google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

गरज सरो...अन् वैद्य मरो... ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)

तसे तर, ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ असे म्हटले जाते. सर्व प्राणीमात्रांना स्वतःचे पोट भरण्यासाठी अन्नाची, वापरासाठी पैशांची, इतर वस्तूंची, चांगल्या विचारांची गरज असते. याच गरजेमधून आपल्याकडे जी गोष्ट नाही, ती दुसऱ्याकडे असेल तर त्याचा शोध लागला जातो. बघा... छोट्याशा मुंगीला अन्नासाठी साखरेची गरज असते. आणि.. मग एखादा गोड पदार्थ, जसे की ‘साखर…’ या साखरेचा डबा तुम्ही कितीही लपवून ठेवा, मुंगी त्याला बरोबर शोधून काढते.



गरज संपली की माणूस ज्या कोणी.. वेळेला आपली मदत केली आहे, त्याला कालांतराने विसरून जातो. योग्य वेळेला केलेली अमूल्य मदत... आपल्या दैनंदिन आयुष्यात इतर कामांमुळे, व्यावसायिक ताणतणावामुळे, मनुष्य त्या उपकाराचे ओझे विसरून जातो. काही काही वेळेला परिस्थिती चांगली आल्यावर जाणून बुजून सुद्धा... जसे काही.. ‘आपल्याला आठवतच नाही बुवा !!’ असे समजून चक्क दुर्लक्षही केले जाते.


धनुर्विद्या शिकविण्यास द्रोणाचार्यांनी एकलव्यास नकार दिल्यानंतर, द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून, जंगलात एकाग्रतेने धनुर्विद्येचा सराव करून.. एकलव्यने प्राविण्य मिळवले. द्रोणाचार्यांना गुरु मानून त्याने ही विद्या शिकली आहे… ही गोष्ट समजल्यावर, द्रोणाचार्यांनी शिष्याकडे गुरुदक्षिणा म्हणून, उजव्या हाताचा अंगठा मागितला. अर्जुनाच्या स्वार्थासाठी द्रोणाचार्यांनी जरी एकलव्यचा अंगठा मागितला, हे लक्षात येऊनही कृतघ्न न होता... क्षणाचाही विचार न करता, एकलव्यने त्यांना उजव्या हाताचा अंगठा कापून दिला. पण ही झाली पुराणकालीन गोष्ट.


आपल्या बालपणी सुद्धा शेजारीपाजारी राहणाऱ्यांना एकमेकांची गरज लागत असे. थोडेफार पैसे, दूध, साखर, कालवण यांचीही गरज एकमेकांकडून भागवली जायची. मग नंतर एखाद्या कुटुंबाची बदली होऊन ते कुटुंब दूरवर कोठे गेले, आणि पुन्हा काही वर्षानंतर भेटीगाठी झाल्या.. तर या सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांची, या निमित्ताने केलेल्या मदतीची पुन्हा आठवण आणि विचारांची देवाण घेवाण व्हायची, आणि त्या नात्यांना पुन्हा उजळणी मिळायची. विविध नाती अशा प्रकारे जपली जायची.


विचारांच्या आदान प्रदानाची गरज तर पूर्वीपासून एकमेकांना पडत गेली आहे. नोकरीत, व्यवसायात किंवा एखाद्या सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या सल्ल्याची गरज प्रत्येकालाच लागते. मित्रांनी, नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी योग्य त्यावेळी दिलेल्या सल्ल्याचा उपयोग व्यवसायात, नोकरीत आणि जीवनातही होत असतो. माणूस आपल्या जीवनात कितीही मोठा झाला असला तरीही पूर्वी आपल्याला कोणी कोणी मदत केली आहे, हे आठवावे. त्याला योग्य सन्मान द्यावा. परंतु समोरच्यानेही, कृतज्ञतेचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. जुन्या नात्यांना उजळणी द्यावी बस... मनुष्याला जीवनाच्या एखाद्या सायंकाळी... एखाद्या वळणावर... त्या जुन्या गोष्टीची आठवण व्हावी. आणि कृतघ्न होण्यापेक्षा कृतज्ञ राहावे असे वाटते.



जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा या निर्भेळ निस्वार्थी मित्र, नातेवाईक, गुरुजन व हितचिंतकांना एखादा मेसेज करावा, फोन करावा अथवा थोड्यावेळ का होईना त्यांची जरूर भेट घ्यावी. आपल्या भेटीने त्यांनाही केव्हढा आनंद होईल…! हेवेदावे, गैरसमज विसरण्यास नक्कीच मदत होईल.


परंपरागत आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये फॅमिली डॉक्टर आणि फॅमिली पेशंट ही संकल्पना आता कमी कमी होत चालली आहे. ‘गरज सरो…! आणि वैद्य मरो…!!’ ही म्हण वैद्यकीय शास्त्राला आणि पेशंटच्या नात्याला धरून जरी पडली असली तरीही, तेहतीस वर्षे वैद्यकीय सेवा दिल्यानंतर आजही आम्हाला आमच्या पेशंटच्या आरोग्याबद्दल असेच वाटते...


सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।

सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखभाग भवेत् ।


सर्व सुखी होवोत, सर्व रोगमुक्त होवोत, सर्व शुभाचे साक्षीदार होवोत आणि कोणाला दु:ख भोगावे लागू नये.


©®

लेखक-

डॉ. प्रविण डुंबरे

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page