google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

अपेक्षा ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)

आई-वडिलांच्या मुलीकडून असणाऱ्या अपेक्षेतून कधीकधी मुलीचे नाव “अपेक्षा” ठेवले जाते. काही वेळेला ही अपेक्षा मोठेपणी तिच्या आई बाबांच्या अपेक्षेपेक्षा त्यांचे नाव खुप मोठे करते, आणि सासरी माहेरच्यांचे नाव चांगलेच काढते. मुले मुली उच्च शिक्षण घेवून, चांगला व्यवसाय करून व चांगले वागून आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करतात, तर काही त्या कसोटीला उतरत नाहीत.


शालेय जीवनात तर प्रत्येक जण तोंडी, लेखी परीक्षा देत असतो. तोंडी परीक्षेत आपल्यापुढे जो परीक्षक बसलेला असतो ना.. त्याने विचारलेल्या प्रश्नाला आपण, त्याला अपेक्षित उत्तर द्यावे, अशी त्याची अपेक्षा असते. मुलेही मग परीक्षकाला अपेक्षित असणारे उत्तर अपेक्षित प्रश्नसंच वाचून आणि सोडवून चांगल्या मार्कने पास होतात. मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले तर पालक म्हणतात. 'मला तुझ्याकडून इतक्या कमी गुणांची अपेक्षा नव्हती.'



लग्नाला आलेल्या मुला मुलींच्या, प्रत्येकाच्या होऊ घातलेली नवरा अथवा बायको कशी असावी याच्या मनात काही अपेक्षा असतात. परिचय पत्रामध्ये तसा त्या अपेक्षांचं उल्लेख केला जातो. त्या पद्धतीनेच मग योग्य त्या प्रकारची स्थळे पहिली जातात. पत्रिका पाहून ३६ टक्के गुण जुळवले जातात. याच अपेक्षांपायी वर्षानुवर्षे अनेकांची लग्नं रखडली जातात. जेव्हा वय वाढतं जाते, तेव्हा शेवटी नाईलाजाने लग्न जुळवून घेतले जाते.

काही वेळा अपेक्षा पूर्ती होते, तर काही वेळेस अपेक्षाभंग होतो. आणि मग या अपेक्षा भंगाचा डांगोरा आयुष्यभर सगळीकडे पिटला जातो.


प्रत्येकाला वाटते आपल्याला चांगली नोकरी लागेल. मी चांगला व्यवसाय करेन. यावर्षी व्यवसायात चांगला फायदा होईल, मला चांगले प्रमोशन मिळेल. यावर्षी तरी कांद्याला, टोमॅटोला उच्चांकी भाव मिळतील. शेतात चांगले उत्पन्न निघाले… तर नवीन घर, बंगला बांधू. मुलांची लग्न करू आणि फिरायला बोलेरो, मारुती, इनोव्हा गाडी घेवू. अशा अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात. पण या सर्वच अपेक्षा पूर्ण होतीलच असे नाही. शेतकऱ्यांच्या जीवनाचं पाहायचं झालं तर, शेती हा संपूर्ण निसर्गावर अवलंबून असणारा उद्योग आहे. अवर्षण, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, कीड, आणि पडणारे बाजारभाव, हे सर्व घटक शेतात आलेल्या चांगल्या पिकावर पाणी फिरवतात. आणि अपेक्षाभंग होतो.


पण कधी कधी प्रत्येकाच्या अपेक्षाही अति होत असतात. आणि या अपेक्षा जास्त झाल्या ना.. की मग त्यांचे ओझे वाटायला लागते. हे अपेक्षांचे ओझे न वाटता, जीवनामध्ये सगळं सुखा सुखी, सरळ मार्गी व्हायला पाहिजे.

कुटुंबामध्ये, समाजामध्ये, एखाद्या कडून अवास्तव अपेक्षा असतील. आणि तो त्या अपेक्षापूर्ती साठी आयुष्यभर अपेक्षांचे गाठोडे वहात असेल तर म्हणता येईल,

कुणाच्या खांद्यावर...कुणाचे ओझे…

वृक्ष जाती अंधारात गोठून झडून

जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून

म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे


निसर्गाने आपल्याला भरभरून शरीरसंपदा, बुद्धी, वाणी, मन, भावना हे इतर सर्व प्राण्यांपेक्षा जास्त दिले आहे. निसर्गाची खुप मोठी साखळी दिली आहे. ज्या साखळीचा आपणही एक घटक आहोत. मग या निसर्ग रुपी देवाला आपल्या कडूनही काही अपेक्षा असणार ना ?? पण मग, माणूस काय करतोय? तर जंगल तोड, नामशेष होणाऱ्या प्राणी, पक्षी यांच्या हत्या… जंगले तोडून नवीन नवीन महानगरे तो वसवतो आहे. गाड्यांचे प्रदूषण वाढवून त्यातून मानवालाच घातक विषारी वायू हवेत सोडून पर्यावरण प्रदूषित करत आहे. मानव निसर्गाचा ऱ्हास करतो आहे. ही निसर्ग साखळी तोडून टाकतो आहे.



त्याचा परिणाम अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, आम्ल पाऊस, जागतिक तापमानवाढ होण्यात होतोय. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर होणारे हिमनगाचे वेगाने वितळणे यांमध्ये होतो आहे. परिणामी समुद्राची पाण्याची पातळी वाढत जावून… समुद्राकाठची महानगरे पाण्यात बुडून जाण्यात शेवट होणार आहे. शीत कपाट व शीतगृहे या थंड हवेच्या वस्तूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे आणि इतरही अनेक प्रदूषणांमुळे ओझोन वायूच्या थरामध्ये घट होऊन, पृथ्वीच्या आवरणाला छिद्र मोठे पडले आहे. रशिया-युक्रेन, पाकिस्तान-अफगाणिस्तान, भारत-पाकिस्तान, नेपाळ यांसारख्या देशा देशांची युद्धे चालली आहेत. बॉम्ब स्फोट, अणुबॉम्ब स्फोट, निरनिराळी अण्वस्त्रे यांनी निसर्ग, धरती बेचिराख करण्याचे काम मानव करतो आहे. हे सर्व माणसाच्या अपेक्षांनीच तर होते आहे. दुसरे काय..?? विश्वबंधुत्वाची संकल्पना डोक्यात ठेवून आपण सर्वजण एकमेकांकडून अपेक्षा कमी करून वागलो, तर सुंदर जग नक्कीच सुजलाम सुफलाम होईल.


©®

डॉ. प्रविण डुंबरे

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page