क्षण ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)
- Neel Writes

- Sep 17, 2025
- 4 min read
क्षणभर, थोडा वेळ, थोड्या काळासाठी.. जेव्हा आपण काही कालावधीसाठी बोलत असतो तेव्हा “क्षण, काळ” हा शब्द वापरत असतो. 'मी काही क्षण किंवा काळ तिथे होतो,' असा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो किंवा ऐकतो.
'वेळ आली बाका तिथं देव करी काय हो...'
'अडला नारायण धरी गाढवाचं पाय हो...'
पण वेळ कधीच कुणालाही सांगून येत नाही. आणि पुढचा क्षण कसा येईल वा जाईल हे सुद्धा कोणीही कोणास सांगू शकत नाही. ती कुणाला सुख तर कुणाला दुःख देवून जाते. काही लोक वेळे बाबत खुप पक्के असतात. हुशार आणि अनुभवी सुद्धा असतात, त्यांना ‘कोणती वेळ केव्हा येणार आहे..’ हे बरोबर माहीत असते.

हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेले अभिनेते राजकुमार यांचा खुप सुप्रसिध्द डायलॉग आहे, जो तुमचा आमचा सर्वांचा अगदी तोंडपाठ आहे.
'जानी…! हम तुम्हें मारेंगे.. और जरूर मारेंगे, पर वो बंदूक भी हमारी होगी, और गोली भी हमारी होगी, और वह वक्त भी.. हमारा होगा…!!'
आपल्याकडे प्रत्येकाकडे खुप वेळ असतो, पण काहींना जेवण, अंघोळ सर्व वेळेवर लागते. प्रत्येकाने त्या अमूल्य वेळेचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. 'मी तुझ्याकडे थोडा वेळ येईल, तुझा थोडा वेळ मला देशील का ?' असे आपण एखाद्याला विचारतो. आपण दिलेली वेळ पाळतो. परंतू त्यांना त्यांच्या कामकाजातून खुप वेळ लागणार असतो. काही लोकांना वेळेची काहीच किंमत नसते. तर काही लोकांचे कोणतेच काम वेळेवर होत नाही. आणि एखाद्या बरोबर भांडणं तंटा झालाच…! आणि त्याचा खुप राग आला तर तेही म्हणतात, “आत्ता माझी वेळ चांगली नव्हती. पण माझी जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी पाहून घेईल.” असे शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकतो.
मुलांनी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करावा. 'वेळ आहे तर मार्गक्रमण करावे' असे म्हणतात. दिवस आहे तेव्हाच चालावे, रात्रीच्या अंधारात रस्त्ते चांगले दिसत नाहीत. वेळ असेल तर मार्ग सापडेल. तुमची मुले आत्ता.. या घडीला अभ्यासाला किती वेळ देतात, किती कष्ट करतात, त्यावरच त्याचे पुढील भविष्य अवलंबून आहे. ती पुढे किती झेप घेतील, काय शिकतील, काय होतील हे येणारा काळच सांगेल. येणाऱ्या पुढील काळातच त्यांचे भविष्य दडलेले असते. पण वेळ आणि काळ कोणासाठीही थांबत नाही. काळ हळू हळू पुढे पुढे सरकत असतो. ‘आत्ता त्यांचा वाईट काळ आहे, पण… प्रत्येकाची वेळ नक्की येणार आहे.’ ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
एखाद्याच्या अपघात प्रसंगी आपण म्हणतो, 'त्याच्या मरण्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती ?' वेळेलाही किंमत असते. एखाद्याच्या अडी अडचणीच्या वेळेला जावे लागते. दुःखात सहभागी व्हावे लागते. आपण त्यांच्या सूख दुःखाच्या वेळी गेलो, तरच ते आपल्या सुख दुःखात धावून येतील. आपण जरी या जगातून गेलो तरी लोक किती काळ आपल्या बद्दल दुःख व्यक्त करतील, या विषयीच्या भावना कविवर्य भा. रा. तांबे त्यांच्या कवितेत म्हणतात...
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' मी जातां राहील कार्य काय।।
सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।

दुःख माणूस किती काळ सहन करणार ? दुसरे, शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र मंडळी तुमच्या दुःखात किती वेळ येतील ? थोड्या कालावधीसाठी ते तुमच्या दुःखात सहभागी जरूर होतील. नंतर त्यांच्या कामाला लागतील. आणि कोणाचेही, कोणतेही दुःख असेल तर काळच त्यावर उपाय शोधील. काळ हेच उत्तर असेल. हळू जसजसा काळ पुढे सरकत जाईल, तशी त्या भयानक दुःखाची तीव्रताही काळाच्या ओघात हळूहळू कमी कमी होत जाईल.
‘लग्न मुहूर्ताच्या अथवा कार्यक्रमाच्या या.. या.. वेळेला सर्वांनी हजर राहावे...’ आणि मग आपणही चांगले सजून धजून, कार्यक्रमाची मुहूर्ताची वेळ साधत लग्नकार्यास जातो. कधी लग्न वेळेवर लागते तर कधी कधी नवरदेव मिरवणुकी मुळे तर नवरी, ब्युटी पार्लर मधून वेळेवर न आल्यामुळे लग्न वेळेवर लागत नाही. लग्न लागल्यावर नवरा-नवरी, दोघांचे आई वडील आणि येणारे मित्र, नातेवाईक आता फोटो काढण्यासाठी स्टेजवर गर्दी करतात. मोबाईल, कॅमेरे व व्हिडिओ शूटिंग द्वारे आनंदाचे 'सुवर्ण क्षण' टिपण्यासाठी सर्व जण आसुसलेले असतात. आपण वेळेवर हजर राहिल्यामुळे त्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार, मानकरी आपल्या उपस्थितीमुळे आपण होवू शकतो.
माणसाला वेळेला काहीही चालते. 'वेळेला... वनवासाला सीताफळ' अशी म्हण आहे. वेळचा सदुपयोग करावा. वेळेचे गणित जुळवावे. शालेय जीवनात... परीक्षेत वेळ संपला की आपल्याला उत्तर पत्रिका जमा करावी लागते, अथवा परीक्षक आपल्या हातातून ती काढून घेतात. जीवनाचा पेपर सुद्धा आपल्याला ठराविक वेळेतच सोडवावा लागतो. नाहीतर माणूस म्हणतो, “आता आमची वेळ गेलेली आहे.” निसर्गाने आपल्याला सुंदर शरीर, मन, बुद्धी, माया आणि प्रेम भरभरून दिले आहे. हे जीवन पुन्हा नाही. वेळेत आणि आनंदाने जीवन जगून घ्या. प्रत्येकाने आपल्या जीवनात शिक्षण, उच्च शिक्षण, कला अंगिकारावी. हेच आपल्या जीवनात योग्य वेळी कामाला येईल.

'समय से पहले और भाग्य से ज्यादा न कभी किसी को मिला है और ना ही मिलेगा।'
शालेय जीवनात आपण शिकलेले भूत, भविष्य आणि वर्तमान काळ आपल्याला आयुष्यातही समजतात. आत्ताचा वर्तमानकाळ मागे सरकुन काही क्षणात भूतकाळ होतो. आणि आपण भविष्याचा वेध घेतो.
हातातून वाळू निसटून जावी तसे हळू हळू जीवनातील क्षण निसटत चालले आहेत. तेव्हा जीवनात अंतःकाळ येण्याच्या आधी प्रत्येक क्षण अन् क्षण वेळेत जगून घ्या. आणि तुमचं काही चुकलं असेल… माझं काही चुकलं असेल. परंतू… कोण बरोबर, कोण चूक हे तर येणारा काळच ठरवेल.
एका क्षणाचाही विलंब न करता… एकमेकांना भेटून घ्या. कारण जीवन हे क्षणभंगुर आहे. ‘धनुष्यातील बाण, तोंडातील शब्द आणि गेलेले क्षण परत कधीच येत नाहीत.’ वर्तमानाचा भूतकाळ होतो पण त्या क्षणांचा भविष्यकाळ… कधीच होत नाही. आयुष्यातील दुःखाचे गेलेले ते क्षण मनुष्य त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवतो. वेळोवेळी त्यांचा आठव येतो. आठवणी डोळ्यांतून पाणी काढतात. तर आनंदाचे क्षण हृदयाच्या कुपीत सुगंधी अत्तराप्रमाने जपून ठेवतो. सुख दुःखाचे हेच क्षण जीवनातील एखाद्या निवांत क्षणी, चित्रपटातील फ्लॅशबॅक प्रमाणे वेळोवेळी पुन्हा पुन्हा आठवत राहतात…
महाभारताच्या युद्धात पांडव सेनेच्या बाजूने, भगवान श्रीकृष्ण अर्जूनाच्या रथाचे सारथ्य करतात. शंखनादाने युद्ध सुरू होण्यापूर्वी फक्त काही क्षण.. युद्ध थांबवून श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. तोच श्रेष्ठ ग्रंथ “भगवद्गीता” होय.
आणि हो...आता शेवटचे, आपण सर्व सन्माननीयांनी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ काढून, माझा आजचा क्षण.. हा लेख, आत्ता या क्षणाला... वाचला त्याबद्दल आपले मनापासून आभार!
©® डॉ. प्रविण डुंबरे
ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे
९७६६५५०६४३



Comments