दीपावली - ४ (डॉ. प्रवीण डुंबरे) महानगरपालिकेची...दिवाळीची साफसफाई.
- Neel Writes

- Oct 20, 2025
- 2 min read
अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आलेली. वेळ सकाळी साडेसातची... नेहमीप्रमाणेच आज सकाळी फिरायला गेलो होतो. पिंपरी चिंचवड पुणे येथील गोविंद-यशदा चौक ते कोकणे चौक पर्यंत... साठ फूट रुंद व दोन ते अडीच किलोमीटर लांबीची बाग, 'लिनियर गार्डन' तिचे नाव. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुंदर रित्या तयार केली आहे. तुफान रहदारी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित पद्धतीने देखभाल केलेली. सकाळी सकाळी इथे तरुण पिढीपासून ते वयोवृद्ध माणसे व्यायामासाठी व चालण्यासाठी येत असतात. पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ, सायकल ट्रॅक तसेच बागेमध्ये चालण्यासाठी, लाल माती टाकलेला पादचारी मार्ग, दोन तीन ठिकाणी ओपन जिम सुद्धा आहे. विशेष म्हणजे कुत्र्यांसाठी बागेचा अंदाजे शंभर फुट लांबीचा भाग राखून ठेवून, विकसित केला आहे. दररोज त्या मार्गांवर जाताना काही विक्रेते तूप, फळे, भाजीपाला, थर्मास मधून कोरा, आयुर्वेदिक अशा निरनिराळ्या प्रकारचा चहा विक्रीसाठी घेऊन बसलेले दिसतात.

आपण नुसते चालत जाण्यात काही अर्थ नाही. जाता जाता दिसणारी परिस्थिती, माणसं आणि निसर्ग न्याहाळत आणि अनुभवत गेलं पाहिजे. कुणीतरी मोठ्या माणसाने म्हटलेलं आहे... कदाचित महात्मा गांधी असतील ?? जाताना एका रस्त्याने गेल्यावर, येताना दुसऱ्या रस्त्याने या... म्हणजे तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. पण मला तर... जातानाच्याच रस्त्यावर पाहायला मिळाले... पदपथावर बसलेला एक विक्रेता त्याची जागा सोडून पळत पळत... त्याच्या साहित्याची दोन बोचकी, बाजूलाच रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीजवळ ठेवत होता. आणि त्याचा रिकामा टेबलही तिथे मुळ जागेवर मोकळा दिसत होता. पुढे गेल्यावर तर सर्वच विक्रेत्यांची थोडी पळापळच दिसली. आणखी पुढे पाहिल्यावर मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, 'धडक कारवाई पथकाची' जाळ्या लावलेली मोठी गाडी उभी असलेली दिसली. पद पथाशेजारी एक खाजगी गाडी पार्क केलेली होती. पथकाची गाडी त्या खाजगी गाडी शेजारी म्हणजे रस्त्यावर उभी होती. पथकाच्या गाडीला रस्त्याच्या कडेला पार्क करण्यासाठी त्या खाजगी कारच्या पुढे ३० - ४० फुट मोकळी जागा होती. पथकाच्या गाडीच्या मागे, एक टेम्पो सारखी गाडी उभी असलेली मी पाहिली. सुरुवातीला मला वाटले, कारवाई पथकाच्या या गाडीचा त्या टेम्पोला अडथळा होत आहे. परंतु ती त्यांच्याच पथकाची, उचललेला फळे आणि भाजीपाला म्हणजे, कचरा टाकण्याची गाडी होती. 'कारवाईत उचललेला फळे भाजीपाला... पथकाचे लोक घरी घेऊन जातात..!' अशी ओरड कदाचित लोक करत असतील, त्यामुळे.

कडेला जागा असतानाही धडक कारवाई पथकाची गाडी रस्त्यामध्ये उभी होती... ही बाब माझ्या लक्षात आली. आणि धडक कारवाई पथकाच्या खाली उभे असलेल्या ड्रायव्हरला मी एक वाक्य त्वरित म्हणालो. तेही अगदी सहजपणे. "दादा..!! तुमचीच गाडी रस्त्यामध्ये अडथळा ठरत आहे. पुढे मोकळी जागा आहे तिथे घ्या." यावर ते ड्रायव्हर भाऊ सुद्धा म्हणाले, "अहो..!! बाजूला गाडी घेत बसलो की, पथारीवाले हे लोक लगेच त्यांच्या वस्तू घेऊन पळून जातात. व दररोज बसून असाच व्यायामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरत असतात." त्यानंतर तसेच पुढे गेलो असता, मला महानगरपालिकेचे वीस ते पंचवीस जणांचे कारवाई करणारे पथक दिसले. संरक्षणासाठी त्यांच्याबरोबर आणखी पोलीसही होते. एवढ्या सकाळी सर्वजण अगदी गणवेशात होते. महानगरपालिकेच्या कारवाई पथकावर, पदपथावर बसणारे हे विक्रेते, काही वेळेला मारहाणही करतात. त्यामुळे असेल पण त्यांच्याबरोबर दोन स्टेनगनधारी जवान सुद्धा चालले होते. "अरे, उचला त्यांचा माल... आणि टाका गाडीमध्ये." असे त्यांचे एकमेकांशी संभाषण चालले होते.
दिवाळी जवळ आली की... सगळीकडे घरेदारे साफसफाई करून लख्ख होतात. पहिली स्वच्छता आणि मग दीपोत्सवाने अंधारावर प्रकाशाची मात केली जाते. तशी तर महानगरपालिकेची सफाई दररोज सुरू असते. परंतु दिवाळीमध्ये वाढणाऱ्या अतिक्रमणांची सफाई सुरू झाली होती. जलदगतीने धाड.. धाड.. चालणाऱ्या या महानगरपालिकेच्या धडक कारवाई पथकाच्या शेजारून मी सुद्धा न भिता, बेधडक मार्गक्रमण करत चाललो होतो. आणि... तेही त्यांच्याच गाडीवाल्याला मी बोललेले वाक्य आठवंत...
"दादा..!! तुमचीच गाडी रस्त्यामध्ये अडथळा ठरत आहे. पुढे मोकळी जागा आहे तिथे घ्या."
©®
डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर
शिवजन्मभूमी, जुन्नर (पुणे)
९७६६५५०६४३



Comments