बार्गेनिंग ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)
- Neel Writes

- Sep 20, 2025
- 4 min read
प्रत्येक वस्तूला काहीतरी किंमत असते, मग त्या वस्तूवर तिची किंमत छापलेली असो अथवा नसो. छापलेल्या वस्तूवर पूर्वी काही टॅक्स असायचे, आता जीएसटी लावलेला असतो. छापलेल्या वस्तूपेक्षा कमी किंमत घेता येते, परंतु जास्त किंमत घेता येत नाही. एखादी वस्तू तयार होण्यासाठी जो काही उत्पादन खर्च येतो, तो व त्यामध्ये ठोस विक्रेता, किरकोळ विक्रेता असे करत करत या सर्वांचा नफा बाजूला ठेवून मग अधिकतम विक्रीची किंमत काढली जाते. उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत यामध्ये जो फरक आढळून येतो, तो मध्ये मध्ये हे जे लोक ती वस्तू हाताळतात त्यांना मिळणाऱ्या फायद्यासाठी असतो. हा सर्वच फायदा त्यांना होत नाही. वाहतूक खर्च, घर भाडे, लाईट बिल, कामगारांचा पगार आणि विक्रेत्या प्रत्येकाच्या घरातील सर्व खर्च त्या नफ्यामध्ये सामावलेले असतात.

मालाचे उत्पादन जास्त झाले व ग्राहक कमी असतील तर परिणामी मालाला उठाव होत नाही. माल पडून राहतो. नाशवंत माल असेल तर लवकर खराब होतो. तयार केलेला माल हा प्रत्येकाला येणाऱ्या पुढील ग्राहकांना विकायचा असतो. त्यात पुढील ग्राहक किती मोठ्या प्रमाणात त्या वस्तू घेणार आहेत, त्या प्रमाणात भावही थोडेफार प्रमाणात कमी केले जातात. सौदेबाजी किंवा घासाघीस केली जाते. नाशवंत माल असेल तर लवकर खराब होतो, म्हणून थोडा जास्तीचा भाव कमी करून त्यातून लवकर मुक्तता होण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. या सर्व विक्रीतून व्यवसायाची वार्षिक उलाढाल ठरली जाते. वार्षिक ताळेबंद ही केला जाऊ शकतो. मग त्यातून उत्पादन करणाऱ्याला फायदा किती व तोटा किती झाला आहे समजू शकते.
'ग्राहक देव आहे' या संकल्पनेतून.. सकाळी जर पहिला ग्राहक आला असेल, तर बोहनीच्या वेळेला ग्राहकाने कमी किमतीला वस्तू मागितली, तर पुढे व्यवसायाला नाट लागू नये… आण, त्या पहिल्या ग्राहकाच्या पायगुणाने दिवसभर खुप व्यवसाय होईल, म्हणून… मनात आशेचे आणि श्रद्धेचे स्थान ठेवून, वस्तू कमी किमतीला दिली जाते.
शेतीप्रधान देश असलेल्या आपल्या भारत देशातील शेतकरी भरपूर काबाडकष्ट करून, अगदी जीव ओतून शेतामध्ये धान्य पिकवत असतात. गहू, ज्वारी, बाजरी, भुईमूग, ऊस, केळी ही पारंपारिक पिके तो पूर्वी घेत असे. परंतु आता सोयाबीन, कांदा, टोमॅटो इत्यादी ज्यादा पैसे देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे. पूर्वीच्या काळी तीनही ऋतूत एकसारखे असणारे हवामान आता तसे राहिले नाही. अवकाळी पाऊस, रोगराई, अतिवृष्टी आणि अवर्षण या सर्व गोष्टींचा शेतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. एखाद्या पिकाला जास्त बाजार भाव मिळू लागला की सर्वच शेतकरी त्याच पिकाचा विचार करतात. परिणामी एकाच प्रकारचे पीक जास्त प्रमाणात बाजारात येते. आवक जास्त वाढली की बाजार भाव कमी होतात, पडतात आणि पाडलेही जातात. व्यापारी व दलाल सुद्धा बार्गेनिंग करत शेतमालाला कमी भावात खरेदी करतात. 'गरजवंताला अक्कल नसते' या उक्तीप्रमाणे शेतकऱ्याला संसारासाठी, पिकवलेला माल वेळेवर विकावाच लागतो. दररोज वाढत असणाऱ्या मजुऱ्या, फवारणीच्या औषधांचे, खतांचे वाढते भाव...परिणामी उत्पादन खर्च वाढतो. म्हणून फायद्या तोट्याचे गणित पार बिघडून जाते. आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.
चार दोन मित्र, चार दोन मैत्रिणी किंवा नवरा बायको मस्त एखाद्या सुट्टीच्या दिवशी खरेदी करायला घराबाहेर पडतात, आणि बार्गेनिंग करत खरेदीचा आनंद घेतात. शहरांमध्ये सुद्धा काही ठिकाणे, काही गल्ल्या या वस्तूंवर जास्त किंमत सांगत असतात. तेथे नेहमी जाणाऱ्या लोकांना हे लोक जास्त किंमत सांगतात हे माहीत असते. त्यामुळे खरेदी करणारे, सांगणाऱ्या किमतीच्या एक चतुर्थांश किंमत सांगून त्या विक्रेत्याला त्यांना आवडलेली ती वस्तू त्याच त्याच भावात द्या... अशी सारखी गळ घालत असतात. हेच ते “बार्गेनिंग.” काही मंडळी तर या घासाघिस करण्यामध्ये खुपचं तरबेज असतात. ते शंभर रुपयाची वस्तू मग दहा रुपयापासून मागण्यास सुरुवात करतात. आणि आपण ती वस्तू किती रुपयांना मागितली, याची रंगून रंगून चर्चा मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये करत असतात.
खरेदी करणारे लोक म्हणतात… 'तुमच्या थोड्याशा कमी केलेल्या पैशाने मी काय माडी बांधणार आहे का?' पण तरी सुद्धा या लोकांना बार्गेनिंग केल्याचे समाधान मिळते. काहीजणांना बार्गेनिंगचा टाळू भाग असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर काहींना कमी किमतीत वस्तू मागणे अपमानाचे, गावठीपणाचे वाटते. तर्कसंगत वाटत नाही किंवा आपल्याला कमी किमतीत वस्तू मागणे जमणार नाही असे वाटते. मग असे लोक, जे लोक बार्गेनिंग मध्ये तरबेज आहेत त्यांना घेऊन खरेदीसाठी जातात. माझ्या माहितीतील एक जोडी बार्गेनिंग मध्ये खूप निष्णात आहे. त्यांना आम्ही 'बार्गेनिंग एक्सपर्ट' चा किताब दिला आहे. माझे खुप जवळचे मित्र असल्यामुळे त्यांच्या बरोबर खरेदीला गेल्यावर आमचा फायदाच होतो, हे मात्र नक्की. तुम्ही दुकानातून किंमत कमी करून आणलेल्या वस्तूवर, माझे हे मित्र डिस्काउंट आणखी कमी करू शकतात. आता तुम्ही मात्र त्यांचे नाव विचारू नये.

सगळ्या बाजूंनी होरपळलेला शेतकरी मग मेटाकुटीला येतो. सरकार शेतमालाला ठराविक बाजारभाव देत नाही. सरकारच्या हाती असणाऱ्या ऊस, दूध यासारख्या काही वस्तूंचे बाजारभावही वाढवत नाही. शेतकऱ्यांनी किरकोळ विक्रीसाठी दररोज आणलेल्या मालावर सुद्धा, ग्राहक ही भाजी 'याच किमतीत द्या...त्याच किमतीत द्या' असे म्हणतात. मग तीच मंडळी एखाद्या मॉलमध्ये, हॉटेलमध्ये जाऊन समोर जे बिल येईल ते अगदी आरामशीर आणि इज्जतदार माणसासारखे भरून टाकतात.
सौदेबाजीचा हा व्यवहार घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या कमी जास्त करण्याच्या रकमेतून, एकमेकांना पटला तर त्यात नक्कीच आनंद निर्माण होतो. आमचा शेतकरी राजा दानशूरपणामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे वस्तू खरेदी करायला जा... व्यवहारीपणा बाजूला ठेवून, तो तुम्हाला चार दोन वस्तू, मूठभर.. अगदी ओंजळ भरून जास्तीचे धान्य टाकेल. त्याच्या शेतावरच्या बांधावर जा... तो तुम्हाला वानवळ्याच्या स्वरूपात… तुमच्या ओटीत अथवा पिशवीतून काहीतरी नक्की देऊन जाईल. “अहो ताई, दादा किती दिवसांनी आले तुम्ही, हे एवढं माझ्या शेतात पिकलेलं आहे. जा घेऊन…” असे म्हणेल. पण घेणाऱ्याने सुद्धा शेतकऱ्याचा दातृत्वपणा घ्यावा, देण्याची वृत्ती घ्यावी, असे कवी विंदा करंदीकर यांनी त्यांच्या कवितेत म्हटले आहे,
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे.
प्रत्येक सणासुदीच्या दिवसात सुद्धा, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या अगदी किरकोळ विक्रेत्याकडून, आपण खरेदी करत असलेल्या वस्तूमध्ये जर माणूस घासाघिस न करता पैसे देईल... व त्याच्याकडे दोन चार वस्तू घेण्याचा प्रयत्न करील... त्या दिवशी त्या गरीब माणसाच्या घरी नक्कीच आनंदाने दिवाळी साजरी झालेली असेल.
©®
डॉ. प्रविण डुंबरे
ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे
९७६६५५०६४३



Comments