कल्याण ते पुणे: लेखक प्रणव सखदेव यांचा लेखनप्रवास आणि कथा-विश्व
- Neel Writes

- Mar 4
- 9 min read
तुमच्या लहानपणचे आणि कल्याण-डोंबिवलीतील अनुभव तुमच्या लेखनावर कसा परिणाम करतात? तुमच्या कादंबऱ्यांमध्ये शहराचे वर्णन प्रकर्षाने जाणवते, ते तुमच्या वैयक्तिक आठवणींमधूनच आकाराला आले आहे का?
उत्तर: हो, म्हणजे शहराचे किंवा पर्यावरणाचे जे काही मी वर्णन केले आहे आतापर्यंतच्या लेखनात, ते अर्थातच माझ्या अनुभवातून आणि आठवणींमधून आलेले आहे. याचे कारण असे की, कुठलेही फिक्शन असो किंवा कुठलीही कथा-कादंबरी असेल, ती उभी राहण्यासाठी तुम्हाला एक अवकाश, एक पर्यावरण लागते. तर ते पर्यावरण मी जे काही अनुभवलेले आहे आणि जे काही पाहिलेले आहे, त्यातून बरेचदा निर्माण करतो. बरेचदा सरमिसळही असते, म्हणजे असे काही नाही की दरवेळेला ते सगळे एखाद्या ठिकाणाचेच असेल. दोन वेगवेगळ्या ठिकाणांचे मिश्रण करूनही वेगळं पर्यावरण अथवा अवकाश तयार करतो. आता 'काळेकरडे स्ट्रोक्स'मध्ये रुईया कॉलेज आणि त्या आजूबाजूचा परिसर आहे. बरेचदा माझ्याही नकळत मी आजूबाजूचे वातावरण टिपून ठेवलेले असते. ते मनात साठून राहते, त्यातून ते समोर येत जाते.
पण जी कॅरेक्टर्स (पात्रे) असतात किंवा बाकीच्या ज्या काही घटना असतात, किंवा घटितं असतात किंवा त्या कादंबरीला पुढे नेण्यासाठी घटक असतात किंवा कथा-कादंबरीचा कोअर (गाभा) भाग असतो, तो बरेचदा वेगळा असतो. मघाशी मी म्हणालो तसे की एक पर्यावरण कुठल्याही कथा-कादंबरीसाठी लागते, पण त्या पर्यावरणामध्ये जे घडणार आहे, ते मी बरेचदा कल्पनेतून आणि अनुभवातून अशा मिश्रणातून बरेचदा आकाराला आणतो. म्हणजे रफली (साधारणपणे) सांगायचे तर, आतापर्यंत मी जे काही फिक्शन लिहिले आहे, त्यामध्ये ३० टक्के भाग हा अनुभवलेला, बघितलेला असतो आणि ७० टक्के किंवा कधी कधी ६०-४०, म्हणजे ६० टक्के भाग हा कल्पना किंवा सरमिसळणीतून आलेला असतो.
'समीर' हे कॅरेक्टर आहे किंवा 'सानिका' हे कॅरेक्टर काही एकाच एक माणसाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. मी कुठेतरी वेगवेगळ्या माणसांची बघितलेली, अनुभवलेली असतात, त्यांच्या मिश्रणातून, त्याच्या जोडतोडीतून ही पात्रं जन्माला येतात. मला स्वतःला असे वाटते की नुसते जसे आहे तसे आपल्याला लिहिता येतच नाही, कारण आपण घेतलेला अनुभवही आपण आपल्या पद्धतीने घेत असतो; दुसरा माणूस तोच अनुभव काहीतरी आणखीन वेगळ्या पद्धतीने घेत असतो. त्यामुळे मला स्वतःला असे वाटते की आपण जो अनुभव घेतो तेच मुळात एक फिक्शन असते आणि मग त्या फिक्शनचे आणखीन फिक्शन करणं हे लेखकाचं काम आहे असे मला कायम वाटते. त्यामुळे असे कल्याण-डोंबिवलीचे संदर्भ येतात आणि ते पुढेही येणार, कारण जो माझा जडणघडणीचा काळ या भागामध्ये गेलेला आहे, माझे बालपण तिथे गेलेले आहे. पण आता गेली काही वर्षे पुण्यात राहिल्यामुळे पुण्यातील काही गोष्टी मी कल्याणमध्ये मिसळल्या आहेत. म्हणजे ते लक्षात येणार नाही पटकन कोणाच्या, पण पुण्यातील काही ठिकाणे किंवा काही कॅफे मी मुंबईच्या वातावरणात आणले आहेत. किंवा कल्याणचे काही तपशील पुण्यातील कथांमध्ये आणले आहेत. मिश्रण करून काहीतरी वेगळेच घडवणे हे मला इंटरेस्टिंग वाटते, ते फिक्शन निर्माण करण्याचे माझे तत्त्व आहे.

पत्रकारितेतून साहित्याच्या प्रवासाकडे वळण्याचा तुमचा प्रवास कसा होता? हा बदल नेमका केव्हा आणि का घडला?
उत्तर: मी वृत्तपत्रात पत्रकारिता करत होतो. तेव्हा प्रिंट मीडिया खूप सॅचुरेशन आले होते. पण पत्रकारितेमुळे एक गोष्ट लक्षात आली की खूप वेगवेगळे समाज किंवा स्तर-अंतस्तर आपल्या समाजामध्ये जगत असतात. पत्रकारितेमुळे मी खूप मोठ्या पार्ट्यांना, 'पेज थ्री कल्चर' ज्याला आपण म्हणतो तिथे जायचो, ताज सारख्या हॉटेलमध्ये जायचो प्रेस कॉन्फरन्सनिमित्ताने आणि त्याचबरोबर चिंचपोकळी, लालबाग इकडचा कनिष्ठ मध्यवर्गीय समाज, तिथली माणसं आणि त्याहून गरीब, बेघर माणसंही पाहायचो.
तर खूप वेगवेगळे स्तर-अंतस्तर मला पत्रकारितेमुळे लक्षात आले पहिल्यांदा. याच्या आधी मी बघायचो या सगळ्या गोष्टींकडे, पण पत्रकारितेमुळे जास्त सजगपणे बघायला लागलो किंवा ती दृष्टी पत्रकारितेमुळे लाभली. त्यामुळे पत्रकारितेचा मला फायदा झाला.
चांगली पत्रकारिता करताना चांगल्या बातम्या मिळवण्यासाठी शोध घ्यावा लागतो. हे शोधाचं तत्त्व मी शिकलो. मला वाटते मी जे लेखन करतो, तो असाच शोध असतो. एखादी घटना, प्रसंग घडतो. पण त्या घटनेच्या मागेपुढे अनेक घटनांची मालिका असते. माणसं असतात. त्यांची मनं असतात. मला वाटतं, त्याचा शोध घेणं हे लेखक म्हणून माझं काम आहे. कारण एक स्वतंत्र अशी घटना नसते, एक स्वतंत्र असे वास्तव नसते; अनेक वास्तवे एकमेकांशी संलग्न झालेली असतात किंवा जोडलेली असतात आणि त्यातून एक नवीन वास्तव तयार होत असते. हे वास्तव पाहणं गरजेचं आहे.
मी जेव्हा पत्रकारिता करत होतो त्याच वेळेला मी कविता लिहीत होतो. मला फिक्शन लिहायची थोडी थोडी एक उर्मी त्यावेळेस होती, पण पत्रकारितेनंतर ती आणखीन उफाळून आली.
तुमच्या लेखनात वारंवार दिसणारे काही ठराविक विषय, जसे की सामाजिक विषमता, शहरी जीवन, नातेसंबंध यामागील प्रेरणा काय आहे?
उत्तर: हो, शहरी जीवन मी स्वतः अनुभवतो आहे आणि माझे बालपण कल्याणात गेलं. त्यावेळेस ते निमशहर असलं, तरी मुंबईपासून जवळ होतं. त्यामुळे त्याचं झपाट्याने शहरीकरण झालं. संमिश्र समाज, भाषा बोलणारे तिथे राहू लागले. याशिवाय मूळ आगरीकोळी तर होतेच तिथे. त्यातले काही मित्र होते. शिवाय वाड्यांमध्ये राहणाराही समाज होता. तर रामबागसारख्या भागात ख्रिश्चन समाज होता. तसंच तो आणि खडकपाडा हा भाग नव्याने विकसित होत होता. तिथे राहणारे लोक स्थलांतरित, नोकरीसाठी राहायला आलेले होते. तर अशा वेगवेगळ्या समाजांशी माझा संबंध येत गेला. त्यांचं जगणं पाहिलं. त्यातून व्यापक दृष्टी तयार झाली, जी पुण्यातही तशीच राहिली.
मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, रुईया कॉलेजमध्ये, तिथल्या आमच्या शिक्षिकांनी आम्हाला कायमच जाणीव करून दिली की समाजात असाही एक वर्ग आहे, जो वाईट परिस्थितीत जगतो. हा वर्ग कायम दुर्लक्षित असतो, पण त्याची संख्या मोठी असते. आपण त्यांच्याकडे प्रथम पाहिलं पाहिजे.
अशा प्रकारे शिक्षकांनी आमच्यात कळतनकळत सामाजिक भानाची दृष्टी रुजवली. त्यामुळे मला नेहमी अशी लोक दिसत गेले. माझ्या कथांमध्ये सफाई कामगारांचे जीवन येते, त्यांच्याबद्दल काही कमेंट्स येतात किंवा आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलचे एक भाष्य येते. नातेसंबंध हा तर कायम कुठल्याही चांगल्या फिक्शनचा कोअर (गाभा) भाग असतोच. तर हे विषय येतात आणि ते पुढेही येत राहतील.

'काळेकरडे स्ट्रोक्स' किंवा इतर महत्त्वाच्या पुस्तकांवर काम करताना तुमची संशोधन पद्धती कशी असते?
उत्तर: विषय सामाजिक असतो तेव्हा त्या विषयाबद्दल वाचन करतो, लोकांशी बोलतो. किंवा एखादं पात्रं विशिष्ट क्षेत्रात काम करणारं असेल तर त्याबद्दल माहिती समजून घेतो. उदाहरणार्थ, आयटीमध्ये काम करणारं पात्र असेल तर मी माझ्या आयटीमधल्या मित्रांशी बोलतो. त्यांचे शेड्युल कसे असते, ते रोज काय करतात, कसे जातात, कसे येतात, त्या प्रवासामध्ये ते काय करतात वगैरे बाबी समजून घेतो. गप्पा मारतो. कधीकधी टिपणं काढतो. सफाई कामगार आणि त्यांचं जीवन हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्या घरी या वर्गातून येणाऱ्या मावशींशी मी बरेचदा बोलतो. त्यातून जी माहिती मिळते ती विषण्ण करणारी असते. त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो, तो फार वेळा मध्यमवर्गीय दृष्टिकोनापेक्षा निराळा असतो.
मला वाटतं, लेखकाने स्वतःचे सांगण्यापेक्षा लोकांचं ऐकून जास्त घेतले पाहिजे, लोक काय म्हणतायत, लोकांचे मुद्दे काय आहेत, लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या आतमध्ये काय खळबळ चालू आहे, हे समजून घेतलं पाहिजे. निरीक्षण चांगलं असलं पाहिजे. त्यातून तुम्हाला कॅरेक्टर्स मिळतात. मी खूप वेगवेगळ्या माणसांचे कॉम्बिनेशन करून एखादे कॅरेक्टर तयार करतो.
एखादी घटना समजा पुण्यात घडली असेल, तर त्यावरून कथा किंवा कादंबरी लिहिताना ही घटना मुंबईत घडली तर काय होईल असा विचार करतो. किंवा एखादी घटना कनिष्ठ मध्यवर्गीय पुरुषाच्या बाबतीत घडली, तर तिथे स्त्री असेल ती कशी रिअॅक्ट करेल याचा विचार करतो. म्हणजे पूर्ण उलटापालट करून काहीतरी नवीन घडतं आहे का, हे पाहायचं. त्यातून मला खूप वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा सापडतात. कारण पॉइंट ऑफ व्ह्यू हा महत्त्वाचा असतो. तो पार बदलून जातो.
कविता, कथा आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारातून तुम्हाला वेगळेपण काय जाणवते? यापैकी कोणता प्रकार तुम्हाला सर्वाधिक जवळचा वाटतो?
उत्तर: मला सगळ्यात जवळचा आणि आवडणारा साहित्य प्रकार आहे कविता. कविता हा खूप अद्भुत प्रकार आहे, पण दुर्दैव असे आहे की सध्या तो खूप लोकांना तो सोपा वाटतो. पण तो खरं तर तो सर्वांत कठीण प्रकार आहे. कवितेमध्ये तुम्हाला जे काही म्हणायचे आहे, त्याचा अर्क काढावा लागतो, प्रतिमा-प्रतीकांचा वापर करावा लागतो. कथेमध्ये कमीत कमी अवकाशात जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करायचा असतो, तर कादंबरीत मोठ्ठा अवकाश असतो. त्यामुळे भरपूर गोष्टी कवेत घेता येतात.
कादंबरी हा फार लवचीक प्रकार आहे. त्यात खूप शक्यता दडलेल्या असतात. त्याच्यात तुम्हाला खेळायला खूप जागा असते. कवितेत तुमचं सबकॉन्शस माईंड (सुप्त मन) जास्त खेळतं. कथा-कादंबरीमध्येसुद्धा ते खेळतं, पण त्यात जाणीवही तितकीच काम करते.

अनुवादक आणि संपादक म्हणून तुमचे अनुभव तुमच्या स्वतःच्या लेखनाला कशाप्रकारे समृद्ध करतात?
उत्तर: अनुवादक आणि संपादनाचे काम करताना माझ्या हाताखालून जवळपास आठवड्याला दोन ते तीन स्क्रिप्ट्स जातात. प्रत्येक लेखक वेगवेगळा असतो. त्याची शैली, आशय-विषय वेगवेगळे असतात. त्यामुळे भरपूर गोष्टी समजतात. संपादनामुळे काय करायला नाही पाहिजे हे सुद्धा समजते. या लेखकाने हे केले आहे, हे नको असते तर हे पुस्तक जास्त चांगले झाले असते असं वाटतं; मग आपण आपल्या लेखनाचा विचार करतानाही हे पाहिलं पाहिजे असा इन्ट्रोस्पेक्ट करणारा दृष्टिकोन तयार होतो. या दोन्ही कामांतून मला प्रत्यक्षात घेता न येणारे अनेक अनुभव घेता येतात.
एक उदाहरण देतो, मी अतुल कहाते यांचं सायबर सिक्यूरिटी संदर्भात एक पुस्तक संपादित केलं होतं. त्यात मला मला 'आयडेंटिटी थेफ्ट' (Identity Theft) ही संकल्पना समजली. आणि त्यावरून मला एक कल्पना सुचली की जर एखाद्या माणसाची आयडेंटिटी चोरली गेली तर? त्याची समाजमाध्यमांवरची आयडेटिंटी, प्रत्यक्ष आयडेंटिटी यात किती कसा गोंधळ उडेल? असा विचार करता करता मी सार्त्र-काम्यूच्या अस्तित्ववादी विचारांकडे गेलो. त्यातून 'आयडेंटिटी थेफ्ट' नावाची एक दीर्घकथा मी लिहिली.
साहित्य अकादमी सारखे पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या लेखन प्रक्रियेवर आणि वाचकांच्या प्रतिसादावर काही बदल जाणवले का?
उत्तर: लेखन प्रक्रियेत तसा बदल काही झाला नाही. जसं जसा मी शिकत गेलो आहे, तसतसा माझ्या प्रक्रियेत काही ना काही बदल होत गेले आहेतच आणि ते पुढेही होतील. पुरस्कार मिळाल्यामुळे अनेक लोकांपर्यंत ती कादंबरी पोहोचली, माझे नाव पोहोचले. खास करून तरुण मुलांना ते कळलं की अरे हा काहीतरी आपल्या आयुष्यातलं, आपल्याशी निगडित असं काहीतरी सांगतोय. पोच वाढली.
पुरस्कार मिळाल्यावर जबाबदारी वाढली, कारण हा जो पुरस्कार आहे तो युवा पुरस्कार आहे. तो तुम्हाला प्रोत्साहन म्हणून दिला जातो, तुम्ही आणखीन काम करावं यासाठी दिला जातो.
पात्रांची उभारणी करताना तुमची प्रक्रिया कशी असते? एखादी व्यक्तिरेखा पूर्णपणे काल्पनिक असते का?
उत्तर: पात्रांना जिवंतपणा देणं ही खूप ॲब्स्ट्रॅक्ट (Abstract) अशी प्रोसेस आहे. जर लेखकाने पात्रांना कठपुतळ्यांसारखं धरून ठेवलं, मला जे हवं आहे तसंच पात्र बोलेल, वागेल असा हट्ट केला. तर ती पात्रं खूप नीरस होतात. पात्रांना मुक्त सोडलं पाहिजे, त्याला त्याच्या पद्धतीने प्रवास करू दिला पाहिजे. ते पात्र कागदावर असलं तरी त्या पुस्तकाच्या विश्वात ते एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्याला थोडं आडव्या-तिडव्या मार्गांनी पण जाऊ द्यावं, तर ते इंटरेस्टिंग होतं.
सध्याच्या मराठी साहित्य विश्वातील नव्या पिढीबद्दलचे तुमचे निरीक्षण काय आहे?
उत्तर: सध्याची नवीन पिढी शॉर्ट फॉर्मचा जास्त विचार करतेय. कदाचित तो सोशल मीडियाचा परिणाम असेल. पण नवोदित लेखकांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. आधी तुमचं लेखन पूर्ण करा, त्यावर वेळ घालवा आणि मग त्याचं प्रमोशन करा हे तत्त्व अवलंबलं पाहिजे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन टाळलं पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं भरपूर वाचलं पाहिजे, लिहायचं असेल वाचनासारखा दुसरा रियाझ नाही. मी तर म्हणतो मी वाचतो, म्हणून मी लिहितो! मला वाटतं, नवी पिढ्याने यावर काम केलं पाहिजे.

एखादं पुस्तक लिहिताना त्याच्या विपणनाचा (Marketing) किंवा प्रसिद्धीचा भाग तुम्ही कितपत विचारात घेता? लेखकाच्या दृष्टीने पीआर (PR) आणि मीडिया धोरण कसे असावे असे तुम्हाला वाटते?
उत्तर: पुस्तक लिहिताना मी तेवढा विपणनाचा किंवा प्रसिद्धीचा विचार करत नाही. कारण मग कंटेंटवर (आशयात) कळत-नकळत परिणाम होऊ शकतो. अर्थात, कुठलाच लेखक असा काही पोकळीत जगत नसतो, तो समाजात जगतो, त्यामुळे नकळत त्याच्यावर काही परिणाम होतच असतात. पण किमान जाणीवपूर्वक काही परिणाम होऊ नयेत याची मी काळजी घेतो. जे मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे, त्यावर लिहिलं पाहिजे ते मी पूर्ण करतो आणि मग लिहून झालं की लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं याचा विचार करतो.
लिहून झाल्यानंतर एकदा त्यातून बाहेर पडल्यावर, त्या लिखाणाकडे त्रयस्थपणे बघायला लागल्यावर मी प्रसिद्धीचा नीट विचार करतो. माझ्या प्रकाशकांशी बोलतो की काय स्ट्रॅटेजी (Strategy) आखली पाहिजे. सोशल मीडियावरून काय करता येईल, इन्फ्लुएन्सर्सचा (Influencers) वापर कसा करता येईल, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या काही आयडियाज असतील तर त्या सुद्धा विचारात घेतो.
पूर्वी मनोरंजनासाठी साहित्य हे एकमेव साधन होतं. मग टीव्ही, रेडियो आले. आणि आता तर कथेला किंवा पुस्तकाला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे 'माझा पर्याय सुद्धा चांगला आहे' किंवा 'तुम्ही हा सुद्धा ट्राय करा' हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. आज इतकी वेगवेगळी माध्यमं हाताशी आहेत की, लेखकाने त्यांचा वापर करायलाच पाहिजे.
तुमच्या लेखनाचे चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये रूपांतर होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? असल्यास तुमच्या कोणत्या कादंबरीचे रूपांतर तुम्हाला करायला आवडेल आणि का?
उत्तर: हो, नक्कीच करावं असं मला वाटतं. 'काळेकरडे स्ट्रोक्स' या कादंबरीच्या माध्यमांतरासाठी मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं आणि विचारतात. 'हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा' कथेचं नाट्यरूपांतर झाले होते, त्याचे ३०-४० प्रयोग झाले. 'दिमित्री' मधल्या 'आठवणीची एक आठवणी' या कथेचे पण नाट्यरूपांतर झाले.
मला स्वतःला असं वाटतं की 'काळेकरडे स्ट्रोक्स'ची चांगली सीरीज होऊ शकते. त्याशिवाय '९६ मेट्रोमॉल'चं वेगळ्या पद्धतीने माध्यमांतर करता येऊ शकतं. कुण्या दिग्दर्शकाने तसा विचार केला तर मला आवडेलच. अजून तरी मी स्वतंत्रपणे पटकथा किंवा पटकथेत रूपांतर अशा दृष्टीने लेखनाचा विचार केलेला नाही, पण कोणी करायला तयार असेल तर मी त्याच्याबरोबर काम करायला मला आवडेल.
तुमची लेखनाची दैनंदिन दिनचर्या कशी असते? लिहिण्यापूर्वी आणि लिहिताना तुम्ही कोणत्या सवयी किंवा पद्धती अवलंबता?
उत्तर: माझी लिखाणाची दिनचर्या आता खूप फ्लेक्सिबल (Flexible) झाली आहे. तरीही माझा दिवस पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरू होतो आणि साधाणरतः संध्याकाळी सहा तो संपतो. कधीकधी कामं खूप असतील तर वेळ वाढते. पण साधारण संध्याकाळी सहा वाजता मी काम थांबवतो आणि मग सहा ते सात मी सात किलोमीटर चालायला जातो. या चालताना मला बरंच सुचतं, सुचलेल्या कथाबीजांवर विचार बरेचदा या वेळेत केला जातो.
मी सायमलटेनियसली खूप कादंबऱ्यांवर, कथांवर काम करत असतो. त्यांचे आराखडे तयार केलेले असतात आणि मग एकेक, हळूहळू कूर्मगतीने ती कादंबरी किंवा ती कथा पुढे सरकत जाते.
नवोदित लेखकांना मी एक अनुभव सांगेन. सुरुवातीला लेखनासाठी एक वेळ ठरवून घ्या. त्या वेळेत लिहायला बसणं चुकवायचं नाही. तुम्हाला जे वाटेल ते लिहा. नंतर ते फाडा. पण त्या ठरवलेल्या वेळात हात चालता राहिला पाहिजे. कारण लिहिणं म्हणजे कृती करणं. नुसत्या कल्पना सुचण्याला काही अर्थ नसतो. जसं जिममध्ये जाऊन शरीर कमावतो, तसंच हा सराव आहे.
नवोदित लेखकांना, विशेषतः मराठी भाषेत स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
उत्तर: सल्ला देण्याइतका मी काही मोठा नाही, पण अनुभवावरून सांगेन की लेखनाचा प्रकार कुठलाही असो, लेखन हा 'पेशन्स गेम' (Patience game) आहे. तो इन्स्टंट प्रकार नाहीये. तुम्हाला संशोधन करावं लागतं, विचार करावा लागतो, लिहावं लागतं. मग खर्डे करावे लागतात. पुन्हा पुन्हा लिहावं लागतं. आज लिहिलं आणि उद्या लगेच प्रसिद्धी मिळेल असं होत नाही, ती एक प्रोसेस (Process) आहे.
दुसरा महत्त्वाचा सल्ला असा की, तुमची आर्थिक बाजू संभाळा. क्रिएटिव्ह लेखनाचा एक प्रवाह चालू द्या, पण त्याचबरोबर तुम्हाला सपोर्ट देणारा कुठलातरी जॉब किंवा काम चालू असू दे. 'लेखक हा फकीर असतो' अशा रोमँटिक मिथकांपासून प्लीज बाहेर या. आर्थिक बाजू कमकुवत असेल तर सर्जनशीलता जपणं कठीण होतं. तुमचं लिखाण हे एखाद्या 'म्युच्युअल फंडा'सारखं असतं. त्याचे रिटर्न्स लगेच मिळत नाहीत, पण काही काळानंतर एक कॉर्पस जमा होतो आणि चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढीस लागते.

सध्या तुम्ही कोणत्या विषयावर किंवा साहित्य प्रकारांवर काम करत आहात?
उत्तर: मी सध्या चार-पाच कादंबऱ्यांवर किंवा कथानकांवर काम करत आहे. 'के-कनेक्शन' या प्रकारातलं पुढचं 'पी-कनेक्शन' नावाच्या पुस्तकावर काम करतोय. 'माणूस आणि पुस्तकं' यांच्यातले आंतरसंबंध यावर एक फिक्शन लिहितोय. क्लायमेट चेंजवर (Climate Change) लिहायची इच्छा आहे, त्यासाठी टिपणं काढून ठेवली आहेत. काही मर्डर मिस्ट्रीज (Murder Mysteries) लिहिण्याचं डोक्यात आहे.
अर्जुनावर कादंबरी लिहिल्यावर आता 'भीष्मां'च्या कादंबरीवर काम करतो आहे. याशिवाय, मी ११ महिन्यात २६ किलो वजन कमी केलं होतं. त्यानंतर मी ते तीन वर्षं मेंटेनही ठेवलं. या त्या अनुभवावर आधारित एक नॉन-फिक्शन पुस्तक लिहितोय.
वाचकांशी संवाद टिकवण्यासाठी तुम्ही कोणती माध्यमं अधिक वापरता? वाचकांच्या प्रतिसादाला तुम्ही कितपत महत्त्व देता?
उत्तर: वाचकांच्या प्रतिसादाला मी भरपूर महत्त्व देतो. आवडलेलं सांगणारे वाचक तर महत्त्वाचे असतातच, पण नावडलेलं सांगणारे वाचकही मला आवडतात. त्यांनी गांभीर्याने घेतो. त्यांना काय आवडलं नाही हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. सर्व वाचकांना मी आवर्जून उत्तरं देतो.
वाचकांपर्यंत ज्या ज्या माध्यमातून पोहोचता येईल, ते ते मी वापरतो; सोशल मीडिया, बुक इन्फ्लुएन्सर्स, वृत्तपत्रांतील परीक्षणं, रेडियो, पॉडकास्ट अशा सगळ्याचा मी वापर करतो.
जर तुम्हाला माझ्या पुस्तकांबद्दल किंवा माझ्या लेखांबद्दल माझ्याशी संपर्क साधायचा असेल किंवा माझ्या पुस्तकांबद्दल / लेखांबद्दल काही विचारायचे असेल तर माझ्या ईमेल पत्त्यावर माझ्याशी संपर्क साधा:
तसेच मला इंस्टाग्राम वर फॉलो आणि मेसेज करू शकता - इंस्टाग्राम id : https://www.instagram.com/storytailor_pranav/?hl=en

Comments