चेहरे आणि मुखवटे (डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)
- Neel Writes

- Sep 14, 2025
- 3 min read
माकडापासून हळूहळू चार पायांचे दोन पायांवर उत्क्रांत होत गेलेल्या आणि दोन पायांवर उभे राहून चालणाऱ्या मानवाला तर.. सर्वात उंच ठिकाणी, शरीराच्या वर डोकं आणि त्यापुढे ओळखीसाठी खूप छान असा चेहरा दिला आहे.
प्रत्येक मानव इतरांपासून वेगळा आहे हे ओळखू यावे म्हणून प्रत्येकाला वेगवेगळा चेहरा दिलेला आहे. सर्वांना एकसारखा चेहरा दिला असता तर कुणीच कुणाला ओळखू आले नसते आणि त्यातून भलता गडबड गोंधळ उडाला असता. एक सारखा दुसरा शक्यतो कोणी दिसत नाही. परंतु सख्खे भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी व भाऊ-बहिणी यांचा चेहरा बराचसा मिळता जुळता असतो. जुळ्यांचे चेहरे आपल्याला लवकर ओळखू येत नाही. कधी कधी तर त्यांच्या आई-वडिलांची सुद्धा त्यांना ओळखण्यात फसगत होऊन जाते.

प्रत्येकाच्या चेहऱ्यात वेगळेपण देण्यात निसर्गाने किमया केली असली तरी सुद्धा, असे म्हणतात… 'जगामध्ये अगदी एकसारखे सात चेहरे आढळून येतात'... मानवाच्या संदर्भात चेहऱ्यात केस, कपाळ, भुवया, पापण्या, डोळे, नाक, गाल, कान, तोंड, ओठ, दात, हनुवटी या सर्वांची गणना होते. बालपणी, वयात आल्यावर, तरुणपणी तर वृद्धापकाळी प्रत्येकाच्या चेहऱ्यात फरक पडत जातो. बालपणी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असणारा चेहरा, त्यावरील स्नायूंच्या शिथिलतेमुळे प्रौढपणी सुरकुतलेला दिसू लागतो. लग्नात किंवा समारंभात प्रत्येक जण आपण चारचौघात उठून दिसावे म्हणून पार्लर मधून सजून धजून आलेला असतो.
चेहऱ्याचा उपयोग हावभाव व्यक्त करण्यासाठी होतो. चेहऱ्याद्वारे मानव प्रेम, राग, लोभ, आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भाव वेगवेगळ्या परिस्थितीत दाखवत असतो. आनंदात चेहऱ्यावर उल्हास दिसतो, तर दुःखात चेहरा निस्तेज होतो. चोरी पकडल्यावर चेहरा एकाबाजूला वळवला जातो, किंवा पडला जातो. तर लाजेने चेहरा चुरचुर होतो, अथवा स्वतःच्या हातांनी झाकला जातो. एखाद्याला एखादा चेहरा जर खूपच आवडला तर किशोर कुमार यांनी गायलेले, कभी कभी चित्रपटातील गाणं त्याला आठवतं…
'तेरे चहरे से नज़र नहीं हटती.. नज़ारे हम क्या देखें'
चेहरे वाचता येतात. एखाद्याला पाहून नाक मुरडणे, तोंड वेंगाडने, डोळे झाकणे… पासून मिचकवणे आणि मारणे, डोळ्यांनी खूणा करणे पर्यंत, भुवया उडवणे अथवा अनपेक्षित पाहुणे आल्यावर कपाळाला आठ्या उमटने या क्रियाही चेहऱ्यावर दिसतात. बदलत्या परिस्थितीत माणसाच्या चेहऱ्यावर रंग आणि हावभाव सतत बदलत असतात. काही लोक रंगाने काळे, सावळे, गहूवर्णीय, गोरे अथवा भोरे असतात. चोरी पकडल्यावर किंवा समाजविघातक उलटी सुलटी वक्तव्य केल्यावर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काळा रंग किंवा डांबर फासले जाते. काळया चेहऱ्याची व्यक्ती जेव्हा गोरा रंग असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडते ना, तेव्हा आपसूकच 'गुमनाम' चित्रपटातील मेहमूद यांच्यावर चित्रित झालेले हे गीत त्याच्या तोंडून बाहेर पडते..
'हम काले है तोह क्या हुवा दिलवाले है...'
'हम तेरे तेरे तेरे चाहनेवाले है..'
निसर्गाने ओळखीसाठी दिलेला चेहरा झाकला जाऊन त्यावर रंग आणि वेगवेगळ्या आकाराचे मुखवटे चढवले जातात. ‘बहुरूपी ही एक कला आहे.’ आपल्या बालपणी ग्रामीण भागात “बहुरूपी” लोक स्वतःच्या चरितार्थासाठी दररोज एक, अशी वेगवेगळी बहुरुप्याची रूपे घेऊन येत असत, आणि मुलांचे व लोकांचे मनोरंजन करत असत. आता ही कला लोप पावत चालली असली तरी.. पोलीस हवालदार, इन्स्पेक्टर यांच्या रूपातले बहुरूपी त्यांच्या बहुरंगी आणि बहुढंगी बोली भाषेमध्ये वेळोवेळी आपल्याला त्यांच्यातल्या कलेची चुणूक दाखवत असतात. नाटकामध्ये विविध भूमिका वठवताना पात्राला स्वतःच्या चेहऱ्यावर रंग छटांद्वारे भूमिकेला साजेसा चेहरा बनवावा लागतो. अथवा प्लास्टिकचा किंवा फायबरचा मुखवटा चेहऱ्यावर चढवावा लागतो.

नाट्य मंदिरात भिंतींवर व मोठमोठ्या रंगकर्मींच्या घराच्या हॉलमध्ये असे मुखवट, ते करत असलेल्या कामाचा अभिमान म्हणून आपणास पाहण्यास मिळतात. रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला दहा तोंडाचा मुखवटा घालून, त्या दहा तोंडांचा तोल संपूर्ण नाटकभर सांभाळावा लागतो. सांस्कृतिक महोत्सवात अथवा राष्ट्रीय दिवसांना.. दिल्लीच्या पथसंचलनात, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटा घातलेले लोक नृत्य करून आपापल्या लोककला राष्ट्रापुढे सादर करत असतात.
दैनंदिन जीवनात आपल्या संपर्कात येत असलेले लोक सुद्धा, आपण त्यांना ओळखत असलेला चेहरा झाकून, असेच वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून फिरत असतात. पूर्वीपासून चालत आलेले वेगवेगळ्या प्रकारचे फसवणुकीचे प्रकार अंधश्रद्धा, भ्रष्टाचार आणि आत्ताचे सायबर क्राईम चे गुन्हे सुद्धा, हे मुखवटे घातलेले लोक करतात. आपण त्यांचा रंग आणि ढंग वेळीच ओळखला तर वेळेत आपली फसवणूक टळेल. आपण मोठमोठ्या धोक्यां पासून नक्कीच वाचू शकतो. म्हणूनच तर संत चोखामेळा त्यांच्या अभंगांत म्हणतात..
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥
वरवरच्या रंगाला भुलून जाऊ नका. ऊस वाकडा तिकडा असला तरी त्यातला रस गोडच असतो.
प्रत्येकाने आपल्या मनात, अंतरंगात वेळोवेळी डोकवावे. तोच आपल्या मनाचा आरसा असतो. जसे लता दीदींनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलेल्या या गाण्यात म्हटलेले आहे.
'आईना वो ही रहता है, चेहरे बदल जाते हैं..'
©®लेखक-
डॉ. प्रविण डुंबरे
ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे
९७६६५५०६४३



Comments