google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

प्रयोगशाळेतील उंदरांची शर्यत

ससा की कासव? ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला बालपणापासूनच माहिती आहे. या गोष्टीमध्ये चपळ असून सुद्धा, सुरुवातीला कितीही पळाला तरी... मधल्या काळात सुंदर थंडगार झाडाच्या सावली खाली झोपल्यामुळे, ससा हरतो. हळूहळू चालणारे कासव चालत राहते.. चालत राहते. आणि त्याला दिलेला टप्पा पूर्ण करून जिंकते. पण माणूस... इथेच चुकतो. तो गोष्ट ऐकतो, वाचतो. मुलांना सांगतो. पण प्रत्यक्षात या गोष्टीत दडलेला मतितार्थच त्याला समजत नाही. गोष्टीतून कुठलाही बोध तो घेत नाही. तुम्ही मुलांना कितीही चांगले वातावरण करून दिले, तरी सुद्धा... प्रत्येकाची बुद्धी आणि हुशारी ही वेगवेगळी असते.



मुले कितीही हुशार असली तरी प्रत्येक मूल, हे सर्वच विषयात हुशारी दाखवू शकत नाही. आकलन करू शकत नाही. काहींना इतिहास सोपा जाईल तर काहींना मराठी. अवघड जाईल इंग्रजी, गणित. बुद्धी आणि हुशारी ही निसर्गातून मिळणारी देणगी आहे. काहींना ती अनुवंशिकतेने मिळत असते, हा भाग त्यात आलाच. तर काहींच्या बुद्धीचा प्राप्त परिस्थितीनुसार विकास होत जातो. प्रत्येकाच्या बुद्धीच्या कुवतिचा टप्पा ठराविक ठिकाणापर्यंत तरी ठरलेला असतोच ना? खूप हुशार आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी सर्वच मुले जीवनाच्या शेवटापर्यंत यशस्वी होतातच! असे आपणास दिसत नाही.


नाव, प्रतिष्ठा, मान-मरातब, सन्मान या सर्व गोष्टी मानवाला प्रिय आहेत. समाजात प्रत्येकाला एक उच्च स्थान हवे असते. त्यासाठी काही लोक काहीही करायला तयार होतात. जसे चार चार मुले मुली असून सुद्धा वृद्धपणी व आजारपणात आईबापांना न सांभाळणारे दिवटेही जन्माला येतात. ते जिवंत असतानाच शेती घरे दारे आपल्या नावावर करून, त्यांना हाकलून देतात किंवा स्मशानात नेऊन सोडतात. अशी उदाहरणे तर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 'आम्हाला आमच्या परिस्थितीमुळे शिकता आले नाही.' मग ते आपल्या स्वतःच्या मोठ्या अपेक्षा मुलांमध्ये पाहतात. 'आपली मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील होतील,' अशी स्वप्ने त्यांना पडतात. सध्याची महागाई पाहता मुलांच्या शिक्षणावर अतोनात खर्च होत असतो. या ठिकाणी मुलांची असणारी बुद्धी, हुशारी आणि परीक्षेत पडणारे मार्क्स...या वास्तवाचे भानही पालकांना असावे लागते.


सांगली जिल्ह्यातील, आटपाडी तालुक्यातील नुकतीच घडलेली घटना खुपचं वाईट आहे. स्वतःच्या जन्मदात्या बापाने मुलीला सराव परीक्षेत थोडे कमी गुण मिळाल्याने, जात्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली व त्यात तिचा जीव गेला. म्हणजे त्याने तिचा खुनचं केला...असेच आता म्हणावे लागेल. सराव परीक्षेत फक्त ९४ गुण मिळाल्यावर त्याने जाब विचारला? त्यावर तिनेही प्रत्युत्तरादाखल सांगितले की, 'तुम्हालाही कमी गुण मिळाले होते.


अन् शिक्षकचं झालात ना?' खरे तर.. जुन्या काळात एक म्हण होती. 'मुलीचा खांदा आपल्या खांद्याबरोबर आला, आणि बापाची चप्पल मुलाला आली की त्याने, वेळ व काळ ओळखून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागायला पाहिजे.' ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या शिक्षक पालकाला तर याचे चांगले ज्ञान असायला हवे होते. त्या मुलीच्या ठिकाणी मुलगा असता तर कदाचित, मुलाला मारल्यावर त्याने... बापाला हाताखालून सुद्धा काढले असते. अशा घटना आपण समाजात काही प्रमाणात ऐकतो. आणि... इथेच तिने गोता खाल्ला. बापाच्या दुखऱ्या नसेवर मुलीने पाय दिला. मारण्यासाठी बेभान झालेल्या बापाला कसलेच भान राहिले नाही. आणि... जीवानीशी गेली बिचारी. पुन्हा कधीही न येण्यासाठी.


सोशल मीडियावर बऱ्याच वेळा फिरणारा एक मेसेज तर प्रत्येकाने नक्कीच वाचला असेल. ९४

टक्के मार्क्स मिळवणाऱ्या मुलाचे पालक त्यांच्या मुलावर खूप नाराज असतात. '९५ का नाही पाडले? एक टक्का कमीच मिळाला. ' तर ३६ टक्के मिळवणाऱ्या मुलाचे पालक आनंदाने पेढे वाटत असतात. ९४ टक्के वाल्यांनी, ३६ % वाल्यांना विचारल्यावर, त्याचे पालक म्हणतात. 'तो पास झाला हेच विशेष आहे. आम्हाला तो पास होईल की नाही, याची सुद्धा खात्री नव्हती.' मग त्या आनंदाच्या भरात ते पेढे वाटत होते. आणि ९४ % मार्क्स मिळालेल्या मुलाच्या पालकांच्या बुद्धीची कुणालाही किवचं करावी वाटेल.



एवढे चांगले मार्क्स मिळाल्यावर खरे तर त्या मुलाच्या पाठीवर, खूप मोठ्या शाब्बासकीची गरज त्याला होती. प्रत्येकाचा भविष्यकाळ उज्वलही असू शकतो. दहावी झाल्यानंतर सुद्धा काही मुले समजूतदार होतात आणि नंतर शिक्षणात, नोकरीत व उद्योगधंद्यात प्रगती करतात. बारावी झाल्यानंतर शिक्षणाच्या, नोकरीच्या आणि जीवन जगण्याच्या अनेक शाखा सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध आहेत. याचा विचार फक्त काही सुजाण पालकच करतात. शिक्षण, संगीत, चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, चित्रपट, नाटक इ. क्षेत्रामध्ये नंतरच्या काळामध्ये, अगदी हेवा वाटेल अशी हिऱ्यासारखी आणि ताऱ्यासारखी मुले चमकत असतात.



मोठ्या पदावर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या शालेय परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडलेले नसतात. आणि... हो! जीवन जगत असताना जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक माणसाला, गरजेच्या असलेल्या विविध गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या प्रत्येक व्यवसायाची या भूतलावर गरज आहे. फक्त वाटा शोधल्या आणि सापडल्या पाहिजेत. त्यांचा दम आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकला पाहिजे. मुलांना नकार पचवायला शिकवला तरच ते पुढील जीवनात यशस्वी होतील.


इथे तुम्हाला प्रयोगशाळेतील उंदरांची एक गोष्ट सांगतो. प्रयोग शाळेत उंदरांच्या मेंदूवर संशोधन करण्यात येणार होते. त्यासाठी शास्त्रज्ञाने त्याच्या हाताखालच्या शिपायाला दहा उंदीर घेऊन येण्यास सांगितले. शास्त्रज्ञाला त्यातील फक्त पाचच चपळ उंदरांची गरज होती. मग त्याने शिपायाला सांगितले, 'या सर्व उंदरांची शर्यत लावूया.' शिपायाने सर्व दहा उंदीर पिंजऱ्यातून सोडले. व त्यातून चपळ अशा पाच उंदरांना एका पिंजऱ्यात अंधाऱ्या खोलीत ठेवले.


राहिलेल्या पाच उंदरांना दुसऱ्या पिंजऱ्यातून बाहेर परिसरात सोडून, शिपाई घरी निघून गेला. अंधाऱ्या खोलीतील चपळ पाच मधील प्रत्येकाला आपला पहिला नंबर यावा. असे वाटत होते. शास्त्रज्ञ त्यांना सांगत होते... 'तुमचा नंबर माझ्या संशोधनातील गरजेवर अवलंबून आहे. तुमचा प्रत्येकाचा नंबर नक्की येईल...' पालकहो... विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांच्या बुद्धीचा, मेंदूचा जरा विचार करा. रिझल्टच्या चिंतेत आत्महत्या असतील. अथवा नोकरी न लागल्यामुळे असतील. 'प्रयोगशाळेतील उंदरांची शर्यत, तुम्ही लावू नका....!' गोष्ट संपली.


डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर (पुणे )

9766550643

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page