google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

रागावर नियंत्रण... नात्यांकडे जाणारा सुवर्णमार्ग:डॉ. प्रविण डुंबरे

आपल्याला इतरांच्या बोलण्याचा, वागण्याचा आणि काही वेळा विनाकारण किंवा गैरसमजातूनही एखाद्याचा राग येतो. समोरच्याबद्दल आपल्याला, अथवा समोरच्याला आपल्याबद्दल अपेक्षा असतात. अपेक्षांचं हे ओझं कधी कधी नकोसं वाटू लागतं आणि तिथेच ठिणगी पडते. मुद्द्याचा विषय गुद्द्यावर येतो. गेलेले शब्द, धनुष्यातून सुटलेला बाण आणि मारलेला ठोसा परत कधीच येत नाही.




जिभेने केलेले शब्दांचे वार माणसाच्या मनाला, काळजाला आणि जिव्हारी लागतात. दगडावर उमटलेली रेघ जशी कायमची राहते, तसे धारदार शस्त्रासारखे शब्दही मनावर कायमचे खोलवर रुतून बसतात.



क्रोध काही क्षणांसाठी येतो; परंतु तो मोठे नुकसान करून जातो. नाती तुटतात. अहंकार माणसाच्या मनाचा ताबा घेतो. भांडणं, मारामाऱ्या होतात. रागामुळे आणि शब्दाला शब्द वाढल्यामुळे लोक हमरीतुमरीवर येतात.

योग्य वेळ पाहून, प्रसंगी यशस्वी माघार घ्यायला शिका.



त्यात आपलाच फायदाही असू शकतो. चिंता माणसाला आतून जाळते. सततच्या चिंतेमुळे डायबेटिस, ब्लडप्रेशर, मेंदूचे विविध आजार यांसारख्या शारीरिक व्याधी आयुष्यभर शरीराला चिकटून बसतात.



राग आल्यावर शांत राहा. काही गोष्टी खूप गरम खाण्यापेक्षा थंड करून खाण्यातच मजा आणि शहाणपण असते. "माफ करा!", "सॉरी!" किंवा "क्षमस्व!" म्हणायला शिका. कमी बोला. माया आणि ममतेने माणसं जवळ येतात, नाती वृद्धिंगत होतात. मेंदू आणि शरीराच्या गतीला थोडा आराम द्या... शांतता अनुभवा.


एक ते दहा अंक मोजा. निसर्गात, मंदिरात अथवा जवळच्या एखाद्या मित्राकडे जा. त्यामुळे वेगळे विषय चर्चेत येतील आणि मन शांत होईल.



"ज्याच्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ, तोच खरा ज्ञानी," असे म्हणावे लागेल. तोच व्यवसायात, संसारात आणि नोकरीत प्रगती करील. माणसाने येणारी कोणतीही परिस्थिती हळुवारपणे हाताळायला शिकले, की रागावरही निश्चितपणे नियंत्रण मिळवता येते. काय माहीत, त्या प्रसंगी आपलाही गैरसमज झालेला असू शकतो. मायेने, प्रेमाने शत्रूलाही, समोरच्यालाही... अगदी जगालाही जिंकता येते.


©️®️

डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

शिवजन्मभूमी (पुणे)९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

© 2021-2026 Neel Writes. All rights reserved

bottom of page