google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

सुर ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)

सुर म्हणजे गाण्यातील स्वर, आवाज, मधुर ध्वनी. सुर हा गळ्यातून किंवा वाद्यातून कुठल्याही एका विशिष्ट श्रवणीय, स्थिर नादाला म्हणता येईल. म्हणून, सुरेल आवाज वगैरे म्हणतात. संगीत क्षेत्रात सुरांना खूप महत्त्व आहे. सनई, बासरी, वाद्याची पेटी, गिटार, तबला, ढोलकी, इत्यादी मधून सप्त सुर बाहेर निघत असतात. एखाद्याला रागाचा सुर आला आहे असे आपण म्हणतो. तर एखाद्या लहान बाळाला, त्याने आज रडका सुर पकडला आहे असे आपल्याला जाणवते. तेच एखादा नवीन गायक आला, पण तो किती बेसुर गात आहे असेही आपण म्हणतोच की...


स्वरयंत्राला सुरयंत्र बनवण्यासाठी गायक पहाटे उठून तासोंतास रियाज करत असतात. शास्त्रीय कार्यक्रमात तरबेज गायकाला वेगवेगळ्या प्रकारचे राग अळविण्यासाठी वेळ लागतो. संपूर्ण जीवनही त्या कलेसाठी साधना करून समर्पित करावे लागते. पण जेव्हा आपल्या कानांना त्यांच्या स्वरांनी आणि सुरांनी तृप्तता येते, मग आपणही आनंदाने डोलतो आणि म्हणतो “व्वा...आज काय छान सूर लागलाय... बुवांचा.”


सर्व चांगले सुर जुळलेल्या घरातून आपल्याला जेव्हा महेंद्र कपूर यांनी गायलेले मंजुळ आवाजातील गाणे ऐकायला येते ना..

‘सुर तेच छेडिता, गीत उमटले नवे…’

‘आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे.’

तेव्हा त्या घराचा आणि घरातील माणसांचा आपल्याला हेवा वाटायला लागतो.


सर्वांकडून आपल्याला चांगल्या सुरांची अपेक्षा असते. लहान मुलांनी सुद्धा रडका, चिडका सुर लावू नये असेच वाटते. एखाद्या गवय्याच्या घरी त्याचे लहान मुल रडत असेल तर ...'गवय्याच्या मुलाने कसं सुरात रडलं पाहिजे' असे पूर्वी म्हणत असत.


आपले जीवन सुद्धा एकसुरी असता कामा नये. त्यात वेगवेगळे सुर एकत्र यावेत, ते सर्व एकमेकात मिसळावेत. शाळेतील मुले जेव्हा समूहगान गातात, सर्वांचा एकच सुर येतो, तेव्हा कानांना तृप्तता मिळते… मुलांना आनंदाच्या भरात उपस्थितां कडून शाब्बासकी म्हणून बक्षिसे सुद्धा मिळतात. त्यातच एखाद्या विद्यार्थ्याचा सुर वेगळा आल्यावर, ‘हा असा काय गातोय?’ म्हणून त्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते.



पंडित भीमसेन जोशी, एम बलामुर्लिकृष्णन, लता मंगेशकर, कविता कृष्णमूर्ति इत्यादींनी गायलेले मंजुळ समुहगान, राष्ट्रगान आपल्याला पाहायला आणि कानांना किती सुंदर आणि तृप्तता देवून जाते.


“मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा…”

१५ ऑगस्ट १९८८ साली अझगर खान यांनी लिहिलेले व अशोक पत्की यांनी संगीत बद्ध केलेले किती तरी संगीतकार, गीतकार गायक, खेळाडू, अभिनेते आणि अभिनेत्रींनी गायलेले व अभिनय केलेले हे पुन्हा पुन्हा पाहावे असे मनाला रिझवणारे अप्रतिम गीत आहे. विविध १४ भाषांमध्ये हे गीत गायलेले आहे. दूरदर्शनवर त्याकाळी सतत दाखवले जायचे व त्यातून सर्वांच्या मनात राष्ट्रप्रेम उचंबळून यायचे. मग असेच सर्वांचे एकत्र मंजुळ सुर जीवनाच्या गाण्यात उमटले तर सर्वांना आनंद होईल, आणि कित्ती सुंदर गीत तयार होईल ना…??


एकमेकांच्या जीवनात फक्त देव रुपी सुर यावा… दानव, आसूर रुपी सुर.. येवू न द्यावा.


आपल्या जीवनात सुद्धा असे सप्तरंगी सुरांचे विविध प्रकारचे चांगले रंग भरून, आपले जीवनही एकसुरी न होता... जीवन इंद्रधनुष्यप्रमाणे सर्वांना हवे हवेसे वैविध्यपूर्ण असावे. मग बघा.. जगण्यास आणखी मज्जा येईल.


©®

डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

शिवजन्मभूमी जुन्नर (पुणे)

९७६६५५०६४३

( लेख आवडल्यास नावासह पुढे पाठवण्यास हरकत नाही.)

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page