google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

सावली : (डॉ. प्रवीण डुंबरे यांच्या, 'प्रतिबिंब' या ललितलेख संग्रहातून...)

प्रकाश किरण घनरूप वस्तूतून पुढे न जाता अडले जातात व परावर्तित होतात. आणि मग त्या वस्तूच्या च्यापुढे किंवा खाली, वर त्या वस्तूची छाया म्हणजे सावली पडते. रंगाने काळी असलेली ही सावली त्या त्या वस्तूचे रूप, आकार दाखवते. वस्तूवर पडलेले प्रकाश किरण किती जवळून किंवा लांबून पडतात यावर त्या वस्तूच्या सावलीची लांबी, रुंदी व उंची दिसते. प्रकाशाचे स्रोत किती आहेत, किती जवळून आणि लांबून पडले आहेत त्यावर या छायांची संख्या व स्पष्टता दिसून येते. मनुष्य जेव्हा प्रचंड उन्हात काम किंवा प्रवास करतो त्यावेळी त्याने बांधलेल्या घराच्या किंवा झाडांच्या सावलीला काही क्षण थांबून तो विश्रांती घेत असतो. उष्णतेमुळे जीव कासावीस झाला की या सावलीत थंडपणा अनुभवत असतो. त्यावेळी त्याला ती सावली हवीहवीशी वाटते.


सावली
सावली

आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी लावलेल्या झाडांची किंवा बांधलेल्या घरांची सावली पुढील पिढीला मिळत असते. मग त्या घरांवर मुले, नातवंडे.. आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची 'सावली' असे नाव देत असतात. बांधलेली घरे किंवा झाडे ही पुढच्या पिढीसाठी आधार असतात. छोटे झाड लावले तर सावली छोटी मिळते पण आंबे, वड, पिंपळ यांसारखी मोठी झाडे लावली, त्यांची योग्य निगा राखली तर ती झाडे कालांतराने आणखी मोठी होऊन आपल्याला, प्रवाशांना मोठी सावली देतात. मग लोक म्हणतात...'हा त्याच्या आज्याच्या सावलीत वाढला आहे.' म्हणजे त्याच्या आज्याने त्याला लहानपणापासून सांभाळले आहे, आजारपण, शाळा, कपडे व जेवण खान पाहिले आहे. ज्येष्ठांची सावली हा लहानांना मिळालेला आधारच असतो.


काही वेळेस मोठ्या झाडाची सावली त्याच्या खाली असणाऱ्या छोट्या रोपांना वाढू देत नाही. रोपांना सूर्यप्रकाश मिळत नाही, परिणामी हरितद्रव्य तयार न झाल्यामुळे ती रंगाने पिवळी पडतात, खुरटी होतात. याला ग्रामीण भाषेत 'वसवा' पडणे म्हणतात. मग वसवा करणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्या जातात किंवा संपूर्ण झाडचं मुळासकट बाजूला केले जाते. माणसांचेही असेच आहे. मुलांना सारखे आपल्या जवळ जवळ ठेवून त्यांची वाढ खुंटते, भरभराट होत नाही. त्यांना स्वतंत्रपणे वाढू द्यावे.


जीवन जगत असताना त्यात दिवसासारखी, बालपणाची प्रसन्न सकाळ येते. त्यात प्रसन्न सकाळच्या सूर्याची उष्णता घेण्याच्या नादात आपले सावल्यां कडे जास्त लक्ष नसते. दुपारी या सावल्या, सूर्य डोक्यावर असताना छोट्या असतात. शून्य सावली दिवस...ह्या दिवशी व्यक्तीची अथवा वस्तूची सावली क्षणभर नाहीशी होते. त्यावेळी सुर्य अक्षांश रेषेच्या अगदी वर असतो. पण आयुष्याच्या सायंकाळी एकटेपणा जाणवू लागतो. सुर्य सुद्धा वेगाने अस्ताला चाललेला असतो. आणि मग प्रत्येकाला घरांच्या, झाडांच्या आणि वस्तूंच्या लांब लांब पडलेल्या सावल्या पाहून, मनाला एक प्रकारची भीती वाटत असते. की आता.. काही वेळाने, काळाने रात्रीच्या अंधारात या सावल्या आपल्याला सोडून जातील. कवी भा. रा. तांबे यांनी त्यांच्या कवितेत छाये विषयी असेच लिहिले आहे.

ढळला रे ढळला दिन सखया

संध्या छाया भिवविती हृदया


सूर्यग्रहण व चंद्रग्रहण ही सुध्दा चंद्राची व पृथ्वीची सावली एकमेकांवर पडल्यामुळेच होत असतात. सावलीच्या या स्पर्शाला, ग्रहणाला खुप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेची जोड दिली जाते. जे पूर्णतः चुकीचे आहे. रात्रीच्या अंधारात सावल्या आपल्याला खुप घाबरवतात. आधीच आपण भुतांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. मग लहान मुले अंधार झाला की घराबाहेर जायला घाबरतात. त्यांना कुणाची तरी सोबत लागते. रात्रीच्या अंधारात चोरी, दरोडे, काळे धंदे यांना ऊत येतो आणि मग अंधाराचा फायदा धेतला जातो. सुधीर मोघे यांनी लिहिलेले 'रात्रीस खेळ चाले' या चित्रपटातील हे गीत आपल्याला आठवते.


रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा

ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा


संपूर्ण जीवन भर ऊन आणि सावल्यांचा खेळ सतत चाललेला असतो. अनेक सावल्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा, कोणती सावली कोणाची हे मात्र ओळखू येत नाही. प्रकाश, उजेड नाहीसा झाला किंवा संपूर्ण अंधार पडला तर मात्र या सर्व सावल्या नाहीश्या होतात. परंतु एक कायमचे सत्य आहे... सर्व जण आपल्याला सोडून जाईल पण आपली सावली मात्र आपल्याला कधीच सोडून जात नाही. ती सदैव आपल्या बरोबरच असते. सावल्या भीती देणाऱ्या असल्या तरी काही कलाकार त्यांच्या हातांच्या आणि बोटांच्या साहाय्याने हातांवर, जवळ आणि लांब प्रकाश पाडून, आपल्याला पांढऱ्या पडद्यावर सावल्यांचा खुप सुंदर खेळ दाखवतात. हातांच्या, बोटांच्या आकारातून ते वेगवेगळे प्राणी, पक्षी, डोंगर, झाडे इत्यादींच्या हलत्या सावलीच्या प्रतिमा दाखवतात व त्यांना ओरडणारे हत्ती, वाघ यांचे आवाजही देतात. बोटांनी दाखवलेल्या सावल्यांची जरी असेल तरी त्यांची ही कला पाहायला लहानांना आणि मोठ्यांना मजाच येते ना? आणि हो... काळया माणसाची सावली काळी व गोऱ्या माणसाची सावली गोरी न पडता काळीच पडते... मग माणसा माणसात भेदभाव तो कुठला?


©®

🦚 डॉ. प्रविण डुंबरे 🦚

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page