google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

सरस्वतीबाई फाळके : भारतीय चित्रपटसृष्टीच्या आधारस्तंभावर उभं राहिलेलं एक अबोल सामर्थ्य

आज आपण सशक्त स्त्रीत्वाच्या अनेक उदाहरणांकडे पाहतो — अगदी विज्ञान, कला, उद्योग, नेतृत्व, राजकारण, मीडिया अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांची भरीव कामगिरी दिसते. अभिनेत्री, मॉडेल, दिग्दर्शिका, निर्मात्या या नावाने अनेक स्त्रिया आज आपल्या स्वप्नांना जाणीवपूर्वक दिशा देत आहेत. पण हे शक्य झाले आहे कारण कुणीतरी कुठेतरी ‘पहिलं पाऊल’ टाकलं. स्त्रियांनाही हे क्षेत्र आहे, त्यांनाही ही संधी मिळू शकते — हे दाखवून देण्यासाठी एक आदर्श उभा केला.



भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून आपण ज्यांना ‘दादासाहेब फाळके’ म्हणतो, त्यांच्या यशामागे एक अबोल, नोंद न घेतलेलं, पण तितकंच महत्त्वाचं नाव आहे — सरस्वतीबाई फाळके.


आज जर आपण मोठ्या अभिमानाने चित्रपट बघतो, त्या जगात करिअर करायचे स्वप्न पाहतो, तर ते केवळ दादासाहेब फाळकेंच्या परिश्रमामुळे नाही, तर सरस्वतीबाईंनी केलेल्या त्याग, समर्पण आणि पाठबळामुळेही शक्य झालं आहे.


सरस्वतीबाई फाळके यांच्याबद्दल फारशा नोंदी उपलब्ध नाहीत. त्यांचे जीवन म्हणजे एक अबोल सेवा आणि त्यागाची गाथा आहे. त्या शिक्षित नव्हत्या, फारसे बाहेरचे जग माहीत नव्हतं. पण त्यांच्या स्वाभाविक कणखरपणामुळे आणि नवऱ्याच्या स्वप्नांवर असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळे त्या एका ऐतिहासिक परिवर्तनाच्या साक्षीदार ठरल्या.


Saraswati phalke full family
Saraswati phalke full family


दादासाहेब फाळके हे एक स्वप्न पाहणारे माणूस होते — भारतीय लोकांसाठी भारतीय चित्रपट बनवायचं. हे स्वप्न फार मोठं होतं, आणि त्याला पूर्णत्व मिळण्यासाठी प्रचंड आर्थिक, मानसिक, सामाजिक संघर्षाचा सामना करावा लागला. अशा वेळी सरस्वतीबाई या केवळ एक पत्नी म्हणून नव्हे, तर एका खऱ्या सहकारी आणि आधारस्तंभाच्या भूमिकेत उभ्या राहिल्या.


फाळके कुटुंबाला अनेकदा उपासमारीचा सामना करावा लागला. त्यावेळी सरस्वतीबाईंनी आपलं सगळं सोनं विकून नवऱ्याच्या स्वप्नासाठी आर्थिक मदत केली. त्यांचा संसार उध्वस्त होत होता, पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी एक दिवससुद्धा नवऱ्यावर राग केला नाही की त्याच्या स्वप्नांना कमी लेखलं नाही. उलट, त्यांनी स्वतः काम करायचं ठरवलं — कपडे शिवणे, जेवण बनवणे, मुलांचं संगोपन करणे — सगळं एकहाती केलं.


जेव्हा फाळके यांना इंग्लंडला जावं लागलं, तेव्हा घर, मुलं, व्यवहार — सर्व काही सरस्वतीबाईंनी सांभाळलं. आज एका मोठ्या यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे आपण सहज सांगतो, पण सरस्वतीबाईंनी ते आपल्या कृतीतून सिद्ध केलं.


जेव्हा "राजा हरिश्चंद्र" चित्रपट बनवला जात होता, तेव्हा स्त्रिया अभिनय करायला तयार नव्हत्या. तेव्हा एकेकाळी पुरुषांना स्त्रियांची भूमिका करावी लागत होती. अशा काळात सेटवर जेवण, मेकअप, वस्त्रांची व्यवस्था — ही सर्व कामं सरस्वतीबाईंनी सांभाळली. त्या चित्रपटाच्या सेटवरील एकमेव महिला होत्या.



त्यांचं एक काम होतं कलाकारांना तयार करणं, त्यांना समजावणं, घाबरलेल्या स्त्रीभाषेतील संवाद बोलायला शिकवणं, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं. म्हणजे त्या केवळ 'बॅकस्टेज' नव्हत्या, तर त्या त्या चित्रपट प्रक्रियेचा एक भाग होत्या — एक महत्त्वाचा भाग.


She is an inspiration for new generation

आज अनेक स्त्रिया अभिनयाच्या क्षेत्रात येतात. त्यांचा आत्मविश्वास, बोलणं, सादरीकरण कौशल्य लाजवाब असतं. पण त्याचा पाया कुणी रचला? या सगळ्याचा आरंभ कोठून झाला? त्याच्या उगमस्थळी सरस्वतीबाई उभ्या आहेत.


आपल्या नवऱ्याच्या स्वप्नांमध्ये आपलं अस्तित्व मिसळून, स्वतःच्या साऱ्या आकांक्षा बाजूला ठेवून, केवळ तो यशस्वी व्हावा म्हणून सर्वस्व अर्पण करणार्‍या त्या स्त्रीचं स्मरण आपण करत नाही.


सोनं विकून मदत करणं – दादासाहेब जेव्हा आर्थिक अडचणीत होते, तेव्हा सरस्वतीबाईंनी साखळी, कानातली, बांगड्या — सगळी दागिने विकली.


'राजा हरिश्चंद्र' च्या शूटिंगदरम्यान सरस्वतीबाईंनी घर चालवणं, आणि सेटवर देखील वेळ देणं अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली.


त्या काळात महिला शिक्षण, काम, निर्णय या बाबतीत मागे होत्या, तरीही सरस्वतीबाईंनी नवऱ्याच्या कलात्मक ध्येयाला जिवंत ठेवण्यासाठी संयम, विश्वास आणि बांधीलकी ठेवली.


यशाच्या झगमगाटामागे अनेक अबोल यंत्रणा असतात — ज्या स्वतः झळकण्यापेक्षा दुसऱ्याला झळकवण्याचं महत्त्व ओळखतात. त्यांची साधी राहणी, संयमित वागणूक, त्यागी वृत्ती आणि न बोलता साथ देणं — हे सारे गुण आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत.


आज दादासाहेब फाळके यांचा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या नावाने संस्था, महोत्सव, आणि सन्मान दिले जातात. पण सरस्वतीबाईंचं नाव कोणी घेतं का?


आज काळानुसार आपण अनेक गोष्टी सुधारतो, नवीन मूल्यं स्वीकारतो. मग आपण सरस्वतीबाईंना इतिहासाच्या फडताळातून काढून, त्यांच्या कार्याचं सन्मानानं स्मरण का करू नये?


आजची स्त्री स्वप्न बघते, त्या दिशेने निघते आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढते. त्या प्रत्येक स्त्रीसाठी सरस्वतीबाई फाळके हे नाव एक प्रेरणास्तंभ आहे


त्यांच्या त्यागाला, प्रेमाला, आणि साहाय्याला मानाचा मुजरा करायला हवा. 🙏🙏🙏


– उल्का देवरूखकर

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page