दृष्टी आड सृष्टी ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)
- Neel Writes

- Sep 11, 2025
- 3 min read
डोक्याच्या कवटीच्या खोबणीत माणसाला एक नव्हे तर दोन डोळे दिलेले आहेत. वस्तूंवर प्रकाश पडला की त्यावरून परावर्तित होणारे किरण डोळ्यामध्ये पोहोचतात, त्याची संवेदना मेंदूकडे जाते. तिथे त्याची प्रतिमा तयार होते. दोन्ही डोळ्यांची प्रतिमा एकत्र होऊन आपल्याला एक वस्तू दिसते. डोळ्यांमुळे आपल्याला वस्तूचे रंग रूप आणि खोली कळते. डोळे तिरळे असल्यावर अनेक वस्तू दिसणे, तसेच रंगांधळेपणा, रातांधळेपणा जवळचे अथवा लांबचे न दिसणे, अंधुक दिसणे किंवा पूर्ण अंधत्व येणे इत्यादी डोळ्यांचे दोष आढळतात. माणसाला व बऱ्याच प्राणी, पक्षी यांना जन्मानंतर लगेच दिसत असले तरी, श्वानांना दृष्टी यायला साधारणतः २१ दिवस लागतात.

डोळ्यांना दिसते ती दृष्टी. आणि वस्तूवर मनुष्य डोळे फिरवतो ती नजर असते. नजरेला जे दिसते आणि जे जे माणसाने आजपर्यंत पाहिले आहे तेच माणसाचे जग असते. एकावेळी सर्व काही आपल्याला दिसत नाही. जे काल किंवा थोड्या वेळापूर्वी पाहिले होते त्यात सुद्धा क्षणात काही बदल होत असतात. बालपणी किंवा एखाद्याला नुसते डोळे असले म्हणजे दृष्टी येत नाही. दृष्टी यायला वेळ लागतो. मग हळू हळू दृष्टीकोन तयार होत जातो. एखाद्या बद्दल आपला वेगळा दृष्टीकोन असतो. चूक असेल अथवा बरोबर, परंतू एखाद्या ठिकाणी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. तरुणपणी एखाद्या वर नजर जाते आणि माणूस प्रेमात पडतो. वृध्दपणी ही दृष्टी, नजर हळूहळू क्षीण व्हायला लागते. मोतीबिंदू मुळे आणखी कमी होते तर शेवटी दिसण्याचे बंद होऊन जाते.
महाभारतातील युद्धात रणांगणावर न जाता आंधळा राजा धृतराष्ट्र याला महाभारत युद्ध पाहण्याची आणि दृश्याद्वारे ती समजावून सांगण्याची 'दिव्य दृष्टी' संजयाला मिळाली होती. डोळ्यांना पूर्ण दिसत नसले तरी काही जणांना देवाने स्पर्शज्ञान, गंधज्ञान यासारखी खुप काही वैशिष्ट्ये इतरांपेक्षा जास्त दिलेली असतात. संपूर्ण अंध असणारे काही लोक इंजिन मधील आवाजावरून त्यातील दोष ओळखून, संपूर्ण इंजिन उघडून त्यातील दोष दूर करण्याची कामे लीलया करतात. त्यांचे हे वेगळेच जग आपल्याला कितीतरी कमालीचे वाटत असते.
आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या खुप काही वस्तू, जीवजंतू असतात. त्यांचे सूक्ष्म भिंगाखाली निरीक्षण केल्यावर आपल्याला त्या दिसू शकतात. प्रत्येक ठिकाणची सृष्टी, विश्व वेगळे असते. आणि आपण त्या दृष्टीकोनातून पाहिले तरच आपल्याला दिसते. आपण नेहमी ऐकतो... 'बेडूक नेहमी ज्या तळ्यात वावरत असतो, तेच बेडकाचे जग असते.' नेहमीचे जग सोडून आपण बाहेर पडलो तरच वेगवेगळी सृष्टी आपल्या नजरेस पडेल. आपली दृष्टी बदलेल. आपल्या मुलांना सुद्धा नवनवीन जग आपण दाखवले पाहिजे तरच त्यांचा उत्कर्ष होईल.

संपूर्ण जग आपल्याला दिसत नाही. आपल्या पाठीमागे कोण काय बोलते ते आपल्याला कळत नाही. हॉटेलमध्ये कुठे तरी आपण वडापाव, मिसळ खातो. चवीला तर हे सर्व खुप चांगले लागते. पण जर त्यांच्या स्वयंपाकगृहात डोकावून पाहिले तर, आपण त्या हॉटेल मध्ये पुन्हा जाणार नाही आणि काही खाणार सुद्धा नाही. इतकी जंतूंची वाढ आणि अस्वच्छता तिथे असते. पण खावून झाल्यावर आपल्याला कळते.. कशी असते ही, 'दृष्टी आडची सृष्टी.' कोणाच्या खिशात, घरात, बँकेत किती पैसे आहेत, अथवा कुणाच्या मनात काय विचार चालले आहेत. हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग आपण म्हणतो,
'दिसतं तसं नसतं.. म्हणून तर जग फसतं'.
आपण एखादा डोंगर चढून गेल्यावर थकून भागून जातो. पण डोंगराच्या टोकावर गेल्यावर, सामोरचा जो आपल्याला नजारा दिसतो ना... तो आपण कदाचित यापूर्वी कधीही तशा प्रकारचा पाहिलेला नसतो. आणि… मग आपण म्हणतो. 'व्वा..!! काय तो सुंदर, अप्रतिम निसर्ग..!! डोळ्याचे अगदी पारणे फिटले.' हीच ती दृष्टी आडची सृष्टी असते. आपल्या मुलांना सुद्धा एखाद्या शिडीने भिंतीच्या पलीकडचे नवीन जग जरा पाहू द्या. कदाचित ते त्यांचे वेगळे विश्व निर्माण करतील.
आता तुमचे वय झाले असेल ? तुम्हाला दिसायला कमी झाले असेल? तर.. तुमचे डोळे डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा. कदाचित तुम्हाला चष्मा लागू शकतो.
आणि हो…! या वरवरच्या भिंगा बरोबर तुमचा, एखाद्या बद्दलचा दृष्टीकोन कायमच संकुचित, व चुकीचा असेल तर, हा दृष्टिकोनही बदलला जावून, नात्यात सुद्धा बदल होऊन जाईल…? आणि, काय माहित..?? हे जग आणखी सुंदर दिसू लागेल.
©®
लेखक-
🦚 डॉ. प्रविण डुंबरे 🦚
ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे
९७६६५५०६४३



Comments