google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

काश्मीर : सनातन संस्कृतीचा पायाभूत प्रदेश - उल्का देवरुखकर

काश्मीर म्हटलं की आज बहुतेकांच्या डोळ्यासमोर मुस्लिम बहुल परिसर, राजकीय अस्थिरता आणि संघर्षाची भूमी उभी राहते.

पण ही भूमी त्याहीपेक्षा अधिक महान आहे — ही आपल्या वैदिक संस्कृतीची, ऋषी-परंपरेची, आणि ज्ञानाच्या उगमाची भूमी आहे.




'काश्मीर' या नावामागे एक ऋषीकथा दडलेली आहे.

कधीकाळी हे संपूर्ण क्षेत्र ‘सतीसर सरोवर’ या विशाल जलाशयानं व्यापलेलं होतं, जे राक्षसांनी ग्रस्त केलं होतं.

तेव्हा ऋषी कश्यपांनी तपश्चर्या करून त्या राक्षसांचा संहार केला आणि ते पाणी आटवलं.

त्या जागी जी सुंदर भूमी प्रकट झाली, तिचं नाव पडलं – कश्यप-मीर (कश्यपाची भूमी) — आजचं काश्मीर!


हीच ती भूमी जिथे शारदा देवीचं प्राचीन मंदिर होतं.

शारदा पीठ हे ज्ञान, वेद, तत्त्वज्ञान आणि शास्त्रांचं केंद्र होतं.

संपूर्ण भारतातून विद्वान, वेदपाठी ब्राह्मण, तत्त्वज्ञ येत आणि इथे अध्ययन- अध्यापन करीत.


आदि शंकराचार्य सुद्धा याच भूमीवर आले. त्यांनी शारदा पीठ गाठलं, आणि सरस्वती स्थानावर त्यांनी आपला अद्वैत वेदान्ताचा ठसा उमटवला.



काश्मीर ही बौद्ध संस्कृतीचंही महान केंद्र होतं.

येथे अनेक बौद्ध विहार होते. धर्मशक्ती, तत्त्वज्ञान आणि शांततेचं प्रतीक असलेल्या या विहारांनी काश्मीरच्या भूमीला समृद्ध केलं.


हिंदू धर्मातील शक्तिपीठे देखील येथे आहेत — वैष्णो देवी, अवंतिपुरचं अवंतीश्वर मंदिर — या आजही त्या पौराणिक आणि आध्यात्मिक परंपरेच्या साक्ष आहेत.


ललितादित्य मुक्तपीड, याला काश्मीरचा शिवाजी मानलं जातं.

त्याच्या राजवटीत काश्मीरने सामर्थ्य, कला, स्थापत्य, आणि धर्म यांचा त्रिवेणी संगम अनुभवला.


याच भूमीत अभिनवगुप्त या महान शैव तत्त्वज्ञाचं जन्मस्थान आहे.

त्याने काश्मीर शैवदर्शन, रसशास्त्र आणि नाट्यशास्त्र या विषयांवर अभिजात ग्रंथ लिहिले. आजही तो भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वोच्च गुरू मानला जातो.





एक सुंदर सांस्कृतिक संदर्भ असा आहे की,

“तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा...” हे प्रसिद्ध गाणं

मार्तंड ऋषींनी बांधलेल्या प्राचीन सूर्य मंदिराजवळ चित्रित केलं आहे —

ही वास्तू आजही काश्मीरच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देते.


काश्मीर ही केवळ भूप्रदेश नाही — ती आपल्या वैदिक वारशाची, ऋषीसंस्कृतीची आणि आत्म्याच्या शाश्वत प्रकाशाची भूमी आहे.

आज गरज आहे ती, या सत्याला पुन्हा ओळखण्याची आणि आपल्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्याची.


ही ती भूमी आहे जिथे ज्ञान फुललं, संस्कृती नांदली आणि आत्म्याचं तेज प्रकट झालं.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page