google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

स्वप्न ( डॉ. प्रवीण डुंबरे, यांच्या, ‘प्रतिबिंब’ या ललितलेख संग्रहातून…)

निद्रावस्थेत अनुभवास येणाऱ्या प्रतिमा, वस्तू , व्यक्ती, घटना, भावना म्हणजे स्वप्न. स्वप्न पाहणाऱ्याला ते चालू असताना, ते खरे आहे असे वाटत असते. पण जागृत अवस्था आल्यावर कळते की, ‘हे खरे नाही.’ त्या अवस्थेतून बाहेर पडायला सुद्धा काही वेळ जावा लागतो. स्वप्नांद्वारे भविष्यातील घटनांचा अंदाज लावला जाऊ शकतो. स्वप्ने ही मनाची विशेष अवस्था असते.


' मनी वसे.. ते स्वप्नी दिसे '

असे म्हणतात.. की, ‘मनुष्य दिवसभर ज्याचा जास्त विचार करतो, तेच त्याला स्वप्नात दिसत असते.’ आपल्याला पडलेली काही स्वप्न चांगली असतात, तर काही वाईट असतात. असे म्हटले जाते की, 'पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात...'

मनुष्य आपल्या दिवसभराच्या कामाच्या व्यापातून दमून भागून निवांत झोपला, की काही वेळेला त्याला स्वप्न पडतात. चांगली स्वप्न पडली तर माणसाच्या मनाला आनंदच वाटतो. मग काही मुले, माणसे चांगल्या स्वप्नांवर झोपेतच गालातल्या गालात हसतात. माणूस एकटा असेल तर, दादा कोंडके यांच्या 'एकटा जीव सदाशिव' या चित्रपटातील हे गीत त्याच्या ओठी नेहमी गुणगुणत असतो..



'काल रातीला सपान पडलं सपनात आला तुमी

न बाई मी बडबडले. अन गालावरती खुणा बघुनी

आई म्हणाली काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी'


तर काही स्वप्न आपल्याला विचित्रही पडत असतात, जी आपण जागृत अवस्थेत आल्यावर म्हणतो...'अरे..! असे कसे शक्य आहे.' काही स्वप्न आपल्याला खूप भीतीदायक पडतात. ज्यामध्ये आपण उंच इमारतीवरून, डोंगरावरून खाली कोसळतो, वाघ.. साप यांच्याशी सामना करतो, कधी कधी आपण स्मशानात असतो. भुतांबरोबर चांगले बोलतो, वागतो तर भुतांना घाबरतो सुद्धा. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या “भूतनाथ” या चित्रपटातील काही भुते चांगली सुद्धा असतात. स्वप्नात अगदी रक्त, चाकू-सुऱ्या सुद्धा दिसतात. या भीतीदायक स्वप्नांच्या शेवटी लहान मुले आणि मोठी माणसे सुद्धा हुंदके देतात, रडतात, ओरडतात, किंचाळतात आणि काही वेळेला कॉटवरून खाली देखील पडतात. आपण ओरडून ओरडून पण जर, लवकर जागे झालो नाही.. तर आई वडील आपल्या अंगावर पाण्याचा तांब्या ओततात, जोरजोरात हलवतात आणि आपल्याला लवकरात लवकर त्या स्वप्न अवस्थेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.


प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पुढे काही ना काही करायचे असते. याच गोष्टींचे त्याचे स्वप्न असते. जसे की शिक्षण, घर बांधणे, जमीन घेणे, फ्लॅट घेणे, दोन चाकी अथवा चार चाकी गाडी घेणे, मुला मुलींचे किंवा स्वतःचे लग्न करणे, चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणे, व्यवसाय करणे इ. आणि शेवटी खूप पैसा कमवून जीवनाचा आनंद घेणे ही स्वप्ने असतात. याच स्वप्नांची यादी, “बकेट लिस्ट” प्रमाणे तयार करा. त्याप्रमाणे एका एका स्वप्नावर विचार करा. आपले स्वप्न छोटे आहे की मोठे आहे, याचाही विचार करा. स्वप्न पाहण्यासाठी कल्पना करा.. त्याने तुम्ही नक्कीच रोमांचित व्हाल. पण दररोज नुसतं रोमांचित होऊन चालणार नाही, त्ती स्वप्ने सत्यात आणण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करा. एकूण एक अडथळे दूर करण्याचा आपल्याला नेटाने, जोमाने प्रयत्न करावे लागतील.



दररोज आपल्याला स्वप्नात जगून उपयोग नाही, तर स्वप्न साकार करण्यासाठी त्याला वेळ आणि पैसा द्यावा लागेल. त्यासाठी पडेल ते कष्ट करायची ताकद आपल्याला खर्च करावी लागेल. स्वप्नांकडे जाणाऱ्या रस्त्यापासून आपण भरकटत असाल, तर त्याकडे लक्ष दिले पाहिजे. नुसते मनोराज्य रचून उपयोग नाही. आपले मित्र, नातेवाईक, व्यसने, अगदी मोबाईल सारख्या व्यसनांपासून सुद्धा काही काळ लांबच राहावे लागेल. या सर्व प्रवासात तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. या काळात तुम्हाला घरच्यांनी, तुमच्या शरीराने आणि मनाने सुद्धा खंबीर साथ द्यायला हवी आहे.


झोपेत असताना कोणती, कोणत्या वेळी, चांगली वाईट स्वप्ने पडावीत हे आपल्या हातात नसते. जागेपणी सुद्धा काही लोक डोळे झाकून स्वप्नात हरवून बसतात. त्यांना “दिवास्वप्ने” म्हणतात. काहीही काम न करता आयते खाऊन व घरात बसून अशी फुकटची स्वप्ने पाहणाऱ्याला घरचे लोक कंटाळलेले असतात. जाता येता त्याच्या नावाने सतत ओरडत असतात. 'नुसती स्वप्ने पाहू नको, काहीतरी काम धंदा कर' असे सारखे म्हणत असतात. मग आपल्याला आपल्या शाळेत शिकवलेल्या बा.सी. मर्ढेकर यांची, एका जागेवर बसून माडी बांधण्याची स्वप्ने पाहणाऱ्या गणपत वाण्याची कविता आठवते..




'गणपत वाणी बिडी पिताना'

'चावायाचा नुसतीच काडी;'

'म्हणायचा अन मनाशीच की'

'या जागेवर बांधिन माडी;'


खूप कष्ट करून आणि स्वप्नांच्या मागे धावून जर स्वप्नपूर्ती झालीच नाही, तर मग या गाण्याच्या ओळीही मनामध्ये आपोआप येतात…

'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा'

'गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा'


मुलांनी सुद्धा चांगली चांगली आणि मोठी मोठी स्वप्न जरूर पहावीत. समोर ध्येय ठेवून ती पूर्णही करावी.. म्हणजे आपल्या कुटुंबाला, समाजाला, देशाला त्याचा फायदा होईल. त्याद्वारे क्रांतिकारकांनी, जवानांनी, थोर नेत्यांनी पाहिलेले “सुजलाम सुफलाम” भारत भूमीचे स्वप्न पूर्ण होईल.


स्वप्नांच्या मागे धावता धावता काही काळही हळूहळू सरकत जाईल, आणि एक दिवस असा येईल. तुम्हाला जाणवत राहील, हळूहळू तुम्हाला.. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे शुभ संकेत दिसू लागतील. तुमच्या आयुष्यात सुद्धा ती शुभ सकाळ, तो शुभ दिवस येईल… मनात सनई चौघड्यांचे मंजुळ आवाज ऐकू येतील, आणि आनंदाचे भरते येईल. तोच तो, ‘सुंदर क्षण’ असेल ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता… त्या क्षणी तुमची “स्वप्नपूर्ती” झाली असेल. कदाचित आजही तुम्हाला असेच वाटेल की मी.. आत्ता या क्षणी, स्वप्नात तर नाही ना ??


तुमचं राहणं, बोलणं, वागणं आणि समाजाला धरून चालणं, हे जर चांगले असेल... तुमच्यातली जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्याची वृत्ती, धैर्य या सर्व गोष्टींनी तुमच्या जीवनात स्थैर्य येईल… तुमच्या बकेट लिस्ट मधल्या सगळ्या स्वप्नांची पूर्ती होईल. त्या सुखी माणसाचा सदरा तुम्ही पुन्हा स्वप्नात घालाल.. आणि म्हणालं, 'माझ्यासारखा सुखी माणूस या जगात दुसरा कोणी नाही.' घर, गाडी, बंगला ही स्वप्ने जर वेळेत आणि मनाप्रमाणे पूर्ण झाली तर मग लोकांकडून आनंदाने त्यावर नाव दिले जाते...

“स्वप्नपूर्ती”


©®लेखक-

डॉ. प्रविण डुंबरे

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page