निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" निवडणुकीचा कल्ला
- Neel Writes

- Nov 13, 2024
- 1 min read
खास रे टीव्ही निर्मित "वर्गमंत्री" वेब सीरिजचा ट्रेलर लाँच, ८ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, आता शाळेतील वर्गमंत्री निवडणुकीचा कल्ला सुरू होणार आहे. मराठीतील आघाडीचे कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्या माध्यमातून "वर्गमंत्री" या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तम स्टारकास्ट दिसणार आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, ८ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

"वर्गमंत्री" ही वेब सीरिज अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट यांच्या बॅनरखाली नरेंद्र फिरोदिया यांनी निर्मित केली आहे. संजय श्रीधर कांबळे लिखित-दिग्दर्शित या वेब सीरिजचं संकलन कृष्णा जन्नू यांनी केलं आहे, तर छायांकन अजय घाडगे, संगीत निरंजन पाडगावकर, पार्श्वसंगीत श्रेयस एरंडे, आणि कला दिग्दर्शनाची जबाबदारी सागर गायकवाड यांनी पार पाडली आहे.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच नागरिकशास्त्राचे महत्त्व पटावे आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख व्हावी या उद्देशाने शाळांमध्ये निवडणुका घेतल्या जातात. अशाच प्रकारे "वर्गमंत्री" पदासाठी निवडणूक घेण्याचे ठरवले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी, अर्ज भरणे, प्रचार, मतदान यासारख्या सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल "वर्गमंत्री" या वेब सीरिजमध्ये रंगवण्यात आली आहे. ट्रेलरमधूनच या सीरिजचे मनोरंजनात्मक स्वरूप स्पष्ट होते. मराठी वेब विश्वात खास रे टीव्हीची एक वेगळी ओळख आहे, विशेषत: ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित अस्सल मराठी कंटेंटसाठी. त्यामुळे "वर्गमंत्री" सारखी वेब सीरिजदेखील लक्षवेधी ठरेल याबद्दल शंका नाही.


Comments