google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

दीपावली - ३ (डॉ. प्रवीण डुंबरे) प्रामाणिकपणाचे फळं : एक नाहीतर तीन लिंबं

पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील आमची एक सोसायटी. आजूबाजूच्याही सोसायटीच्या लोकांना जवळच दररोजचा भाजीपाला मिळावा आणि विक्री व्हावी म्हणून, आमच्या सोसायटीच्या बाहेरच 'गंगाधर' भाजीपाला विक्रीसाठी बसतात. रोजचा ताजा भाजीपाला तो आणत असतात. याकामी त्यांना त्याची दोन मोठाली मुलं सतत मदत करतात. कोण वजन करून देतो, तर कोण पैशाचा हिशेब करत असतो. या ठिकाणी मोठाली दुकाने आहेत. ती उघडायला साधारणतः साडेदहा ते अकरा वाजतात. दुकानांसमोर तोपर्यंत अक्षरशः हातावर असणारा या सर्वांचा व्यवसाय सुरु राहतो. गंगाधरची रिक्षा माल घेऊन येईपर्यंत, लोक सकाळी सकाळी सात वाजताच वाट पाहत बसलेले दिसतात. आणि गाडी आल्यावर व त्यांचा माल मांडून झाल्यावर त्यावर सर्वजण अक्षरशः पटपट भाजीपाला व फळे घेत तुटून पडलेले दिसतात. त्यांचा मोठा मुलगा गौरव तर सर्व ग्राहकांचा आवडता आहे. "गौरव मला हे दे... ते दे. गौरव दादा, पैसे ऑनलाईन पाठवले बरका..!" असे म्हणत मोबाईल वरील संदेश लोक दाखवत असतात.



या सर्व गर्दीचे कारण म्हणजे, या सर्वांचा सचोटीने ते करत असलेला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय. गोड, संयमाने, कुणावरही न रागावता बोलणे. सर्व कामात जीव ओतून लक्ष देणे आहे. आणि यशस्वी व्यवसायाचे आणखी एक मुख्य सूत्र म्हणजे... माल खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दादा, ताई, काका, काकू इत्यादी नावांनी संबोधणे. त्याच बरोबर ते माल विकतात किंवा त्याचे वजन करतात म्हणजे, वाजनाचा काटा अगदीच काही तंतोतंत नसतो. तो थोडा जास्तीचा माल ते त्यात टाकतात. चारशे पाचशेच्या वर भाजीपाला गेला तर ते ग्राहकाला एखादे दुसरे लिंबू असेच त्याच्या पिशवीत प्रेमाने ढकलतात. माल घेतलेल्या ग्राहकाला त्याने मागणी केल्यावर, दोन चार काड्यांचा कढीपत्ता तर ते, असाच देतात. तिथे कढीपत्ता दररोज ठेवलेला असतो, पण विक्रीसाठी नसतो. स्वच्छ, सुंदर, ताजा, टवटवीत, निवडलेला व खराब नसलेला माल हेच त्यांच्या व्यवसायाचे गुपित असावे. "ग्राहक देवो भव..!"


मला त्यांच्याकडे खरेदीसाठी गेल्यावर नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे, हे हिशोब किती जलद करतात ? आता इतकी गर्दी होते आहे म्हटल्यावर... कोणाचे किती पैसे घ्यायचे आणि द्यायचे राहिले... यामध्ये यांची नक्कीच गल्लत होत असणार. चारही बाजूंनी तुडुंब असलेल्या गर्दीत, एखाद्याचा हिशोब झाल्यावर यांचे लक्ष दुसऱ्या ग्राहकाकडे भाजीपाला देण्याकडे, आणि भाजीचे वजन करण्याकडे वळते. मग पहिला ग्राहक फोन पे अथवा गुगल पे वर स्कॅनर करून यांना त्यांच्या खात्यावर पैसे पाठवत असतो. लोक मेसेज दाखवत असतात... पण यांचे तिकडे लक्ष तर हवे ना? 'गर्दी इतकी असते तर, काही जण त्याचा गैरफायदा तर घेत नसतील ना ??' कधी कधी प्रामाणिकपणा दाखविण्यामुळे आपल्याला तात्पुरते नुकसान झाल्यासारखे वाटते. खोटेपणा, कपट, फसवणूक करून एखाद्याला लगेच फायदा मिळतो; पण तो दीर्घकाळ टिकत नाही. खोटे कितीही सजवले तरी ते एक दिवस उघडकीस येते. त्यांना मी खूप वेळा सांगितले की... "तुमचा एखादा माणूस फक्त पैसे आलेत का ?" यावरच लक्ष केंद्रित करताना असावा." पण.. गंगाधर रावांचे म्हणणे असे की, "सर, सर्व जण देऊनच जातात की. आणि शेवटी वरचा आहेच की." "देवाकं काळजी रे.." असे म्हणत दुसरा एखादा ग्राहक त्यांना पैसे पाठवल्याचा संदेश मोबाईल वर दाखवतो. आणि ते मग हात जोडून हसतमुखाने म्हणत राहतात...

"धन्यवाद सर !!"


आता आज सकाळी मी त्यांच्याकडे काही भाजीपाला व फळे खरेदी केली. व पिशवीला गाठ मारून त्यांच्याकडेच ठेवली. "फिरून येतो आणि जाताना... पैसे देऊन, पिशवी घेऊन जातो." असे सांगून मार्गस्थ झालो. फिरायला जाताना सौभाग्यवती बरोबर होत्या. जाता जाताच ती मला म्हणाली... "यांचे आज जे बिल होईल त्यामध्ये आणखी ४५ रुपये अधिकचे करून त्यांना पैसे द्या. परवा मी भाजीपाला घेताना, मोबाईलवर स्कॅन झाले नाही म्हणून द्यायचे राहिले आहेत." त्यानंतर फिरण्याच्या परतीच्या मार्गावर माझे मित्र, देशमुख साहेब भेटले. व म्हणाले, "मॅडमची काही हरकत नसेल तर, आपण दोघे, एक चौक आणखी पुढे चालत जाऊ." मग मॅडमनेही माझ्याकडून घराची चावी घेतली, आणि आमच्या पुढे चालत राहिल्या. व जाताना म्हणाल्या... "मी पुढे घरी जाते परंतु, तुम्ही येताना गंगाधररावांचे माझ्याकडे राहिलेले ४५ रुपये देऊन या. आणि आपण बाजूला वजन करून ठेवलेली भाजीपाल्याची पिशवी विसरू नका."




फिरून झाल्यावर मी गंगाधरच्या दुकानापुढे येऊन थांबलो. नेहमीच असणारा ग्राहकांचा गराडा त्यांच्याभोवती अजूनही तसाच दिसत होता. गौरवला मी नजरेनेच खुणावले, व माझ्या भाजीपाल्याच्या पिशवीतील मालाचा हिशोब करून देण्यास सांगितले. त्याने केलेल्या बेरजेत, मी मॅडमचे परवाचे राहिलेले ४५ रुपये मिळून मोबाईलवर पाठवत असल्याचे सांगितले. गौरवला पैसे पाठवल्याचा संदेश दाखवल्यावर त्याने, माझ्या पिशवीत हळूच एक लिंबू ठेवून दिले. ही त्याची मला मिळालेली प्रेमाची भेट होती. गौरवच्या शेजारीच उभे असलेले गंगाधर आता नुकतेच, एका ग्राहकामधून मोकळे झाले होते. एव्हढ्यात पैसे पाठवल्याचा, मी गौरवला दाखवत असलेला संदेश त्यांच्याही दृष्टीस पडला होता. मॅडमचे परवाचे द्यायचे राहिलेले ४५ रुपये तुमच्या हातचे होते, व आजचे अधिक परवाचे ४५ असे एकूण सर्व पैसे पोहोच झाले असल्याचे मी गंगाधररावांना सांगितले. त्यांचे लगेचच हसतमुखाने "धन्यवाद! सर" असे शब्द आले. आणि त्याबरोबरच त्याच्या हातात दोन लिंबे आली. नको म्हणत असतानाही... "राहू द्या हो..!!" म्हणत, ती दोन लिंबे आता आधीच्या लिंबाशेजारी आमच्या पिशवीत विसावलीही होती.


माणसाच्या आयुष्यात अनेक गुणधर्म आवश्यक असतात. बुद्धिमत्ता, परिश्रम, धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण जसे महत्त्वाचे आहेत, तसेच प्रामाणिकपणा हा गुण आपले आयुष्य अधिक सुंदर आणि समाधानकारक बनवतो. मनाला आनंद देऊन नाती वृद्धिंगत करत असतो. प्रामाणिकपणाने मागचे राहिलेले पैसे आठवण करून मोबाईलवर पाठवल्यावर मला, तीन लिंबाचे फळ मिळाले होते. आणि धन्यवाद! तर आणखी वेगळेच. खरं तर एखाद्या गरीब विक्रेत्याला फसवून आपण काय माडी बांधणार नसतो. त्यांनाही त्यांच्या कष्टाचे फळ मिळायला नको का? प्रामाणिकपणाचे फळ त्वरित मिळाले नाही तरी, ते काळानुरूप गोड आणि चिरंतन ठेव स्वरूपात आपल्या नशिबात साठत असते. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसायला पाहिजे. पुढच्याच्या मनात आपल्याबद्दल चांगली प्रतिमा तयार व्हायला हवी. परिस्थितीचा गैरफायदा सर्वांनीच घेतल्यावर मात्र, त्यांचे जीवन दलदलीत फसून गेल्यासारखे होवू शकते. समाजाबद्दल निराशा येऊ शकते. अशा आणि कोणत्याही प्रकारे, कुणीच कुणाला फसवू नये याकरता... यापुढे आपण सर्व जणांनी, प्रामाणिकपणे.. प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न करूया.


©®

लेखक-

डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

शिवजन्मभूमी, जुन्नर (पुणे)

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page