ओतूरची प्रसिद्ध श्रावणी यात्रा : डॉ. प्रवीण डुंबरे
- Neel Writes

- Aug 18, 2025
- 5 min read
प्राचीन काळची उत्तमापूर नगरी आता ओतूर या नावाने सर्वदूर प्रसिद्ध झाली आहे. पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील शेवटच्या टोकाला असणाऱ्या, आणि जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर कल्याण महामार्गांवर वसलेली आहे. या गावाला साहित्यिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि कुस्ती क्षेत्रात देखील परंपरा आहे. तसेच शैक्षणिक वारसा देखील लाभला आहे. गावा शेजारी उत्तरेकडून व पूर्वेकडून सह्याद्रीच्या उपडोंगर रांगा आहेत. माळशेज घाट रांगांमध्ये उगम पावलेल्या मांडवी नदीकाठी वसलेले असल्यामुळे, मांडवी मायने या परिसराला अगदी सुजलाम सुफलाम करून टाकले आहे. गावापासून उत्तर दिशेला दोन किलोमीटर अंतरावर कपर्दिकेश्वर या नावाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध पावलेले भगवान शंकराचे मोठे मंदिर या नदीकिनारी आहे. ही नदी याच ठिकाणी दक्षिण दिशेला वाहत जाते, म्हणून भाविक भक्त तिच्यामध्ये गंगेचे रूप पाहतात. ग्रामदैवत कपर्दिकेश्वराचे जागृत देवस्थान असणारी ही भूमी आहे.

मंदिराजवळ चैतन्य महाराजांची संजीवन समाधी आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराजांनी, तुकाराम महाराजांना याच परिसरात 'राम कृष्ण हरी' हा मंत्र दिला. ओतूर भूषण श्री. रमेश शिवाजीराव डुंबरे यांच्या करोडो रुपयांच्या दातृत्वातून मंदिर परिसराचा नुकताच सुंदर आणि आकर्षक दगडी बांधकामाने जीर्णोद्धार झालेला आहे. त्यामुळे हा परिसर खरोखरच विलोभनीय आणी प्रेक्षणीय झाला आहे. त्याची परिणती या मंदिर परिसराला "ब" तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यात झाली आहे. 'श्री. कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था कमिटी' मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोशनाई करत यात्रेचे सर्वोत्तम आयोजन आणि नियोजन करते. कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिलशेठ श्रीकृष्ण तांबे व संस्थेचे पदाधिकारी त्यासाठी अहोरात्र झटत असतात.
गावाला पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशांना इतिहास कालीन तीन मोठमोठ्या दगडी वेशी आहेत. ग्रामस्थांनी त्या अजूनही चांगल्या अवस्थेत जतन केल्या आहेत. बारा वाड्या वस्त्यांचा परिसर गावाला लाभला आहे. पूर्वेकडे मुंजाबा डोंगर आणि मंदिराशेजारी सुटुंब्याची छोटी टेकडी असा परिसर आहे. तसा तर वर्षभर बागायती जमिनीने संपन्न असलेला हा परिसर आहे. पावसाळ्यात आणि तोही श्रावण महिन्यात जिकडे पाहावे तिकडे पाचूचा शालू, या रानाने नेसलेला दिसतो. छोट्या टेकड्या आणि डोंगरांवर धुक्याची दुलई पसरलेली आपल्याला पाहायला मिळते.
या निसर्गसंपन्न वातावरणात पूर्वजांनी जपलेली, कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात मोठी जत्रा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भरते. श्रावण महिन्यात वर्षातून कधी चार सोमवार तर एखाद्या वेळेला पाच सोमवार येतात. यात्रेतील प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीशेजारी तांदळाच्या पिंडी तयार होतात. या पिंडींसाठी घराघरातून तांदूळ जमा केले जातात. तर रविवारच्या दिवशी नवस बोललेले लोक, त्यांच्या घरापासून वाजत गाजत डोक्यावर तांदूळ घेऊन मंदिराकडे येतात. पहिल्या सोमवारी एक पिंड तयार होते. दुसऱ्या सोमवारी दोन, तिसऱ्या सोमवारी तीन, चौथ्या सोमवारी चार आणि पाच सोमवार असतील तर पाच पिंडी तयार होतात.

श्रावण महिना हा तसा पहिला तर निरनिराळे सण आणि व्रत-वैकल्यांचा महिना. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाची पूजाअर्चा केली जाते. कपर्दिकेश्वर आणि चैतन्य महाराज यांच्या मंदिरांमुळे गाव आणि परिसरात सगळीकडे भक्तीमय वातावरण असते. ज्येष्ठांमध्ये सोमवारचा दिवस हा उपवासाचा दिवस असतो. काही लोक निरंकार म्हणजे काहीही न खाता, तर काही खिचडी, केळी, रताळी या सारखे उपावासाचे खाऊन उपवास करतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी उपवास सोडण्यासाठी लागणारी भाजी घेण्यासाठी, गावात सकाळी भाजी बाजार भरतो. आणि सायंकाळच्या वेळी सातच्या आत उपवास सोडणे हे प्रत्येक घरी होते.
वरण भात, गव्हाच्या पोळ्या, मेथीची व कारल्याची भाजी, मस्त कुरकुरीत तळलेल्या आळूच्या वड्या असे पदार्थ पानावर येतात. गावातील हॉटेल व्यवसायिक व काही नवउद्योजक प्रत्येक सोमवारी गावामध्ये बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर जिलेबीचे स्टॉल खूप पूर्वीपासून लावत आहेत. प्रत्येक सोमवारी दिवसभर गरम गरम मिळणारी जिलेबी, उपवास सोडण्याच्या वेळी ताटामध्ये आवर्जून समाविष्ट होते आणि अबाल वृद्ध तिचा यथेच्छ समाचार घेतात. पूर्वीच्या काळी केळीच्या पानावर हे सर्व पदार्थ वाढले जात असत. आता त्यात आधुनिकता आली आहे.
पहिल्या श्रावणी सोमवारी परिसरातील वाड्या वस्त्यांतील भाविक, "ज्ञानोबा, तुकाराम" आणि "विठुरायाचा" जयघोष करत, पायी दिंडीने प्रभात फेरी काढत, सकाळच्या प्रसन्न वेळी, गावातील वातावरण भक्तीमय करून टाकतात. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याही दिंड्या, संतांची आणि विठ्ठलाची रूपे घेऊन निघतात. पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अबाल वृद्ध तांदळाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. श्रावणात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी. यात्रेत जुन्या काळी नाग नरसोबाचे चित्र येणाऱ्या माणसांना दाखवत, आणि "नाग नरसोबा घ्या.. नाग नरसोबा, " म्हणत मुले विकताना दिसत असत. आताही दर्शनासाठी आलेल्या स्त्री पुरुषांना कपाळी अष्टगंध लावण्याचे काम काही शालेय मुले करत असतात. आणि यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर शंकराचे भक्त असल्याचे चिन्ह आणि संतुष्टी येते. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भजन स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावामधील पांढरीच्या मारुती मंदिरा जवळ सकाळी आठ वाजता सुरू होणाऱ्या स्पर्धा, रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पर्यंत सुरू असतात. जुन्नर आणि आसपासच्या तालुक्यांमधून भजनी मंडळे या स्पर्धांमध्ये भाग घेतात.

त्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या सोमवारी खूप मोठी यात्रा भरते. गावातून पुणे, मुंबई, नगर, नाशिक, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेले लोक, या दोन दिवसांपैकी एका दिवशी आवर्जून हजेरी लावतात. येताना मित्रमंडळी तसेच पाहुणेरावळे यांनाही निमंत्रण दिले जाते. या दोनही दिवसांचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्त्यांचा भरणारा आखाडा. यात्रेला कुस्त्यांच्या आखाड्याची खूप जुनी परंपरा आहे. जुन्नरच्या परिसरातील तालुक्यांमधून कुस्त्यांसाठी पैलवान इथे येतातच; परंतु सांगली, कोल्हापूर, नाशिक, पैठण इत्यादी दूरवरच्या ठिकाणांवरूनही नावाजलेले पैलवान हजेरी लावतात. दुपारी दीड वाजता मुख्य गावकरी एकत्र जमून वाजंत्र्यांच्या विविध वाद्यांच्या गजरात, गावातून मंदिराकडे प्रस्थान करतात. कपर्दिकेश्वराचे दर्शन घेऊन आखाड्याला सुरुवात होते. सुरुवातीला गावातील बाल पैलवानांच्या कुस्त्या लावल्या जातात आणि त्यांना इनाम म्हणून रेवड्या दिल्या जातात.
पूर्वी गावातील प्रत्येक आळीमध्ये मल्लखांब आणि कुस्त्यांचे फड असायचे. आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सुरुवातीला छोट्या छोट्या पैलवानांच्या कुस्त्या लावल्या जातात. त्यांच्या आकर्षक आणि चित्तथरारक खेळानुसार त्यांना इनाम दिले जाते. या खेळांचे माईक वरून होणारे समालोचन आकर्षक, प्रभावी आणि कुस्ती प्रेमींमध्ये जल्लोष करणारे असते. एखाद्या छोट्याशा पैलवानाने कुस्तीमध्ये आखलेले डावपेच आणि डाव यांनी कुस्ती चित्रपट झाली तर, त्या पैलवानाला लोक डोक्यावर उचलून घेतात. आणि वैयक्तिक इनामही देतात. पैलवानाचा मान, प्रतिष्ठा आणि खेळ पाहून त्याला ढाल, गदा, फेटा अथवा रोख स्वरूपातील इनाम दिले जाते.
श्रावणात मंदिरा शेजारूनच दुथडी भरून वाहणारी मांडवी नदी दिसते. परिसरातच भरणाऱ्या या आखाड्याच्या जागेला तीन बाजूने नैसर्गिक उताराची जागा पूर्वीपासूनच लाभलेली आहे. वर छत नसलेल्या या आखाड्यात पूर्वीच्या काळी श्रावण सरी, वरचेवर आल्या की... कुस्त्यांना थोडा आराम दिला जायचा. पावसात काळ्या छत्र्या डोक्यावर घेऊन लोक त्यामधून, कुस्त्यांच्या डावाचा आनंद घ्यायचे. आहे. शिवजन्मभूमीचे कार्यसम्राट माजी आमदार श्री. शरददादा भिमाजी सोनावणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'स्व.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती स्टेडीयमने' या परिसराच्या वैभवात आणखीन भर घातली आहे. आखाड्याचा भाग, वरून छत आणि बाजूने बंदिस्त झाला आहे. त्यामुळे कितीही पावसात कुस्त्यांमध्ये आता खंड पडत नाही.
यात्रेनिमित्त गावात येणाऱ्या पाहुण्यांना, मित्रमंडळींना चांगला पाहुणचार देत पहिला, दुसरा, तिसरा सोमवार असे करत, संपूर्ण श्रावण महिना कधी निघून जातो हे कळत नाही. घरातील लहान मुले आणि पाहुणे आले की.. घरातील स्त्रियांचा संपूर्ण वेळ स्वयंपाक घरात आणि धावपळीत जातो. यात्रेत त्यांना जायला वेळ मिळत नाही. स्त्रियांना घरात आणि स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू मनसोक्त आणि निवांत वेळेत खरेदी करता याव्यात म्हणून गावकऱ्यांनी पूर्वीपासूनच विशेष सोय केली आहे. शेवटच्या सोमवार नंतर येणाऱ्या मंगळवारी इथे शिळी यात्रा भरते. पूर्वी ही यात्रा गावामध्ये भरवली जायची. वाढलेल्या गर्दीमुळे आता ती गावाबाहेर भरते. या दिवशी मंदिर परिसरात सकाळी ११ ते २ या वेळेत कुस्त्यांचा आखाडा पुन्हा भरतो.
छोट्या मुलांसाठी छोटे पाळणे तसेच मोठ्या शाळा व महाविद्यालयीन युवक युवतींसाठी आकाशाला भिडणारे मोठ मोठे पाळणे, जादूगार, मौत का कुवा, तुम्हाला ओळखणारे गाढव व संसारोपयोगी विविध वस्तूंची अनेक दुकानांनची रेलचेल इथे दिसून येते. प्रत्येक सोमवारी भक्तांना प्रसाद म्हणून केळी, उपवासाची चिक्की व खिचडी वाटप काही लोक मंदिर परिसरात करतात. यात्रातेला खाऊ म्हणून पेढे, रेवड्या, लाल गुळाची तर पांढरी साखरेची गुडीशेव यात्रेत विकत मिळते. पाळणे खेळून झाल्यावर आणि दमल्यावर, ओली भेळ आणि पाव भाजी यांची चव चाखल्याशिवाय लहानगे, युवा पिढी व मोठी माणसे घरी जात नाहीत. सायंकाळी साडेपाच वाजता कुस्त्यांचा आखाडा सुटल्यानंतर गर्दीच्या परतीच्या वेळी, घरी घेऊन जाण्यासाठी जिलेबीच्या दुकानांपुढे रांगेने जिलेबी खरेदी करताना, खवय्ये उशिरापर्यंत दिसून येतात.
डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर
शिव जन्मभूमी (पुणे)
9766550643




Comments