पिकलं पान (डॉ. प्रवीण डुंबरे यांच्या,प्रतिबिंब या काव्यसंग्रहातून)
मातीतून, दगडाच्या.. खडकाच्या फटीतून बीजाला उष्णता आणि पाणी मिळाले की अंकुर फुटतो. त्यापासून छोटा पिवळा कोंब तयार होतो .आणि कोंबाची आणखी वाढ होऊन नाजूक कोवळे पोपटी पान जन्माला येते. जमिनीतून मुळांवाटे, खोड आणि फांद्यांद्वारे पानाला पाणी आणि क्षार मिळत असतात. या पानांना खोड आणि फांद्यांचा आधार मिळालेला असतो. खरं तर पान हे सूर्य प्रकाशाच्या सहाय्याने अन्नरस तयार करून झाडलाच वाचवते.. वाढवते. हळू हळू पानांचा आकार वाढतो. वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या पानांनी.. वेगवेगळा आकार, रंग, गंध आणि चमक घेतलेली असते. मुले, माणसे या निरनिराळ्या पानांनी हरखून गेलेली आपल्याला दिसतात. मुले त्यांना आवडणाऱ्या पानांना वही, पुस्तकात जपून ठेवतात. आता झाडांच्या पानांची संख्या वाढून झाडाला डेरेदार वृक्षाचा आकार आलेला असतो .

तरुण पणात पानाचा रंग पिवळा, हिरवा, लाल, जांभळा, निळा, अगदी काळा सुद्धा असतो. ऊन-पाऊस, थंडी, वारा आणि गारा यांच्या तडाख्यात ते अहोरात्र जगत असते. मोठ मोठ्या झाडांची पाने मोठ मोठी असतात. त्यांच्यामुळे थंडगार मोठी सावली पडते. ही सावली येणाऱ्या वाटसरुंना अल्हाददायक वातावरण निर्माण करत असते. देठाच्या आधाराने पान हवेवर डोलत असते. टवटवितपणा, तजेलदार असणाऱ्या पानावरुन पावसाच्या पाण्याचे थेंब टप.. टप.. आवाज करत, नाद निर्माण करत असतात. हवेच्या थंड झोता बरोबर असंख्य पानांतून सळसळ आवाज करत, पान त्याचे जीवन मस्त जगत असते.
पानांना असंख्य लोक नाना प्रकारे त्रास देत असतात. कुणी हजारो पाने तोडून देवाला वाहतात. निसर्ग हाच देव आहे. झाडे लावून, झाडे जगवून जे पुण्य आपल्याला मिळेल आणि आत्ताच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी निसर्ग संवर्धन होईल; ते झाडांची पाने तोडून देव आपल्या पदरात पुण्य थोडेच टाकणार आहे? कुणी लग्न कार्यात मांडव डहाळे म्हणून सावलीसाठी फांद्या तोडतात. पूर्वी उन्हाळ्यात लग्न होत असत. त्याकाळी मंडप आणि मंगल कार्यालयांची संख्या नगण्य होती. आता सर्व सुविधा असणाऱ्या सद्ध्याच्या काळात मांडव डहाळ्यांची प्रथा बंद व्हायला हवी आहे. ही प्रथा माझ्या मुलाच्या लग्नात मी अजिबात केली नव्हती.
कुणी बळे बळेच पानेच ओरबडतात. आणि झाडाला उघडं बोडकं करतात. खडकावर, माळरानावर, डोंगरावर, वाळवंटात आपल्याला निवडुंगासारख्या काही वनस्पती दिसतात; ज्यांची पाने जाड, फुगीर होऊन त्यामध्ये पाणी आणि अन्नद्रव्य साठवून ठेवतात. संरक्षणासाठी या पानांना निसर्गाने काटे सुद्धा दिले आहेत. पंधरा दिवसापूर्वी कौटुंबिक सहलीसाठी शिवनेरी गडावर आम्ही गेलो होतो. त्यावेळी शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला निवडुंगाच्या झाडांच्या या जाड पानांवर, सहलीसाठी येणाऱ्या शाळेतील मुलांनी आपली नावे या पानांवर कोरून पानांच्या अक्षरशः चिंध्या केल्या होत्या. शिवरायांचा आदर्श घेण्यासाठी आपण त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांवर जात असतो. अशावेळी सामाजिक भान ठेवायलाच हवे. कोणत्याही नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. 'जाणारच की हो.. आम्ही पटदिशी' म्हणत काही माणसांचे आयुष्य नानाविध आजारपणात, अपघातात वेळेआधीच निसर्गात, अनंतात विलीन होत असते. काही लोक अल्पायुषी असतात.
फांदीवर पानाच्या देठाजवळ आता नवीन कोंब फुटून, मागील पिढीला जागा मिळालेली असते. पानाला सुद्धा ठरलेलं आयुष्य असतं. काळाबरोबर हळू हळू त्यातील रंगद्रव्य कमी कमी होत जाते. ते निस्तेज दिसायला लागते. त्यात कडकपणा येवू लागतो. ते शुष्क दिसू लागते. त्यातील हरितद्रव्य कमी कमी होत जाते. संपूर्ण पानावर आता जाळी दिसू लागते. सुरकुत्या पडू लागतात. वरून कितीही जीर्ण झाले तरी देठातून ते हिरवे असते. आणि मग माणसे म्हणतात सुद्धा...'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.' पण त्याला हेही माहीत असते की 'आता आपले दिवस भरत आलेले आहेत.' पानाची सळसळ आता थांबलेली असते. 'न जाणो कोणत्या वेळी आपण.. झाडाच्या फांदी पासून अलग होवून, हवेबरोबर कधी उडून जावू. आणि आपला पार पाला पाचोळा होवून जाईल.' जनावरांच्या, माणसांच्या पायाखाली येवून कुरकुर आवाज मात्र आता येत असतो. सगळीच पाने झाडूने एकत्र गोळा केली जातात. आणि योग्य वेळी त्यांना अग्नी दिला जातो. मग उरते ती फक्त राख. तीही जमिनीत मिसळून जाण्यासाठी. पुढील पिकांच्या वाढीसाठी त्या राखेचा उपयोग मात्र नक्की होत असतो.

माणसांचे आयुष्यही या पाना सारखेच आहे. त्यांनाही उन-पावसात, थंडी-वाऱ्यात संपूर्ण आयुष्य काढावे लागते. घरासाठी, संसारासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या प्रेम, माया, त्याग आणि समर्पणा नंतर त्यांना माहीत असते, 'आपल्या नंतर आपली पुढील पिढी आपण कमवलेल्या संपत्तीचा उपभोग घेणार आहे.' 'हे पिकलं पान केव्हा ना केव्हा तरी, गळून पडणारच की...' प्रत्येकाला निसर्गाने ठरवून दिलेले आयुष्य मिळत असते. पिवळ्या नाजूक, गोंडस पानाचा जन्म झाल्यापासून, तर पानगळ होईपर्यंतचा काळ म्हणजे त्याचे जीवन असते.
©️®️
डॉ. प्रविण शांताराम डुंबरे
ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे
९७६६५५०६४३





Comments