google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

संस्कृती कारणांचे शहाणपण :उल्का देवरुखकर

आपल्या आजच्या आधुनिक पिढीला संस्कृती म्हणजे आडमुठेपणा, जुनाट विचार, आळशीपणा किंवा अंधश्रद्धा असे वाटू लागले आहे. पण खरेतर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या संस्कारामागे खोल अर्थ, अनुभव व जीवनासाठी उपयुक्त अशा गोष्टी दडलेल्या आहेत.



आपल्या लोकांनी जेव्हा एखादा नियम, प्रथा किंवा सण दिला, तेव्हा त्यामागे मानवी हिताचे वैज्ञानिक कारण नक्कीच असायचे. परंतु तो काळ वेगळा होता, भाषा वेगळी होती आणि लोकांची मानसिकता वेगळी होती. त्यामुळे त्यांनी या नियमांना भावनांचा आणि श्रद्धेचा रंग दिला, जेणेकरून प्रत्येकजण तो आनंदाने, निष्ठेने पाळेल.


उदाहरण घ्या वाटपौर्णिमेचे. आज जर एखाद्या स्त्रीला सांगितले की, “तू वडाच्या झाडाजवळ फेरफटका मार. झाड भरपूर ऑक्सिजन देते, त्यामुळे आरोग्य चांगले राहते”, तर कदाचित ती म्हणेल, “माझ्याकडे वेळ नाही, मला त्याचा उपयोग कसा होईल?” पण जर सांगितले की, “वाटपौर्णिमेला वडाला प्रदक्षिणा घालायची, त्याला मानायचं”, तर ती ते श्रद्धेने, भक्तिभावाने करते.


यातून दिसते की कारणाला जेव्हा संस्कृतीचा आधार मिळतो, तेव्हा लोक सहजतेने त्याचे पालन करतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नियमांना केवळ विज्ञानाचा किंवा तर्काचा पोशाख न देता, त्यात धर्म, भावना आणि संस्कारांची गुंफण केली.


परंतु आज दुर्दैवाने आपण “रुढी म्हणजे जडत्व” असे समजून बसलो आहोत. कारणामागचे शहाणपण समजून न घेता त्याला अंधश्रद्धा ठरवतो. परिणामी आपण संस्कृतीपासून दूर जातो, आणि त्याचबरोबर त्या प्रथांमध्ये दडलेले आरोग्य, निसर्गाशी जोड, कुटुंबातील स्नेह, मानसिक शांती – या सर्व मौल्यवान गोष्टीही हरवून बसतो.



स्त्रियांबाबत तर हे विशेष दिसते. कारण परंपरेतल्या बऱ्याच प्रथा ह्या त्यांच्या आरोग्य, त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणाशी निगडित होत्या. पण त्या फक्त "रुढी" म्हणून मानल्या जातात.


म्हणूनच आज गरज आहे ती संस्कृतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची.


संस्कृती अंधश्रद्धा नाही, ती अनुभवातून निर्माण झालेला शहाणपणाचा खजिना आहे.


रुढी म्हणजे बंधन नव्हे, तर त्यामागचे गुपित जाणले की ती जीवनाची समृद्धी ठरते.



विज्ञान आणि संस्कृती हे एकमेकांचे शत्रू नाहीत, उलट ते एकमेकांना पूरक आहेत.


आपण जर या प्रथांकडे “का?” या प्रश्नाने पाहिले, तर आपल्याला त्या आरोग्य, पर्यावरण, मानसिक शांती आणि सामाजिक ऐक्य यासाठीच घडविल्या आहेत हे सहज लक्षात येईल.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page