चाहूल... ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)
- Neel Writes

- Sep 18, 2025
- 2 min read
चाहूल लागणे म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्वकल्पना येणे किंवा अंदाज येणे. तसे पाहिले तर निसर्ग खूप लहरी आहे असे म्हटले जाते. पण आयुष्यभर अनुभवांची शिदोरी ज्यांनी आपल्याबरोबर बाळगली आहे, त्यांना स्वतःला आलेल्या अनुभवांच्या जोरावर निसर्गाच्या अशा काही गोष्टींचा अंदाज लवकर येतो. काही संकटे येण्या अगोदरच त्यांची त्यांना बरोबर चाहूल लागते. नैसर्गिक आपत्ती जश्या की भूकंप, वादळ, चक्रीवादळ, वीज पडणे, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यांचा अंदाज लवकर आला तर मनुष्यहानी वाचवण्यात व होणारे नुकसान टाळण्यात माणसाला नक्कीच यश मिळू शकते.
शेताच्या खळ्यामध्ये किंवा घराबाहेरच्या अंगणामध्ये धान्य उन्हात वाळवण्यासाठी घातले असेल, आणि सायंकाळच्या वेळी ढग दाटून आले असतील, जोराचे वारे वाहू लागले असतील. तर.. हवा फिरली आहे, असे समजून व पुढे पाऊस येईल या काळजीने, पावसाची ही चाहूल शेतकऱ्याला, अनुभवी माणसाला नक्की लक्षात येते व तो जमिनीवर पसरवलेले धान्य भरून घरामध्ये किंवा आडोशाला साठवण्याची तयारी करतो. नाहीतर ऐनवेळ, पावसात धान्य भिजू नये म्हणून त्याला व घरातील सर्व लोकांना खूप धावपळ करावी लागते.

नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्रावरून जूनच्या सुरुवातीला भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि त्याचबरोबर सर्व भारतभर वाहू लागतात. थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबर तुरळक येणारे ढग, त्याबरोबर हवेमध्ये वाढणारे बाष्प, उष्णता असे हवामानात होणारे बदल जाणकारांना, शेतकऱ्यांना अनुभवाने जाणवतात. मान्सूनच्या पावसाची ही पूर्वकल्पना म्हणजेच शेतकऱ्यांना शेतात मशागतीसाठी व पेरणीसाठी पुढे पावसाचे दिवस अगदी जवळ आलेत, याची ‘चाहूल’ असते.
निसर्गाने मनुष्याला जरी बुद्धी आणि वाणी यांची देणगी दिली असली, तरी सुद्धा माणसापेक्षाही प्राणीमात्रांना, कीटक व पक्षांना निसर्गाने गंध, वास यांचे ज्ञान भरभरून दिले आहे. धरणीकंप होण्याच्या अगोदरचे काही दिवस प्राणी, कीटक, पक्षी नेहमीपेक्षा वेगळ्याच हालचाली करतात; बिळांमधून, घरट्यातून बाहेर येत सैरावैरा धावत सुटतात. वेगवेगळे आवाज काढतात असेही आढळून येते. त्यांना भूकंपामुळे पुढे येणाऱ्या संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना म्हणजेच.. ‘चाहूल’ आलेली असते.
जून महिन्यात पावसाच्या आगमनापूर्वी ‘पावशा पक्षी’ असेच पाऊस येण्याचे संकेत त्याच्या आवाजातून शेतकऱ्यांना देतो. पावशा, ‘पेरते व्हा... पेरते व्हा…’ पुढे पाऊस येणार आहे, अशी पूर्वकल्पना त्याच्या सांकेतिक भाषेतून आणि ओरडण्यातून शेतकऱ्यांना नक्कीच देत असणार. पावसाच्या आगमनाची सुखद वार्ता ‘कोकीळ’ पक्षी सुद्धा त्याच्या मंजुळ गायनाने आपणा सर्वांना देतो. राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ आभाळ भरून आल्यावर आनंदाने नाचू लागतो. मयूर त्याचा मलमली पिसारा फुलवून पाहणाऱ्या सान थोरांच्या डोळ्यांची अक्षरशः पारणे फिटवून टाकतो. आणि मग लहान मोठ्यांना तनामनाने डोलायला लावणाऱ्या या अजरामर गीता द्वार, सर्व विहंगम दृश्याचे वर्णन महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या संगीतातून आणि ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून काव्यरुपाने उतरते.
नाच रे मोरा...आंब्याच्या
वनात... नाच रे मोरा नाच.
हे पावसाच्या सुरुवातीलाच पुढे येणाऱ्या पावसाची चाहूल आणि त्याचं स्वागत !!
माझ्या आईला चाळीस वर्षापासून कानांच्या आजारामुळे ऐकू येत नाही. आत्ता ८९ वय वर्ष असले तरीही हॉल मधून सून जातानाची पायांची येणारी चाहूल आता सध्या तिला बरोबर समजत, व ती येण्याआधीच मान वळवून तिकडे बघते, असे एवढ्या महिन्यात माझ्या लक्षात आले आहे. आणि.. हीच ती, माणसं येण्याची मनातली “चाहूल.”
©®
डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर
शिवजन्मभूमी (पुणे)
९७६६५५०६४३



Comments