दीपावली - १ (डॉ. प्रवीण डुंबरे) जिवलग मैत्री आठवताना...
- Neel Writes

- Oct 16, 2025
- 4 min read
पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात चाळीस वर्षांपूर्वी मी प्रवेश घेतला. वर्गामध्ये समप्रमाणात असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या संख्येमध्ये बरेचसे विद्यार्थी हे शहरी भागातील होते. शैक्षणिक वर्षांतील कालावधीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या बेंच वरील माझ्या शेजारील विद्यार्थी हा माझ्या तालुक्याजवळच्या तालुक्यातला व एकाच महामार्गा लगतचा होता. अरुण त्याचे नाव. अतिशय गोरा, देखणा, उमदा, चांगला उंचपुरा, आणि राजबिंडा तरुण, एखाद्या चित्रपटातील हिरोला आठवावे असेच त्याचे रूप होते. वर्गामध्ये ग्रामीण भागातील आम्ही कमी विद्यार्थी असल्यामुळे सहाजिकच अरुण आणि माझी लवकरच पक्की मैत्री झाली. एकत्र अभ्यास करण्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरू होते. त्यामुळे आमच्या दोघांच्याही कुटुंबियांची नाळ सुद्धा अगदी चांगलीच जुळली होती.

प्रथम वर्षाचा अपेक्षित निकाल जरा कडकच लागला होता. फक्त 30 टक्के विद्यार्थी पास झाले होते. त्यामध्येही मुला मुलींचे प्रमाण सारखेच होते. पास होणाऱ्यांमध्ये मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही होतो. अरुण त्याच्या संपूर्ण घरामध्ये घरच्यांचा अत्यंत लाडका होता. त्याचे आई वडील खूप कष्टाळू, साधेभोळे, प्रेमळ, निगर्वी आणि माझ्यासह सर्वांनाच माया लावणारे होते. मलाही त्यांनी खूप माया आणि प्रेम दिले.
त्याचे वडील पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीसाठी होते. पुण्यातील एका उपनगरात स्थिरस्थावर असणारे हे कुटुंब होते. आपला मुलगा डॉक्टर होतो आहे, याचा त्याच्या वडिलांना खूप अभिमान होता, आणि तो प्रत्येकाला असायलाच हवा. परंतु त्यांचा पडला गरीब स्वभाव आणि कमी शिक्षण. पहिले वर्ष पास झाल्याबद्दल मुलाने बुलेट गाडी मागितली. 'आता काय तो, आज ना उद्या डॉक्टर होईलच !' अशा भोळ्या भाबड्या हिशोबाने त्यांनीही कंपनीतून कर्ज काढून नवी कोरी बुलेट आणून अरुणच्या हाती हवाली केली.
झालं..! होवू नये तेच झालं. वडिलांच्या अशिक्षित आणि मोकळेपणाचा फायदा घेत अरुणच्या महाविद्यालयात दांड्या होत गेल्या. महाविद्यालयात न जाता तो दुसऱ्याच वर्षी वैद्यकीय शास्त्रातील औषधांचा अभ्यास करू लागला. परिसरातील निष्णात वैद्यकीय व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेऊन वैद्यकीय क्षेत्रात बाहेरूनच पारंगत होऊ पाहत होता. वडिलांनी दिलेली बुलेट आणि त्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्चही त्याला या कामासाठी घरून मिळू लागला. अर्थात, बुलेटचा हप्ता भरण्याची जबाबदारी वडिलांची होती. त्यांच्या पगारामधूनच तो आपोआप वजा होत होता. त्यानंतर लगेच स्वतःच्या गावातील, स्वतःच्या घरामध्ये दवाखान्याचा बोर्ड लावून, सर्वांच्या पुढे जात अरुणने लवकर पैसा मिळवायचा मार्ग शोधून काढला होता.
'जसं..! गुळ आला की... त्याला मुंगळे चिकटलेच म्हणून समजा.' या उक्तीप्रमाणे अरुण भोवती खालच्या थरातील, अशिक्षित, मोकळ्या आणि नोकरी धंदा नसलेल्या मित्र मंडळींचा घोळका सतत पडलेला असायचा. यातील काही त्याला दवाखान्याच्या कामी मदतीलाही यायचे. वेळेच्या आधीच हातात पैसा खेळू लागल्यामुळे आणि पैशाला दुसरे काहीच काम नसल्यामुळे, 'त्यात तो बुडून जातो... आणि मग माणूस पैशाच्या मागे पार गटांगळ्या खात वाहून जातो.' त्यानंतर फुकटच्या आणि विकतच्या मैफिली जीवनात नाना प्रकारचे रंग भरू लागतात. राजकीय लोकांच्या ओळखी पाळखी वाढतात. त्यांनाही हेच हवे असते. गावातील एखाद्या पक्षातील मुख्य पद आयते चालून येते. अरुणच्या बाबतीतही असेच झाले.
अरुण मला मध्ये मध्ये येऊन भेटत होता... "की महाविद्यालय काय म्हणतयं ??" आता, कोणतेही महाविद्यालय थोडेच कुणाची तक्रार करणार आहे ? महाविद्यालयात, 'येणारे येतात... जाणारे जातात.' ते आपले निरंतर विद्यादानाचे काम बजावत असते. संपूर्ण वर्गामध्ये त्याच्या जवळचा मी एकमेव मित्र होतो. त्यामुळे भेटल्यावर त्याच्या जीवनात तो किती वाहवत गेला आहे, हे मला तो प्रांजळपणे सांगत असे. अरुणाला सर्व प्रकारच्या व्यसनांनी घेरले होते. एका अभासी जगात तो वावरत होता. स्वतः नायकच्या भूमिकेत असल्यासारखा त्याचा अविर्भाव होता. आपण यात अखंड बुडत चाललोय, याची त्याला आता पुरती जाणीव होवू लागली होती. आणि चक्रव्युहाप्रमाणे यातून बाहेर पडण्याचे कोणतेही मार्ग त्याला दिसत नव्हते. परंतु एखाद्या चित्रपटाला कथानक पुरवले जाऊ शकेल एवढा जीवनात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचा साठा त्याच्याकडे होता. आणि अर्थात त्यामधील मुख्य नायकाच्या भूमिकेत तोच जगत होता.

अरुणच्या वडिलांचा, कुटुंबाचा आणि आमचा, मधल्या काळात संपर्क सुरूच होता. आणि आजही तो चांगल्या पद्धतीने आहे. मुलांवर आशा ठेवून असलेल्या वडिलांकडून मुलाविषयी कर्तृत्वाची आणि मोठेपणाची वाक्य जणू काही शाबासकी मिळतात, अशीच झाली होती. मुलांवर प्रेम, माया करणे गुन्हा नाही. परंतु त्यासोबत त्यांच्यावर बालपणात व विद्यार्थी दशेत होणाऱ्या संस्कारांची शिस्तही पालकांकडून कमी पडता कामा नये. हिच शिस्त सतत तोंडात हरीनाम असलेल्या अरुणच्या वडिलांकडून कमी पडली, असे मला सदोदित वाटते. एक दिवस सकाळी त्यांचाच मला दूरध्वनी आला, आणि... "अरुण बरेच दिवस आजारी आहे. भेटून जा... काही उपचार होतात का बघ !" त्यांच्या त्याकाळच्या थोड्याशा अस्पष्ट ऐकू आलेल्या आवाजामुळे... आणि कमी वेळच्या बोलण्यामुळे, त्याला अपघात तर नक्की झाला नसावा, असे माझे स्पष्ट मत बनले. परिसरातील वैद्यकीय व्यावसाईकांबरोबर त्याच्या प्रचंड ओळखी पाळखी आणि उठबसही होती. मग... माझी एव्हड्या उशिरा त्याला गरज का पडावी ?? आणि अरुणच्या संपूर्ण आयुष्याच्या एकंदरीत चित्रपटासारख्या जीवनाच्या विश्लेषणावरून मी त्याच क्षणी, त्याच जागी... त्याच्या आरोग्याचे निदान मनातल्या मनात केले होते. त्यानंतर दोनच दिवसात त्याला भेटण्यासाठी आणि पाहण्यासाठी त्याच्या घरी जाण्याचे निश्चित करून मी पोहोचलो.
'अरुणला नक्की काय झाले असेल ??' याची जाताजाता आणि त्याच्या घराच्या उंबऱ्यातून आत मध्ये प्रवेश करताना... माझ्या मनाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. भिती, काळजी आणि घबराट एकाच वेळी उत्पन्न झाली होती. प्रथमतः दर्शन झाले ते त्याच्यावर अतिव प्रेम करणाऱ्या त्याच्या वडिलांचे, अगदी हात जोडतच. त्यांना माझ्या मध्ये, त्यांच्या मुलाचा मित्र म्हणजे देवदूत वाटत असावा. नजरेनेच मी इकडे तिकडे शोधले... भिंतीच्या एका बाजूला मला एक कॉट दिसली. त्यावर आणखी कुणालातरी पाहण्याचा प्रयत्न मी केला. अर्थात! माझा मित्र, अरुणला... पण पूर्वीचा त्याचा तो राजबिंडा देह आता तसा राहिला नव्हता. त्या कॉटवर मी हाडांचा फक्त सांगडा असल्यासारखा त्याचा देह पाहून... मनातल्या मनात तर टरकलोच. त्यानंतर लगेच त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द पुढील प्रमाणे बाहेर पडले.
" वाचव रे...मित्रा ! मला या आजारातून..."
आणि... हे सर्व मला समोरच दिसत असलेल्या त्याच्या शारीरिक अवस्थेवरून जाणवत होते. की.. नियतीने त्याला दिलेली आयुष्याची दोरी आता संपत आली होती. वाळूच्या घड्याळातून पडणारी रेती सतत, आपोआप ओघळत शेवटची पडत चालली होती...
सगळ्याच प्रकारचे असंख्य उपचार करून झाले होते. कुणाच्याच हातात आता कोणत्याच प्रकारचा वेळ नव्हता. माझ्या परीने त्याच्या वडिलांना या सर्व आजाराची माहिती मी करून दिली होती. अरुण फार थोड्याच दिवसांचा आमच्या सर्वांचा सोबती होता. सर्वांकडून दुःखद प्रसंगी सांत्वन तर मिळतेच पण आई-वडिलांचे दुःख त्याच्याही पुढे असते. त्यांच्या या जन्माला ते शेवटपर्यंत नक्कीच पुरते. आजही आमची दोनही कुटुंबे अधून मधून एकमेकांची ख्याली खुशाली विचारत असतात. अरुणला या जगातून जाऊन आता वीस वर्षे झालीत. तरीही... आजही त्याचे भोळेभाबडे वडील, वेळोवेळी अरुणला माझ्यामधेच शोधत असतात...
©®
लेखक-
डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर
शिवजन्मभूमी, जुन्नर (पुणे)
९७६६५५०६४३



Comments