google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

दीपावली - २ (डॉ. प्रवीण डुंबरे) : वरदहस्त

'वरद' म्हणजे वर देणारा आणि हस्त म्हणजे हात. वरदहस्त म्हणजे कुणाची तरी कृपा असणे. म्हणजेच अशी व्यक्ती किंवा गोष्ट, जी आशीर्वाद देते. "वर" म्हणजे इच्छित फल, सुख, समाधान किंवा वरदान. एखाद्याच्या डोक्यावरून ठेवलेला, आशीर्वाद देणारा हात म्हणजे "वरदहस्त." या हाताखाली असणाऱ्याला आत्मविश्वास, संरक्षण, सुरक्षितता, आणि कार्यपूर्तीची प्रेरणा मिळते. अष्टविनायकांपैकी 'वरदविनायक' गणेश आपणा सर्वांना माहित आहेच. सर्वच देव देवतांचे असंख्य भक्त या भुमंडळी आहेत. ते मनोभावे आणि नित्यनेमाने त्यांच्या मनातल्या देवांची अनंत प्रकारे सेवा, प्रार्थना, पूजाअर्चा करत असतात. नवस, तसेच तो फलरुप व्हावा म्हणून उपवासही करतात. त्यांची ही तपश्चर्या फळाला येऊन त्यांच्या जीवनात त्यांना सुख, शांती, समृद्धी आणि मनशांतीची प्राप्ती होत असते. ते त्या देवतांचे भाविक भक्त असतात, आणि त्या देवतांवर त्यांची अपार श्रद्धा असते. मानवाच्या जीवनात 'आशीर्वादाचे' फार मोठे महत्त्व आहे. आशीर्वाद हा केवळ शब्दांचा उच्चार नसतो, तर तो अनुभवी, ज्येष्ठ, साधुसंत, आई-वडील किंवा गुरुजन यांच्या अंतःकरणातून निघालेला मंगल विचार आणि ऊर्जास्त्रोत असतो. या आशीर्वादाचे प्रतीक म्हणजे वरदहस्त.



भारतीय संस्कृतीत वरदहस्ताची संकल्पना अत्यंत गूढ आणि दैवी मानली जाते. मंगलकामना, सदिच्छा आणि सदैव संरक्षण यांचे ते प्रतीक मानले जाते. एखाद्या संताचा, गुरूचा किंवा देवतेचा हात वर करून दिलेला आशीर्वाद म्हणजे त्यांची कृपा झाली, असे समजले जाते. गणपती, दत्तात्रेय, विष्णू, देवी, शंकर अशा अनेक मूर्तींमध्ये आपण वरदहस्ताची मुद्रा पाहतो. ती मुद्रा म्हणजे भक्ताच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन मंगलमार्ग खुला होतो. दैवतांनी भक्ताला, अभ्यासू माणसास आशीर्वाद दिला...

"यशस्वी भव...! म्हणजे देवच पावला!!"


वरदहस्त म्हणजे करुणा, दया, क्षमा, आणि मार्गदर्शन. जीवनातील अंधःकार दूर करून माणसाला सत्य, प्रेम आणि परमेश्वराकडे नेणारा असतो. पालकांचा आशीर्वाद हा संततीसाठी सुखकारक मार्गासाठी शुभेच्छा संदेश असतो. त्यांच्या साथीनं मुलं यशस्वी होतात. गुरूचा वरदहस्त शिष्याला ज्ञानमार्गावर स्थिर करतो. साधुसंतांचा वरदहस्त समाजाला शांतता, सदाचार आणि भक्तीमार्ग दाखवतो. आपल्या प्रत्येकाला सतत कुणाचा ना कुणाचा आशीर्वाद, वरदहस्त हवा असतो. आणि तो लाभतही असतो. त्यामुळे मानसिक शक्ती, धीर आणि प्रेरणा मिळते. संकटात, भीतीत, निराशेत एखाद्याच्या वरदहस्ताची जाणीव झाली की माणसाचा आत्मविश्वास बळावतो.


काल्पनिक स्तरावर असे मानले जाते... ज्या काळात देवांचे आणि दानवांचे राज्य अस्तित्वात होते, अशा प्राचीन काळी राक्षसांना.. सुद्धा देवांचा वर, वरदहस्त अथवा आशीर्वाद लाभलेला असायचा. खूप काळ आणि कठीण तपश्चर्या, भक्ती यांच्या जोरावर ते तो सहज साध्य करायचे. देव देवताही त्यांच्या या निस्सीम भक्तीवर प्रसन्न व्हायचे आणि... 'वत्सा !! तुला हवा तो वर माग! ' असे बोलून जायचे. देव मग, "तथास्तु" म्हणताच.. तो वर त्याच्या अंगी शिरकाव करायचा. अंगात प्रचंड ताकद यायची, शक्ति प्रसन्न असायची. आणि पाठ शस्त्र अस्त्र यांनी आपोआप सदैव सज्ज राहायची. त्याच्याच जोरावर मग, वर मिळालेले राक्षसी लोक गोर-गरिबांना लुटायचे, छळायचे. मनात अहंकार, गर्वाने जागा घेतली जायची. आणि ज्या देवांकडून शक्ती, शस्र-अस्र प्राप्त झाली आहे, त्यांच्या विरोधातही, पुन्हा वापर करायचे. प्रचंड विध्वंस करायलाही ते धजत असत.


संतजन भक्तांना सदैव असे सांगतात की, "ईश्वराचा वरदहस्त तुमच्या पाठीशी आहे."

" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. "

याचा अर्थ असा की माणसाने कितीही संकटात असले तरी त्याच्या श्रद्धेने आणि प्रामाणिक कष्टाने तो देवाच्या आशिर्वादामुळे मार्ग काढू शकतो. वारकरी संप्रदायात पंढरीनाथाच्या चरणी जाणाऱ्या वारीकऱ्यांना नेहमी विठ्ठलाचा वरदहस्त मिळतो, अशी त्यांची ठाम श्रद्धा असते. वरदहस्त म्हणजे केवळ हातावर ठेवलेली मुद्रा नसून तो आशेचे, श्रद्धेचे आणि आत्मविश्वासाचे रूप आहे. जिथे वरदहस्त असतो तिथे भीती नाही, आणि असुरक्षितताही नाही. तर असते एक सकारात्मक ऊर्जेची अनुभूती, जी प्रत्येकाला जीवनात पुढे जाण्याची नवी ताकद देते.



या संपूर्ण जगाला निसर्गाचा "वरदहस्त" लाभला आहे. प्रत्येक माणसाला निसर्गतःच कोणते ना कोणते वरदान मिळालेले आहे. मिळालेल्या वरदानाचा प्रत्येकाने योग्य तो वापर करून गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही याचा विचार आणि अवलंब प्रत्येकाने जरूर केला पाहिजे. मोठ्या लोकांचा वरदहस्त आपल्यावर आहे म्हणजे आपण हवे ते करू शकतो. कायदा वाकवू शकतो, पायदळी तुडवू शकतो... असे मात्र होऊ देऊ नये. त्याने सगळीकडे अराजकता जन्म घेते. देशातील एखाद्या राज्याचे अथवा, राज्यातील जिल्ह्याचे नाव बदनाम व्हायला वेळ लागत नाही. जसा की... गुन्हेगारी जगतामुळे बरेच दिवस गाजत असलेला बीड जिल्हा. राजकारणात बस्तान बसवल्यावर सर्वच पक्षातील राजकारणी लोकांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या किंवा मुलांच्या पाठीशी असणारा वरदहस्त समाजात सगळीकडेच हस्तक्षेप करत असतो. या लोकांच्या चुकांना पाठीशी घालण्याचे काम मोठमोठी राजकीय मंडळी करताना दिसतात. कार्यकर्त्यांकडून होणारी भांडणे, मारामाऱ्या, खून, अनैतिक व्यवसाय, अवैधरित्या जागा बळकवणे, गुंडगिरी यांना त्यांच्याकडून अभय दिले जाते. शासकीय वा प्रशासकीय कामांमध्ये त्यांच्याकडून हस्तक्षेप केला जातो. जीवनातील सर्वच घटकांना यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षक, गुरु, आई-वडील आणि निसर्ग यांचा चांगला "वरदहस्त" आपल्यावर नेहमीच असायलाच हवा.


©®

लेखक-

डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

शिवजन्मभूमी, जुन्नर (पुणे)

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page