google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

पैसा( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)

आपल्या बालपणी आपण छंद म्हणून एक, दोन, पाच, दहा, पंचवीस पैसे… तर चार आणे, आठ आणे असे पैसे पहात होतो. आणि छंद म्हणून जपून ठेवत होतो. अजूनही हे छोटे छोटे पैसे बंद झाले असले, तरी काही लोकांकडे त्यांच्या आवडीच्या व छंदाच्या स्वरूपात संग्रहित आहेत. छोट्या छोट्या पैशांमध्ये आता माणसालाही रस राहिला नसला तरी, या पैशांचेच मिळून रुपयांत रूपांतर झालेले आहे. भारताचे चलन हे रुपयात मोजले जाते. एक रुपयापासून... पाच, दहा, शंभर, हजारो, लाखो आणि कोट्यावधी, अब्जावधी असे... पुढे पुढे रुपये मोजले जातात. प्रत्येक देशाचे चलन हे नाणी व नोटांच्या वेगवेगळ्या स्वरूपात असतात. प्रत्येक देशांच्या नोटा त्यांच्याच देशांमध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारात चालतात. इतर देशांमध्ये प्रवासास जाण्यासाठी हे चलन आपल्याला त्या देशांकडून बदलून घ्यावे लागते. परंतु बालवाडीतल्या या लहानग्यांना पैसे दिल्यावर पाऊस पडेल अशी भाबडी आशा या गीतातून असते.

'

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा'

'पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा'




आपल्या बालपणी पैसा खूप कमी होता. त्याकाळी व्यवहार सुद्धा पैशांच्या स्वरूपात कमी होत असत. बारा बलुतेदारी पद्धत त्याकाळी अस्तित्वात होती. शेतकऱ्यांना त्याकाळी सुगीचे दिवस होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. अन्नधान्यावर जगणाऱ्या मानवाला प्रत्येक जाती जमातीमध्ये, त्यांच्यामध्ये असलेल्या कलांचा वापर करून किंवा त्यांच्याकडील वस्तू खरेदी करून त्याच्या बदल्यात, मोबदला म्हणून धान्य दिले जात असे. प्रत्येक राजांचे त्यांच्या त्यांच्या काळात स्वतःच्या टाकसाळीत नाणे तयार केले जायचे. फक्त त्यांच्याच राज्यात त्यांचे चलन चालत असे. शालिवाहन काळात कोकण आणि घाटावरील लोकांना एकमेकांकडे जाण्याच्या मार्गामधील, नाणेघाटामध्ये चलन जमा करण्यासाठीचा असाच, दगडी रांजण खळगा अद्यापही अस्तित्वात आहे.



छत्रपती शिवरायांनी सुद्धा त्यांचे स्वतःचे नाणे हे “होन” स्वरूपा, स्वतःच्या टाकसाळीद्वारे चलनात आणले होते. आपल्याकडे आढळणारे पैसे, ‘खणखण’ वाजणाऱ्या नाण्यांच्या अथवा नोटांच्या स्वरूपात आहेत. नाण्यांवर किंवा नोटांवर प्रत्येक देशाचा नैसर्गिक, सांस्कृतिक वारसा चित्रे रुपाने छापलेला दिसतो. आपल्या देशाच्या नाण्यांवर व नोटांवर धरण, नद्या, डोंगर, धान्य, नांगरणारा शेतकरी तर पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी अशा अनेक थोर नेत्यांच्या प्रतिमा उमटविलेल्या आढळून येतात. तर प्रत्येक नोटेला तिच्या असलेल्या किमतीचा उल्लेख… भारताचे ‘राज चिन्ह’ व त्याखाली “सत्यमेव जयते!” लिहिले आहे.


'के पैसा बोलता है'...

जीवनात प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. ‘पैशांशिवाय या दुनियेत काडी किंवा पान सद्धा हलत नाही,’ असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. शेतीसाठी, शिकण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी तर चार घास सुखाचे खाण्यासाठी पैसे लागतात. पैसे झाडाला लागत नाही, ते दररोज कष्ट करून कमवावेच लागतात. मुले शिकून मोठी झाली की पैसा कमावण्यासाठी स्वतःच्या गावात, दुसऱ्या शहरात, परदेशात जातात आणि व्यवसाय अथवा नोकरी करून, पैसे कमवून मोठे होतात. आणि मग तो जर मागच्या लोकांना, नातेवाईकांना विसरला तर म्हटले जाते.

'मला माहित आहे तो खुप पैसेवाला झाला आहे.'


आणि जर स्वतःच्या लग्नात स्वतःचा बुट हरवला तर, ‘हम आपके है कौन…?’ या चित्रपटातील गाजलेले गाणे ऐकावे लागते.


'जूते दे दो.. पैसे ले लो..'

पण काही लोक आपल्या जीवनात पैशांपेक्षा वेळेला, नात्यांना आणि माणुसकीला जास्त किंमत देतात.





पैसा माणुसकी, नाती संपवून टाकतो. पैसे म्हणजे लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी कधीच कोणाकडे जास्त काळ टिकत नाही. रावाचा रंक.. तर, रंकाचा राव होतो. प्रत्येक जण कुठेना कुठे पैसा गुंतवत असतो. नाही तर एका जागी साठवून ठेवलेल्या पैशाला म्हणजे नोटांना… उनी लागते. काही लोक आपल्याकडे खुप पैसे आहेत असे दाखवतात, तर काही आपल्याकडचे पैसे लपवतात. पैसा काळा व पांढरा सुद्धा असतो. नीतीच्या मार्गाने कमवलेला व सरकारला टॅक्स भरून आपल्याकडे शिल्लक राहिलेला पैसा, हा “पांढरा पैसा” म्हणून ओळखला जातो. तर टॅक्स न भरलेला, अनितीच्या व काळया मार्गाने कमावलेला पैसा, “काळा पैसा” म्हणून कुप्रसिद्ध आहे. खुप पैसे कमवणाऱ्यांना, सरकार टॅक्स भरायला लावते. आणि जर टॅक्स नाही भरला तर मग.. ईडी, सीबीआय सारखी सारखी चौकशी करते आणि धन लपवणाऱ्यांकडे धाडी टाकते. ‘भारतीय रिझर्व बँक’ या सर्व पैशांवर नियंत्रण ठेवत असते.


समाजात याच काळया पैशाचे प्रमाण जर जास्त झाले तर सरकार त्यावर बंदी आणते. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी असताना एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली होती. तर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५००, १००० व आत्ता २००० रुपयांच्या नोटांवर बंदी आणून काळया पैशांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि आता गॅस कार्ड ही लिंक केले जात आहे.


असे म्हणतात.. 'आपली ओंझळ भरली की ओसंडून वाहून जाणारा पैसा, संपत्ती गरजू लोकांना वाटून टाकावी.' मग जगात दान देणारे काही कमी नाहीत. आपल्या देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांचे नाव यात अग्रभागी घेतले जाते. मंदिरांना, धर्मशाळांना, वाचनालयांना, शाळांना दान देणारे आपण पाहतो. भूकंप, अतिवृष्टी, गारपीट, महापूर यांमध्ये भरपूर पैसे जमा केले जातात. फक्त ते गरजुंपर्यंत पोहोचायला हवेत. सरकारी कामांमध्ये पैसे खाल्ले जातात, त्यामुळे आता मदतीचे पैसे थेट प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा केले जातात. ‘दस लाख’ या चित्रपटातील मोहम्मद रफी व अशा भोसले यांनी गायलेले हे गाणे… मंदिराबाहेर, एसटीत आणि रेल्वेमध्ये खूप गाजले व लोकांना दानधर्म करण्यास.. अंध, अपंग व्यक्तींकडून त्यांच्या विशिष्ट आवाजात, दुवा देत आजही आवाहन केले जाते.


'गरिबोंकी सुनो वह तुम्हारी सूनेगा'

'तुम एक पैसा दोगे वह दस लाख देगा'


©®

लेखक-

डॉ. प्रविण डुंबरे

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page