google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

‘जागतिक युवा कौशल्य दिन’ हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा

कासारआंबोली, पुणे: दि. १५ जुलै २०२५ रोजी कासारआंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जगभरातील सुमारे ४५ कोटी तरुण (१५ ते २४ वयोगटातील) शिक्षण, प्रशिक्षण किंवा रोजगारापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन तरुणांच्या सुप्त गुणांना आणि कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. रेणू पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.



या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील पदवीधर आदिती पाटील आणि कॉम्प्युटर इंजिनीअरिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आकृती सिंग यांना आमंत्रित करण्यात आले होते. या दोन्ही यशस्वी युवा पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि कौशल्य विकासाची गरज अतिशय सोप्या आणि प्रेरणादायी पद्धतीने समजावून सांगितली. प्रत्येक व्यक्तीमध्ये कला, विद्या आणि कौशल्य निसर्गतः असतात, आणि प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात, असे त्यांनी नमूद केले.



संयुक्त राष्ट्र महासभेने २०१४ मध्ये ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिनाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये रोजगारक्षम कौशल्यांचा विकास करणे, उद्योजकता वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. आजच्या युगात मेहनती असूनही अनेक तरुणांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत तरुणांनी आपल्या कौशल्यांच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी छोट्या-मोठ्या उद्योगांची सुरुवात करणे महत्त्वाचे आहे, असे प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.



या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे आणि सौ. यशस्विनी भिलारे यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त आणि कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलने या दिनाच्या निमित्ताने तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा केला.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page