींचे उद्धारही याच काळात शेजार पाजारच्या घरांमधून लोकांना ऐकू येऊ जावू लागले.


व्हिडीओ रेकॉर्डिंग मुळे सध्याच्या काळात खूप प्रचलित झालेले सध्याचे एक प्रचलित नाव घेणे, आपल्याला खूपच सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. सोशल मीडियामध्ये कानांना गोड वाटणारे हेच नाव. पहा बरं! तुम्ही हे एखाद्यावेळी तरी ऐकले असेलच ना?


निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे,

नाव घेते... नाव घेते... लक्ष द्या सारे.

नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं.

नवरोबाला शेवटी, आहोच म्हणायचं.

साध्या वरण-भातावर साजूक तूप घालायचं.

... .... ....ना आता सासुबाई म्हणायचं.

छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची बहीण आता नणंदबाई चा तोरा गाजवणार.

.... रावांच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करणार.

नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं.

नवरोबाला शेवटी, आहोच म्हणायचं.

साध्या वरण-भातावर साजूक तूप घालायचं.

.... रावांच नाव घेत....च्या घरात एंटर व्हायचं.


  'अहो! ऐकलं का? बाजारातून एव्हढं घेऊन या लवकर,' हे परवालीचे वाक्य स्त्रीयांकडून आपापल्या नवऱ्यांना उद्देशून ऐकू येऊ लागले. 'काम असेल तर स्रिया खूप गोड बोलतात.' असा अनुभव प्रत्येक पुरुषाला त्याच्या संसारिक जीवनात येत असतो. आणि नंतर, 'आमच्या ह्यांना संसारातलं, खरेदीतलं, हो.. का. ठो.. कळतं नाही. त्यांना कुणीही पटकन फसवील.' मध्यंतरीचा काळ हा मुला मुलींच्या व स्त्री पुरुष समानतेचा आला आणि मग हे नाव घेणे त्यांना खूपच सोप्पे होऊन गेले. एकमेकांबरोबर नोकरी करताना घरात व त्यानंतर समाजात एकेरी नावाने, त्याच्या प्रत्यक्ष असलेल्या नावाने उल्लेख होऊ लागले. त्यात घरातील टोपण नावांचा उल्लेख होऊ लागला. आणि अगदी मुले आई वडिलांचा उल्लेख करतात त्याप्रमाणे,...आई, बाबा, मम्मी, डॅडी इ. ही नावे, नवरा बायको मुलांसमोर एकमेकांना उद्देशून हाक मारू लागली. लोकप्रियतेच्या शिखरावर एकमेकांचे प्रेम पोहोचल्यावर मग हेच नाव, पुढे आधुनिक जगतात, हजबंडचेच पुढे माय हबी असे झाले.


नावात काय आहे? असा प्रश्न शेक्स्पियारने जरी विचारला असला, तरी जन्मोजन्मीची एकदाचीच लग्न गाठ एकमेकांबरोबर बांधली गेल्यावर, आणि एकमेकांच्या नावाच्या पुढे मागे... ही नावे कायमस्वरूपी चिकटल्यावर, अभिमानाने मिरवली आणि घेतली जातात. जसा आग्रह स्त्रियांना केला जातो. तसाच आग्रह पुरूषांनाही केला जातो. लाजत काजत का होईना पण पुरूषही उखाणे घेतात. काही पुरूष तर उखाणे घेण्यातही तरबेज असतात आणि आवडीने उखाणे घेतात. लग्नातील उखाणा हा एक सुंदर आणि आनंदी विधी आहे, जो नववधू आणि नवऱ्यामध्ये माया आणि आपुलकी वाढवतो. उखाणे घेणे प्रथा संपत चालल्यामुळेच सध्याच्या पिढीत एकमेकांबद्दल असणारा, प्रेमाचा झरा आटला असेल किंवा संपला असेल. असे मला तरी वाटते. यावर तुमचे मत काय आहे?


डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर (पुणे)

9766550643

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page