लग्नसंस्था: प्रेम, विश्वास आणि बांधिलकीचा पाया
- Neel Writes

- Jul 1, 2025
- 4 min read
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।।
'लग्न दिवस, मुहूर्त हा शुभ आणि मंगलकारी असतो. त्यात चंद्र, तारे, विद्या आणि देवतांचे बळ असते. या शुभ मंगल समयी आपण लक्ष्मीपती श्रीविष्णूचे स्मरण करावे...' या श्लोकाच्या ओळी आपण अनेक लग्नांमध्ये, मंगलाष्टका झाल्यावर.. शेवटच्या अक्षता टाकून टाळ्या वाजल्या की, भटजींच्या तोंडून शेवटी ऐकतो. आणि लग्न पार पडते. घर नवऱ्याचं असेना की नवरीचं... लग्न घरामध्ये लग्नाच्या अगोदर चार आठ दिवसांपासूनच पाहुणेरावळ्यांची रेलचेल आणि धांदल उडालेली असते. लगीनघाईच असते म्हणा ना! मांडव डहाळे, ताशा वाजंत्री, बँड... सनई चौघडे. आदल्या रात्री नवरा नवरीच्या आणि कलवरे-कलवऱ्या यांच्या हातावर काढलेली लाल भडक मेंदी. लग्नाच्या दिवशी दोन्हीकडच्या वऱ्हाड्यांना जानुसवाडा दिलेला असतो. त्यापुढे रुखवत मांडलेला. मुलांनी खाण्याच्या पदार्थांमध्ये हात घालायला नको म्हणून... नाकात नथ आणि नवं कोरं नऊवारी लुगडं घालून एक आजी सुद्धा राखणदारीसाठी खुर्चीवर बसली असते. सप्तपदी, अगदी वर्धावा.. तरी आठवतो का? काय म्हणता तुमच्या मुला मुलींची अजून लग्न झाली नाही? वय झाले 30..40.. बापरे! 'आमच्या नशिबात कुठे आहेत हे योग?' मग व्हाट्सअप वर एक जोक नेहमी फिरत असतो. 'आता थोडेच दिवस शिल्लक राहिले तेवढ्यासाठी कुठे करताय लग्न!' चुकतंय ना! हे सर्व कुठेतरी?

पूर्वीच्या काळी मुला मुलींची लग्न पाळण्यातच लावून दिली जायची. नात्यातल्या नात्यात अशी लग्न लावण्याचा प्रथा त्याकाळी होता. भावाची मुलगी सून म्हणून करण्याचा किंवा मामाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारण्याची प्रथा त्याकाळी होती. नात्यानात्यात एकमेकांवर खूप विश्वास असायचा, आणि तो प्रत्येकाच्या हातून, मनातून, तोंडून पाळलाही जायचा. पुढे काळ बदलला. रक्ताच्या जवळच्या नात्यांमध्ये लग्न करणे बंद झाले. आठ दहा.. चौदा वर्षांपर्यंतच्या मुला मुलींची लग्न होऊ लागली. पसंती अशी कधी नव्हतीच. घरचे वयोवृद्ध आणि जेष्ठ नागरिक मुलगी पाहण्यासाठी जात. मुलगी पसंत पडली की, मुलांना एकमेकांना न दाखवता लग्न ठरवले जायचे. सुपारी फुटायची. आणि सासू-सासरे असतील, आजे सासू-सासरे असतील त्यांच्या हाताखाली राहून, संसार कडेला नेला जायचा. काबाड कष्टाचा संसार तो. त्या काळी तर अनेक अडचणी येत असत. पण नेटाने आणि खांद्याला खांदा लावून एकमेकांना साथ देऊन तो वाढवला जायचा, आणि भरभराट होत, सुख-समाधान शेवटी का होईना, पण यायचे.
'बालवयात संसाराचे ओझे झेपणार कसे?' म्हणून काळ बदलल्यावर, 'बालविवाह प्रतिबंधक कायदा' आला. मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ अशी ती सज्ञान झाल्यावरच आणि आर्थिक स्थिरस्थावर झाल्यावर त्यांची लग्न लावून दिली जावू लागली. दहावी, बारावी, ग्रॅज्युएट झाल्यावर लगेचच नोकऱ्या मिळायच्या. आणि नातेवाईकांमधून सुंदर, अनुरूप मुली पटकन सुचवल्या जायच्या. परिस्थितीची ऐपत नसताना सुद्धा, आई-वडिलांकडून कर्ज काढून मुलींची लग्न लावून दिली जायची. 'उत्तम नोकरी आणि कनिष्ठ व्यापार..' असा तो जुना काळ होता. देशाची अर्थव्यवस्था शून्य बजेटवर आल्यावर नोकऱ्यांची परवड होऊ लागली. माणसे व्यापाराकडे वळू लागली. व्यापारामध्ये जास्त पैसा मिळू लागला. पुन्हा सहावा, सातवा वेतन आयोग मिळाल्यावर आणि आय. टी. क्षेत्रातील व डॉक्टर व इंजिनिअरिंग मधल्या आणि पुढच्या पुढच्या शिक्षणामुळे, हे चक्र पुन्हा उलटे फिरू लागले. करियरच्या नादाला लागून लग्नाचे वय कधी वाढत गेले ते कळलेच नाही.
गर्भ लिंग शोध आला. 'वंशाला दिवा...मुलगाच हवाच! ' म्हणणाऱ्यांनी मुलींचे जन्माआधीच गर्भपात केले. भ्रूण हत्या केली. आता... निसर्गाने त्याचा चमत्कार दाखवला. १००० हजार मुलांमागे ७०० पर्यंत मुलींचे प्रमाण झाले. मग, लग्नासाठी मुलींची संख्या कमी पडू लागली. राजे महाराजांचे सोडा. पूर्वीचा काळ आठवा. काहींची दोन दोन लग्न राजरोस पणे होत असत. 'द्विभार्या प्रतिबंधक कायदा' आला आणि, एक तरी नवरी मिळू लागली होती. पण या वंशाच्या दिव्याच्या हट्टपायी, एक पण नवरी मिळायचा वांधा झाला.
शेतकऱ्यांच्या मुलांना तर मुलींच मिळेनाश्या झाल्या आहेत. त्यामुळे लग्नाला तयार होणाऱ्या काही मुली आता नवरदेवाला सर्रास गंडा घालू लागल्या आहेत. तो त्यांचा व्यवसाय असल्यासारखा. अशा लग्नाळू मुली त्यांच्या दोन-तीन साथिदारांबरोबर कपट करू लागतात. लग्न झाल्यानंतर एक दोन दिवसातच सर्व दाग-दागिने घेऊन रात्रीतून पळ काढतात. ग्रामीण भागातून झालेले असे प्रकार वर्तमानपत्रात आपल्याला काही वेळेला वाचायला मिळतात. त्यातही अशा प्रकारे फसवणूक झालेले सर्वच कुटुंब पोलिसात तक्रार किंवा वृत्तपत्रांमध्ये धाव घेतीलच असे नाही.
लग्नाच्या चार दोन दिवस आधी, आदल्या दिवशी रात्री किंवा लग्नाच्या दिवशी हळद लावली जाते. हळद लागल्यावर मात्र नवरा नवरी ने आपापले घरदार सोडून लांब कुठे भटकायला जायचे नसते. अंगाला हळद लावलेल्या, आणि एक दिवसासाठी देवाची उपमा दिलेल्या या नवरा नवरीला बाहेर गेल्यावर, भुताखेताची बाधा होईल. अशी शंका त्याकाळच्या वडीलधाऱ्या माणसांमध्ये होती. तर आता सध्याच्या परिस्थितीत या भुताखेतांची तर नाही, परंतु लग्नापूर्वी असणाऱ्या प्रेम संबंधांमधून, बाधा होऊन पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता लग्नापूर्वीचे म्हणजे प्री-वेडींग चित्रीकरणाचे आकर्षण प्रचंडरीत्या वाढले आहे. काही महाभाग तर, हे शूटिंग गोव्याला चार-पाच दिवस करतात. आणि तिथे होऊ घातलेल्या या मुला-मुलींमध्ये, येणाऱ्या सहवासातून लग्नापूर्वीच, हे ठरलेले लग्न मोडल्याचे जाहीर करतात.
ज्याला लग्न जमवताना काय बघायचे ते कळत नाही, तोही हे वारंवार म्हणतो, 'दोघांची पत्रिका जुळत नाही.' हे विधान हल्ली विवाह इच्छुक मंडळींच्या घरच्यांकडून फार वेळा ऐकायला मिळत आहे. 'मुलगा, होतकरू पहावा,' असे पूर्वी म्हटले जायचे. शिक्षण, नोकरी आणि निर्वसनी मुलगा आहे का? हे जरूर पहावे. पण... आता... गलेलठ्ठ पगार, मॅनेजर, फ्लॅट, बंगला, चारचाकी गाडी, एकटा हवा आणि जमीनही हवीच. अशा न मिळणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकावेळी या सर्व अपेक्षा कशा पुर्ण होणार? आपणही एकदा आरशात डोकवायला हवे, म्हणजे डोकं ताळ्यावर येईल. उशिरा लग्न झाले तरी स्वातंत्र्य व स्वैराचार यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हुंडा बंदी कायदा आहे तरी, उच्चशिक्षित श्रीमंतांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने नवीन लग्न झालेल्या स्त्रियांचे छळ सुरुच आहेत. उशिरा लग्न होणाऱ्यांकडे भरपूर पैसा आहे म्हणून, लग्नाच्या अमिषाने त्यांना कोटी कोटी रुपयांचा गंडा सध्या ऑनलाईन घातला जात आहे.
'लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.' अशी आपल्याकडे म्हण आहे. स्वर्ग हाच.. आणि नरकही हाच. 'तुमचं बाशिंगबळ नाही,' असे जुने लोक म्हणत असत. प्रत्येकामध्ये काही ना काही गुणदोष असतातच. आपल्याला सांगून येणाऱ्या ५-१० स्थळामध्येच चतुराईने जुळवून घ्यायला शिका. 'संसार हा आयुष्यभर तडजोडीचा भाग आहे.' मंगळ असलेल्यांची, मंगळ नसलेली दुसरी आणि मुला मुलींचे कितीही गुण जुळवून देणाऱ्या जन्मपत्रिका तयार करून मिळतात. आणि ही सर्व जुळवून केलेली लग्न सुद्धा, अल्प कालावधीतच कोर्टाच्या पायरीवर असंख्य प्रमाणात हजर झालेली दिसतात. समाज काय म्हणेल या भीतीमध्ये, 'ऋण काढून लग्न करू नका.' आहेर घेणे ही प्रथा आता कमी झाली आहे. तरीसुद्धा ती पूर्ण बंद करा. म्हणजे मानपानही पुर्ण बंद होतील. लग्नात वाचलेले पैसे मुला मुलींच्या नावावर टाका. भविष्यात अडीअडचणीच्या काळात त्यांना ते कामाला येतील. भाषणांमुळे एक ते दीड तास लग्न उशिरा होतात. तुमच्या जवळचे नातेवाईक फक्त तुमच्याकरिता लग्नासाठी अमूल्य वेळ खर्च करून लांबून लांबून येतात, त्यांच्यासाठी भाषणे बंद करू, तुम्हीच दिलेली लग्नाची शुभमुहूर्ताची वेळ पाळा. भारतीय संस्कृतीची ही आदर्श लग्नसंस्था अशी टिकली पाहिजे. लवकर लग्न झाले तर, वरबाप, वरमाई, वधू पिता, वधू माता आणि तुमची या जन्माची तरी काळजी संपेल! असे वाटते.
लेखक-
डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर (पुणे)
9766550643




Comments