google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

दीपावली - ५ (डॉ. प्रवीण डुंबरे) मुरलेलं लोणचं

राम पाटील.. पिंपळगावचे पोलीस पाटील. रुबाबदार आणि धष्टपुष्ट शरीरयष्टीमुळे गावात त्यांना चांगलाच मान आणि दरारा होता. सकाळचे साडेआठ वाजलेले. घरात पोह्यांचा घमघमाट सुटला होता. ते हॉलमध्ये आरामाखुर्चीत नाश्ता करत बसलेले. सोबतीला पाटलांची मोनू व विजू ही जुळ्या मुलांची जोडी पलंगावर बसून एकमेकांशी खेळत होती. 'राहिबाई' पाटलांची आई... जवळच एका बाजूला बाजरीचे दळण नीट करत, तिच्या कामात मग्न होती. आता, राम पाटलांचा मोबाईल मध्येच ओरडू लागतो...



"अरे, जावयांचा.. रमेशचा फोन आलाय... "

पाटील पुटपुटले. दोन महिन्यापूर्वी नुकत्याच लग्न झालेल्या पाटलांच्या मुलीचा, म्हणजे.. राधिकाच्या नवऱ्याचा रमेशचा.

" आबा. राधिका तिकडे पोहोचली का ? "

"घरात कुणाला काहीही न सांगता पायात चप्पल घालून रागातच निघून गेली.."

" अहो...! जावईबापू, राधिका थोडी शीघ्रकोपी आहे. याची तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांना कल्पना दिली होती ना? तिला कुणी काही बोलले का ?"

थोड्या काळजीच्या स्वरातच राम पाटील फोनवर बोलत होते.


घरातले सगळेच जण कान टवकारून, हे संभाषण ऐकत असतात. एव्हाना राधिकाची आई, शकुंतलाबाई हा मोठा आवाज ऐकून हॉल मध्ये पोहोचलेली असते. राहिआजीच्या हातातील काम आता आपोआप थांबते, आणि कपाळावरील आठ्या व चिंतेने त्याची जागा घेतलेली असते.


तेव्हढ्यात... बंगल्याच्या आवाराचा दरवाजा ढकलल्याचा आवाज होतो. आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या सहावारी साडीतील गोऱ्यापान आणि रुपवान राधिकाचा वाड्यात प्रवेश होतो. धावतपळतच ती खांद्यावरील बॅग हॉलमधील सोफ्यावर भिरकावते, आणि राहिआजीच्या कुशीत जरा धुसफूसतच शिरते.


"राधिका... बेटा ! अगं, रमेशरावांचा आत्ताच फोन आला होता. इकडे यायचेच होते तर, त्यांना सांगून नाही... आली का ?"

पाटलांच्या या उद्गारावर, त्यांच्याकडे पहात राधिकाने मानेनेच नाही असे केले. पण पाटलांना तिच्या डोळ्यातून ओघळलेले दोन थेंब, गालावर चमकताना दिसले.

राधिकाचा तसा पाहिला तर हा प्रेमाविवाह होता. तिच्या आईला हा विवाह फारसा पसंत नव्हता. पण पाटलांपुढे तिचे काही एक चालले नाही. शेजारच्याच गावातील हे स्थळ चालून आलं होतं. इंजिनियर झालेल्या रमेशला नोकरी नव्हती, तरी घरी बागायती शेती भरपूर होती. रमेश एकुलता एक होता. आपल्या जवळच आणि डोळ्याखाली राहील या भावनेने, पाटलांनी शाळेच्या मैदानावर मोठ्या धूमधडाक्यात आणि थाटामाटात तिचा विवाह करून दिला होता.

शकुंतलाबाईंनी मोनू आणि विजूला खेळण्यासाठी बाहेर पिटाळले आणि त्या स्वतः जेवणाची तयारी करण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्यांच्या डोळ्यापुढे.. अगदी छोट्याशा कारणाने घटस्फोटपर्यंत मजल घेणारी, एकत्र कुटुंबपद्धती न मानणारी आत्ताची पिढी चमकून गेली. थोडावेळ गेल्यावर मग.. राहिआजीने, राधिकाच्या पाठीवर हळूहळू थोपटत तिला शांत केले.


" राधिका! अगं, जास्त काही भांडण तंटा वगैरे झाला का?" राहिआजीने विचारणा केली.

पाटलांच्या मोबाईल स्क्रीनवर जावयाचे नाव पुन्हा एकदा झळकू लागले. पाटील आता यावेळी कॉल तर उचलतात, पण फोन आईच्या हवाली करतात.

" नातजावई, माझ्या लाडक्या परीला का रडवलं हो.. तुम्ही ? खूप हळवी आहे ती. का बरं काय, झालं ?"

राहिआजीने रमेशला बोलते केले.

" आजी, राधिका जशी तुमची लाडकी आहे, तशी माझी सुद्धा आहे. "

" हे सगळं, मला माहित आहे हो..! नक्कीच छोटेसेच किरकोळच कारण असणार.. "

" मुलांनो ! संसार म्हटलं की.. भांड्याला भांडं लागतचं " राहीआजी समजुतीच्या स्वरात म्हणाल्या.

आजी, राधिकाला मी म्हटलं.. "माझ्या भावाची दोन महिन्यातं परीक्षा आहे. आपण दोन महिन्यानंतर सहलीला जाऊ. तर मुळुबाई रडायलाच लागली. आणि न सांगता तडक माहेरी निघून आली."



क्षुल्लक कारणावरून रागावून राधिका माहेरी निघून आल्याचं कळल्यावर, राहिआजीला थोडं वाईटच वाटलं. "आता ठेवते फोन..!" असं सांगून तिने राम पाटलाला फोन दिला. आणि ती राधिकाकडे वळली.


घरातील गंभीर झालेले वातावरण थोडं हलकं फुलकं व्हावं म्हणून, राम पाटलांनी विषय बदलायचा असं ठरवलं. आणि राहिबाईच्या शेजारी नेहमीच दिसणाऱ्या व ठाणं मांडून बसलेल्या, चिनी मातीच्या बरणी विषयी तिला विचारले.


"आई, तू मागच्या महिन्यात घातलेलं लोणचं चांगलं मुरलं का... गं ??"

" नाही रे.. एवढ्या लवकर कसं मुरंल ?" रहिबाईने रामच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आणि.. राधिकाने मग प्रश्नार्थक नजरेने तिला विचारले.

" आजी, जेवणामध्ये तू मला नेहमीच लोणचं देते. पण, "मुरलेलं लोणचं" हा काय प्रकार आहे ?? "


आता राधिका कडून अपेक्षित प्रश्न आला होता. यानेच आपल्याला उत्तराची फोड करता येईल, आणि तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगता येतील. या अर्थाने... राहीबाईच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रसन्नता पसरली होती.


राहिआजी : बाळा, लोणचं फक्त आंबे, तेल, मीठ आणि मसाले घातले की लगेच तयार होत नाही. हे सर्व पदार्थ वेळ जाईल तसंतसे, त्या कैरीच्या फोडींमध्ये, आत खोलपर्यंत जावे लागतात. त्यालाच मुरणं म्हणतात. ते एकदा मुरले की मग त्याचा खरा स्वाद खुलतो. संसारही तसाच असतो... बेटा.


राधिका : म्हणजे ?


राहिआजी : लग्नाच्या सुरुवातीला संसार म्हणजे कच्च्या आंब्यासारखा असतो. ताजातवाना, पण तुरट. त्यात मीठ-मसाले म्हणजेच संयम, विश्वास, माया टाकली की तो टिकतो. पण खरी गंमत तेव्हा होते, जेव्हा तो काही काळानं मुरतो.


राधिका : आजी, हे लोणचं तू नेहमीच किती काळजीपूर्वक जपते ! मला तर नेहमी वाटतं, यात एवढं काय खास आहे?


राहिआजी : हो ग...! सुखी संसार म्हणजे मुरलेलं लोणचंच. रोज थोडं थोडं ढवळायला लागतं. म्हणजेच छोट्या छोट्या गैरसमजांना वेळेत मिटवणं, एकमेकांच्या आवडी-निवडी जपणं. आणि लोणचं जसं ओलसरपणा नको म्हणून बंद बरणीत ठेवतात, तसंच संसारात सुद्धा बाहेरच्या जगाची कटुता, आत येऊ द्यायची नाही. बरकां !


राधिका : मग सुखी संसाराचं रहस्य हेच का ?


राहिआजी : अगदी बरोबर! सुरुवातीला जरा आंबटगोड भांडणं होतील, पण बुरशी लागू नये म्हणून त्यावरून मायेचं, प्रेमाच, संयमाचं तेल सतत ओतत राहिलात ना, तर संसार दीर्घकाळ टिकेल आणि त्याची चवही वाढेल.


राधिका : व्वा.. आजी! मग आमचा संसारही आत्ताच लोणच्यासारखा मुरायला लागलाय. अजून तुरट आहे, पण आम्ही तो, जीवनसाथी असेपर्यंत नक्कीच टिकवून ठेवू.


राहिआजी : अगदीच. आणि लक्षात ठेव, गोड-तिखट-आंबट सगळं मिळूनच खरी चव येते. संसारातही तसंच असतं.


राधिका : म्हणजे मुरलेल्या लोणच्यासारखं आयुष्यभर टिकणारं प्रेम! ना ?


राहिआजी : हो..! हो. हे लोणचे काही काळानंतर इतके मुरलेले असते की, नवरा बायकोला काहीही न सांगता, बोलता एकमेकांच्या भाषा बरोबर कळतात. डोळ्यांनीच भाषा बोलता येतात.


'जीवन गाणे गातच रहावे.'

'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...'


आजीने जीवनाचे मर्मच तिच्यापुढे रिते केले होते. राहिआजीच्या आणि राधिकाच्या या प्रेमळ, मायेच्या, आपुलकीच्या, समजूतीच्या आणि हसत चाललेल्या संवादातून, राम पाटलांच्या चेहऱ्यावर आता आनंद पसरला होता. राम पाटील आता निवांत, निर्धास्त आणि आपल्याच तांद्रित गेले होते. परंतु, राधिकाच्या मोबाईलवर वाजलेल्या ध्वनीने त्यात व्यत्यय आला.

"राधिका, कुणाचा गं फोन आलाय ?" राम पाटलांनी बऱ्याच वेळा फोनची रिंग वाजल्यावर विचारले.

" आणि.. तू उचलत का नाहीस? "

असे विचारताच... राधिका हलकेच गालात हसत, आणि किंचित लाजतचं म्हणाली.

"आबा..! रमेशचा फोन आहे. मला वाटतं तेच माझ्यावर रागावले असतील. मला आता हे 'मुरलेलं लोणचं' चांगलं समजलं आहे. त्यांना मी, घरामागील बागेत जाऊनच फोन करते... "

बाहेर भरून आलेल्या आभाळाने...आणि थेंब थेंब सरिंनी राधिकाला नाचायला भाग पाडले होते.


फुलले रे क्षण माझे, फुलले रे

मेंदीने, हो-ओ, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने..

रीत ही, प्रीत ही उमजेना..

जडला का जीव हा समजेना?

सजले रे क्षण माझे, सजले रे

फुलले रे क्षण माझे, फुलले रे


©®

लेखक-

डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

शिवजन्मभूमी, जुन्नर (पुणे)

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page