google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

हे... बिबट प्रवण क्षेत्र आहे.सावधान..! : डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर (पुणे 

हे... बिबट प्रवण क्षेत्र आहे.

सावधान..!


पाडव्याच्या दिवशी ओतूरमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम असल्याकारणाने, आदल्या दिवशी रात्री म्हणजे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही उभयतांनी पुण्याहून ओतूरला निघायचे ठरवले. लक्ष्मीपूजनाबरोबर... घरातील प्रतिभा, सुनबाई श्रद्धा व नात अद्वि यांचेही लक्ष्मीपूजन साग्रसंगीत आणि यथासांग पार पडले. आम्ही रहातो त्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून, पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर आणि रहाटणी या परिसरातील, लक्ष्मीपूजनानंतर वाजलेल्या आणि दृश्य स्वरूपात आकाशात विविध रंगी फटाक्यांच्या प्रकाशाचे मनोहारी दृश्य फोटो सोबत डोळ्यातही साठवून घेतले. लक्ष्मीपूजनानंतर खऱ्या अर्थाने फटाक्यांची आतषबाजी जास्त स्वरूपात होत असते. या परिसरातील सलग अडीच ते तीन तास पर्यंत सुरु असलेले फटाक्यांचे हे वाजवणे, मनाला थोडे जास्तच प्रदूषण करून गेले. रात्रीचे जेवण करून बरोबर सव्वा दहा वाजता आम्ही चारचाकी गाडीने ओतूरच्या दिशेने मार्गक्रमण केले. लक्ष्मीपूजनानंतरच्या, आणि आम्ही निघण्याच्या वेळेपूर्वीच जास्त फटाके वाजले असतील, परंतु भोसरी आणि मोशी परिसरात त्यांचे प्रमाण खूप कमी भासले. तर चाकण परिसरात आल्यावर अगदी तुरळक प्रमाणात फटाक्यांचा प्रकाश काळ्या आकाशात विविध रंगांनी लक्ष वेधून घेत होता.



खेड घाटाच्या पायथ्याशी आल्यावर, आकाशात विजा चमकण्याचा आणि त्यांच्या कडाडण्याचा आवाज होत नव्हता. परंतु, गाडीच्या पुढच्या काचेवर चार दोन थेंब पडायला सुरुवात झाली होती. प्रतीकने जाण्यापूर्वी भ्रमणध्वनीवर पाहून मला सांगितले होते. "पप्पा, तुम्ही योग्य वेळी निघाला आहात. रस्त्यात कुठेही प्रवासी गाड्यांची गर्दी व अडथळा नाही. दोन तासात तुम्ही ओतूरला बरोबर पोहोचाल." खेडचा घाट चढून पुढे गेल्यावर... पावसाचे थेंब थोडे जास्त वाढायला लागले. घाटाच्या पुढच्या उताराला पावसाचा जोर आणखी वाढला, आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. मग मी सुद्धा गाडीच्या पुढील काचेवरील वायपर हळूहळू वाढवत नेऊन चार वर नेला. जमिनीवर पडणाऱ्या पाण्याच्या जोरदार कोसळण्याने रस्त्यावरून आता पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहू लागले होते. जमीन व डांबरी रस्ता ओलसर झाल्यामुळे आणि पाण्याच्या छोट्या छोट्या तुषारांमुळे सगळीकडे दृश्यमानता कमी झाली होती. दिशादर्शक पिवळे दोनही दिवे माझ्यासह सर्वच चालकांनी सुरू ठेवले होते. शेवटी निसर्गपुढे माघार घेत, एका मोठ्या हॉटेलच्या पुढील वाहन तळामध्ये गाडी घेत, थोडे थांबणे माझ्यासह काही चालकांनी पसंत केले. पावसाचे पडणे चालूच होते. दहा मिनिटे तेथेच थांबून, पाऊस कोसळत असतानाही मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पाऊस फक्त एवढ्या घाटमाथ्याच्या परिसरातच असेल, हा माझा अंदाज नंतर तर अगदी तंतोतंत खरा ठरला. पुढचा मंचर आणि नारायणगाव परिसर या पावसातून कोरडाच राहिला होता.


मी गाडी चालवत असताना नेहमी निर्धास्त होऊन झोप देणारी प्रतिभा, पावसामुळे असेल कदाचित... या प्रवासात मात्र आज जागीच होती. नारायणगाव आणि कोल्हे मळा पार करून आमची गाडी आता ओझर रस्त्याला लागली. वेगवान आणि अती वेगवान रस्त्यांवर, गाड्यांच्या गतीचे आकडे बाजूला दिलेले असतात. शक्यतो त्या गतीप्रमाणेच गाड्या चालवाव्यात असा परिवहन कार्यालयाचा संदेश असतो. अन्यथा आपण दंडास पात्र होतो. या रस्त्यांवरुन आपल्याला ८०-९० च्या गतीने जावेच लागते. आणि कमी गतीने आपण गेलो तर, इच्छित स्थळी आपल्याला वेळेवर पोहोचता येत नाही.


का कोण जाणे ?? परंतु नारायणगाव ओतूर या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करताना, वनविभागाचे हे वाक्य मला नेहमी आठवते. "हे... बिबट प्रवण क्षेत्र आहे. सावधान..! वाहने हळू चालवा." आजही नेहमीप्रमाणे या रस्त्याच्या सुरुवातीला असतानाच मला हे वाक्य आठवले. आणि पुढे ते तंतोतंत खरेही ठरले... विस पंचवीस वर्षात जुन्नर तालुक्यामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र खूप वाढले. आणि त्याचबरोबर बिबट्यांची संख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पूर्वीच्या काळी दोन-तीन वेळा मोटरसायकल वरून प्रवास करताना निरनिराळ्या रस्त्यांवर बिबट दर्शन झाले होते. आणि बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येच्या दिवसात हे बिबटे कधी कधी वनविभागाने पकडलेल्या पिंजऱ्यांमधून त्यांच्या भव्य ताकतीचे दर्शनही द्यायचे. परंतु आता गावोगावी व गल्ली गल्लीतून उशिरा रात्रीच्या वेळी, ते त्यांच्या भक्षाच्या शोधात फिरत असतात. उसामुळे त्यांच्यासाठी लपण्याची जागा वाढली आहे. भक्ष कमी पडल्यामुळे भक्षाच्या शोधार्थ ते मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. रात्रीच्या वेळी उसासारख्या पिकाला पाणी देताना शेतकऱ्यांना नेहमीच बिबटे पाहायला मिळतात. त्यांचे फिरतानाचे व्हिडिओही आपल्याला व्हाट्सअप वर फिरताना दिसतात.


आमच्या गाडीची गती तशी कमीच होती. आणि वन विभागाचे ते वाक्य मला आठवल्यानंतरच्या दहा ते बारा सेकंदातच... आमच्या गाडीसमोरुन एक प्राणी आडवा गेला होता. मोठ्या कुत्र्यापेक्षा तो नक्कीच मोठा होता. आम्हा दोघांचेही लक्ष त्याकडे वेधले गेले. तो कुत्रा नव्हताच... कारण कुत्र्यापेक्षा मोठा दिसत होता. आणि प्रतिभा ओरडलीच, "तो बघा..! बिबट्या..!!" पूर्ण वाढ झालेला होता. खूप मोठाही नव्हता. दोन तीन वर्षाचा असेल कदाचित ?? परंतु आज स्वतःच्या शिकारीसाठी तो स्वतंत्रपणे बाहेर पडला होता. मी गाडी थोडी आणखी हळू घेतली. तोही गाडीच्या अस्तित्वामुळे स्वतःचे अंग चोरून रस्त्याच्या कडेला थांबला होता. या अगदी कमी वेळेत भ्रमणध्वनी काढून त्याचे चित्र किंवा चलतचित्र न काढता पुढे जाणेच आम्ही पसंत केले. पुढे परीटवाडी रस्त्यावर आलो असता. चार ते पाच कुत्री एकमेकावर भुंकत एकमेकांबरोबर खेळत होती. मी म्हणालो सुद्धा... "बाबांनो इथे जवळच्या अंतरावर तुमचा कर्दनकाळ बनून, बिबट्या फिरतो आहे. जा पळा आडबाजूला." पण, माझ्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते.


अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या ओझरचे, पुलावरून जाताना झालेल्या ओझरत्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. पुढे ओझर ओतूर रस्त्यावर आमचा प्रवास सुरू झाला. कमी वस्ती आणि निर्मनुष्य असणाऱ्या या रस्त्यावर गाडीच्या डाव्या बाजूने एक ससा आमच्या गाडीशी पळण्याची स्पर्धा करत होता. अगदी ससा कासवाच्या शर्यतीत पळतो ना ?? तशी. गाडी वेगवान नव्हतीच. परंतु करड्या रंगाच्या असणाऱ्या त्या सशाने अचानक गाडीच्या पुढून, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला, आडवे जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात..! मी पटकन ब्रेक दाबला. आणि गाडीतील मागच्या आसनावर स्थिर असलेल्या पिशव्यांनी मोठा आवाज करत, पुढच्या आणि मागच्या बैठकांच्या मध्ये धाव घेतली. मी उजव्या बाजूला पाहिले तर... गाडीच्या पुढील भागासमोरुन, रस्ता ओलांडून... रस्त्याशेजारील खड्ड्यावरून उड्या मारत ससा शेतात पसार झाला होता. मी प्रतिभाला म्हटले, "ससा गेला...!!" तीचे लगेचच, "अरेरे...!!" असे शब्द आले. तिला वाटले, गाडी खाली चंदामेंदा होऊन गेला. परंतु मी स्पष्ट केले की, " रस्त्याच्या पलीकडे, सुखरूप उडी मारताना मी त्याला पाहिले आहे. तो पलीकडील शेतात सुखरूप गेला."



दोन तासांचा सुखरूप प्रवास करत, रात्री सव्वा बारा वाजता घरी पोहोचलो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजता उठणे झाले. साडेपाचच्या "दिवाळी पहाट" कार्यक्रमासाठी वेळेवर सव्वा पाच वाजता आम्ही उभायता कपर्दीकेश्वर मंदिर प्रांगणात हजर झालो. कार्यक्रमात माझ्या शेजारी माझे वर्गमित्र आणि तळेगावचे प्रसिद्ध उद्योगपती शशिकांत हळदे होते. चर्चेमध्ये मी त्यांना सांगितले, "रात्री मला बिबट्या दिसला होता." तर तेही मला म्हणाले... "मला सुद्धा रात्री दोन मोठे बिबटे दिसले." दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निवेदकांचे निवेदन सुरू होते... त्यांनाही निवेदनात सुरुवातीलाच, "तुमचा परिसर इतका निसर्ग संपन्न सुंदर आहे की... पहाटे चार वाजता येताना आम्हाला रस्त्यावर दोन बिबटे दिसले." असा उल्लेख माईक वरून केला. आणि या भागात बिबट्यांची संख्या प्रचंड आहे. शासनाने ओतूर भागामध्ये "बिबट सफारी" करण्याचा निर्णय खूप वर्षांपूर्वी घेतला आहे. ओतूर परिसरात गावोगावी बिबटे फक्त दिसतच नाही तर एकट्या मुलां, महिलांवर तसेच मोटरसायकल वरून रात्रीच्या वेळी जाणाऱ्या येणाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहेत. मागील आठ ते पंधरा दिवसांतच जांबुत, पिंपरखेड या शिरूर तालुक्यातील महिला व मुलांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. निसर्गातील माणूस आणि बिबट्या असा संघर्ष आता अती तीव्र झाला आहे. बिबट्यांना पकडून शासनाने व वनविभागाने जवळच्या अंतरात न सोडता त्यांना देशातील दुरदूरच्या अंतरावरील अभयारण्यात दाखल करावे. आणि "नसबंदी" हा जालीम उपाय प्रत्यक्षात आणावा. ही समस्त बिबट्याग्रस्त शेतकरी जनतेच्या वतीने शासनास विनंती आहे. निसर्ग संपन्न जुन्नरच्या या परिसरात तुम्हाला रात्रीच्या वेळी असंख्य बिबट्यांचे आणि प्राण्यांचे दर्शन नक्की होईल. त्यासाठी 'ताडोबा' सारख्या कुठल्याही अभयारण्यात जाण्याची गरजच नाही. अर्थात, वनविभागाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे..!

तेव्हा... जुन्नर, ओतूर आणि परिसर,

"हे...बिबट प्रवण क्षेत्र आहे. रात्रीच्या वेळी. सावधान..!"

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page